National Technology Day
National Technology Day Sakal
संपादकीय

पडद्यामागचे फ्रंटलाईन वर्कर!

सकाळ वृत्तसेवा

पोखरणमध्ये भारताने १९९८ मध्ये अणूचाचणी घेतली, त्याची आठवण म्हणून ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ ११ मे रोजी साजरा होतो. त्यानिमित्ताने...

आजकाल कधीही ट्विटर उघडले तरी ट्विटरवर अनेकदा एकमेकांना मदत करणारे हजारो हात दिसतात. जगाच्या एका कोपऱ्यातून मदतीची पोस्ट पडत असेल, तर दुसऱ्या कोपऱ्यात ती मदत कशी करता येईल, याची खलबते चालू असतात. आजच्या घडीला ट्विटर हेल्पलाईन सारखे काम करत आहे. तीच गोष्ट फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमांची. कोल्हापूरला गरज असताना अमेरिकेतील तरूण फेसबुकवर पोस्ट पाहतात आणि मदत पाठवतात. शासकीय रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक रूग्णालयाजवळ राहायची सोय हवी म्हणून ग्रुपवर पोस्ट करतात आणि कोणी सध्या परगावी असणारी अज्ञात व्यक्ती आपला फ्लॅट द्यायला तयार होते. तंत्रज्ञान सामान्य माणसाला सुपरहिरो कसं बनवतं, याचे अनेक प्रसंग रोज समोर येत आहेत.

तंत्रज्ञानाची खरी ताकद हीच आहे की, प्रत्येक नवीन तंत्रज्ञान त्याच्या वापराच्या हजारो शक्यता घेऊन येतं! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वर्षभर प्रशासनासोबत काम करताना तंत्रज्ञानाची ही क्षमता रोज अनुभवत आहे. वर्षांपूर्वीची गोष्ट, कोरोनाबद्दल फार कोणाला काही माहीत नव्हते, लॉकडाऊन लागला होता आणि मुंबई, पुण्यासारख्या महानगरातून हजारो लोक गावी परतत होते. कोल्हापुरातले अनेक तरूण महानगरात कामानिमित्त असतात. त्यांना सुखरूप घरी आणणे आणि त्यांच्यासोबत विषाणूचा प्रवेश रोखणे, असे दुहेरी आव्हान होते. अशा वेळेला ॲपची कल्पना सुचली की, जे या लोकांच्या संपर्कात सातत्याने १४ दिवस राहायला मदत करेल. पुढच्या अवघ्या दोन दिवसात ते तयार झाले आणि नंतरच्या तीन महिन्यात त्याद्वारे जवळपास एक लाख लोकांची नोंद करण्यात आली. जिल्हाबंदी पूर्ण उठेपर्यंत कोल्हापुरात या जीवघेण्या विषाणूचा प्रसार बराचसा रोखता आला.

दोन गोष्टींची पुन्हा एकदा जाणीव झाली. तंत्रज्ञानाचा प्रभाव पडण्यासाठी ते रॉकेट सायन्सच असायला हवे असे नाही. एखादे सोपे इनोव्हेशनसुद्धा जग बदलवू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे वर्षानुवर्षे तंत्रज्ञानाच्या विकास आणि प्रसारासाठी अनेक तरूण जगभरात वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सवर काम करत होते आणि ते इंटरनेटवर मोफत खूप काही उपलब्ध करून देत होते. म्हणून आणीबाणीवेळी ४८ तासांत ॲप बनवणे शक्य झालं. ‘जग जवळ आलंय’ असं भाषणात कायम म्हटलं जातं, पण अशा क्षणी त्याची लख्ख जाणीव होते.

फरीद झकेरीया नावाचा विचारवंत म्हणतो की ‘लाईफ इज डिजिटल’. आज आपल्या हातातल्या मोबाईलमुळे आणि इंटरनेटमुळे जणू सगळे तंत्रज्ञान आपल्या बोटांवर आले आहे. मात्र याचे श्रेय यासाठी गेले ३-४ दशके जे द्रष्टे लोक सातत्याने काम करत राहिले त्यांना जाते. त्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी, सॅम पित्रोदा असतील, मराठमोळे प्रभाकर देवधर, नंदन निलेकणी अशा दिगजांची आठवण काढायला हवी. त्यांनी त्या-त्या वेळी तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले म्हणून आज त्याचा वापर सहजशक्य आहे. महाराष्ट्राचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) खात्याचा राज्यमंत्री म्हणून ‘महानेट’सारख्या प्रकल्पाचा आढावा घेताना वेगळे समाधान असते. कारण, अशा प्रकल्पामुळेच गावागावात, खेडोपाडी इंटरनेट पोचणार आहे. डिजीटल म्हणजेच तंत्रज्ञान नव्हे; याचीही जाणीव कोरोना काळात प्रकर्षाने झाली. औद्योगिक उत्पादन कंपन्यांनी असेंम्बली लाईन व्हेंटिलेटर बनवायला काही दिवसांत सज्ज केली आणि ती बनवलीसुद्धा. सहकार क्षेत्राने तंत्रज्ञान वापरून सॅनिटायझर बनवले तर इचलकरंजीसारख्या शहराने पीपीई किटस बनवले. आजही ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स सारखे तंत्रज्ञानच लोकांना जीवनदान द्यायला कामी येत आहे. तिकडे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ‘फायझर''ने जगातली पहिली एम-आरएनए लस आणली आहे. तर, आपण जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे कोरोनाच्या बदलत्या रूपाला त्याच वेगाने नवी उत्तरे शोधत आहोत. थोडक्यात काय, तर कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले लाखो आरोग्य कर्मचारी, जीवनावश्यक सेवेतील कर्मचारी प्राणाची बाजी लावून लढत आहेत. त्यांच्या हातातील शस्त्र मात्र तंत्रज्ञान हेच आहे! तंत्रज्ञान दिवसाचे औचित्य साधून पडद्यामागचा वॉरीयर्सचे, तंत्रज्ञांचे आभार मानायलाच हवेत!

(लेखक राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT