सांगावयास अत्यंत आनंद होतो की, आम्ही नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुसती घोषणा काय, कोणीही करते. आम्ही मुहूर्ताचा शॉटही घेऊन टाकला आहे. वास्तविक आमच्या चित्रपटाचे जवळपास सगळेच चित्रिकरण पूर्ण झाले होते; पण मुहूर्ताचा शॉट राहून गेला होता.
शेवटी आमच्या ठाण्यात नुकताच या आगामी सुपरहिट चित्रपटाचा मुहूर्त आम्ही केला. ठाण्यातील कोलशेत या निसर्गरम्य ठिकाणच्या लोकेशनवर चित्रीकरण पार पडले. कोलशेत भागात कचऱ्यासारखा निसर्ग आहे. मुहूर्ताला मोठमोठे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नारळ फोडायचा की (दिवाळीत उरलेला) सुतळी बॉम्ब यावर एकमत न झाल्याने नुसत्याच टाळ्या वाजवून मुहूर्त करण्यात आला. प्रसाद म्हणून उपस्थितांना ठाण्यातील सुप्रसिद्ध झणझणीत मामलेदार मिसळ एकेक द्रोण वाटली. मिसळीसोबत पाव दिला नाही, कारण मामलेदार मिसळीत पाव बुडवून खाणे, हे नामर्दाचे लक्षण आहे. असो.
‘कर्मवीर २’ हा ‘कर्मवीर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, हे कोणीही ओळखेल. परंतु, ‘कर्मवीर १’ कधी रीलीज झाला? असा त्यांना प्रश्न पडेल. त्याचे उत्तर असे : ‘कर्मवीर १’ आम्ही निर्माण केलाच नाही, डायरेक्ट ‘पार्ट टू’च रसिकांना सादर करणार आहोत!
ही एका जबरदस्त महानायकाची गोष्ट आहे. एकप्रकारे ‘मराठी सुपरमॅन’ असे त्याचे वर्णन करता येईल. मूळ हॉलिवुडच्या चित्रपटातील सुपरमॅन ‘क्रिप्टॉन’ नावाच्या परग्रहावरुन आलेला असतो. कर्मवीर मात्र ठाण्याच्या किसननगर येथून निघतो. क्रिप्टॉन आणि किसननगर एकच, असेही काही लोकांना वाटते. पण तेही एक असोच.
‘कर्मवीर २’ हा एक सत्यघटनेवर आधारित, परंतु काल्पनिक, तसेच फँटसीच्या अंगाने जाणारा वास्तववादी चित्रपट आहे. यातील वास्तववादी सत्यघटनेच्या सादरीकरणात थोडे कल्पनास्वातंत्र्य घेतले असले तरी फँटसीदृश्य मात्र खरीखुरी आहेत!
उदाहरणार्थ, ‘कर्मवीर’ कथेचा नायक- सॉरी, महानायक- व्हिलनला गुंगारा देत विमानाच्या पंखावरुन गुवाहाटीला पोबारा करतो, असे एक दृश्य आहे. ते वास्तववादी अंगाने टिपले आहे. यावेळी व्हिलन बांदऱ्याच्या महालसदृश हवेलीत आलेलिंबू चोखत बसलेला असतो.
‘जनाब, हमेशा याद रखना…माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा त्याच्या तोंडी असलेला संवाद (‘शोले’मधील) गब्बरसिंगच्या तोंडी असलेल्या ‘होली कब है? कब है होली?’ पेक्षाही कितीतरी पटीने गाजेल, यावर आमचा विश्वास आहे.
(पटकथा-संवाद आम्हीच लिहिले आहेत…थँक्यू!) या संवादातील ‘जनाब’ हे संबोधन अतिशय महत्त्वाचे आहे!! त्याखेरीज व्हिलन हा डायलॉग मारत असतानाच कर्मवीरचा महानायक , त्याचे (पक्षी : व्हिलनचे) आख्खेच्या आख्खे कुटुंब पळवून नेतो, असा गंमतीदार प्रसंग फार खुलला आहे.
कर्मवीरच्या पहिल्या भागात व्हिलनचे कॅरेक्टर फार्फार पावरफुल होते, परंतु, दुसऱ्या भागात महानायकाच्या अपरंपार धाडसाची कहाणी आली आहे. व्हिलनच्या मालकीच्या बेटावरुन थेट भुयार खणून ठाण्यातील किसननगरात प्रकट होण्याचा थरारक प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाही.
एक गुपित फोडल्याशिवाय राहावत नाही. ‘कर्मवीर-२’ या टायटलमध्येच खरी गंमत आहे! कारण ‘कर्मवीर १’ अशी काही भानगड नाहीच!! वास्तवात दोन कर्मवीर प्रकटले. एक ठाण्यात, दुसरा नागपुरात!! एकप्रकारे ही ‘जय-वीरु’चीच जोडी आहे, असे म्हणता येईल.
म्हणून चित्रपटाचे नाव ‘कर्मवीर २’ असे ठेवण्यात आले आहे. लौकरच ‘कर्मवीर- ३’ चा मुहूर्त आम्ही करणार आहोत. कां की, तिसरा कर्मवीरही आता आधीच्या दोघांना सामील झाला असून तीन-तीन बायोपिकांचे पीक घेण्यापेक्षा एकच ब्लॉकबस्टर काढावा, असे ठरले आहे. रसिकहो, लौकरच तुमच्या भेटीला येत आहो!! तुम्ही फक्त तारखेकडे लक्ष ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.