ढिंग टांग : …गतीसी तुळणा नसे! sakal
satirical-news

ढिंग टांग : …गतीसी तुळणा नसे!

‘‘कांदा आणा काय? श्रावण सुरु आहे..,’’ माजघरातून परिचित आवाज आला. ‘‘गेला क काय?’’ कमरेवर हात ठेवून कुणीतरी शंका काढली. ‘‘क्काय! गेले? मेलो!!...म्हंजे माझे पाच हजारसुध्दा गेले!

ब्रिटिश नंदी न्यूज नेटवर्क

‘‘शंभर लाख कोटी?,’’ असे ओरडून आम्ही निपचित पडलो. ‘फट’ असा ध्वनि होऊन गुरुत्वाकर्षणाच्या बंधनातून मुक्त होत्साते आम्ही आपापत: तरंगत छताशी पोचलो. खालील बाजूस आमचेच शरीर निश्चेष्ट पडलेले होते. ‘‘त्यांचीच चप्पल हुंगवा, आत्ता उठतील!’’ कुणीतरी म्हणाले.

‘‘कांदा आणा, कांदा!’’ आणखी कुणीतरी म्हणाले.

‘‘कांदा आणा काय? श्रावण सुरु आहे..,’’ माजघरातून परिचित आवाज आला. ‘‘गेला क काय?’’ कमरेवर हात ठेवून कुणीतरी शंका काढली. ‘‘क्काय! गेले? मेलो!!...म्हंजे माझे पाच हजारसुध्दा गेले! उसने घेतले होते पहिल्या लाटेत!’’ हा शेजारच्या अण्णाचा आवाज, आम्ही (छतावरुन) ओळखला. महाकद्रू आणि खोटारडा माणूस! पाचशेचे पाच हजार केले फटक्यात!! पुढेमागे संधी मिळाल्यास अण्णाच्या मानगुटीवर बसण्याचा बेत आम्ही आखू लागलो.

तेवढ्यात कुणीतरी दाराशी जाऊन त्यातल्या त्यात झिजलेली, कळकट चप्पल आणली. कां कुणास ठाऊक, पण कुणीही पायताण हातात घेतले की आमचे ऊर धडधडते. ‘‘झालं काय होतं नेमकं? हार्ट्याट्याक तर नाही?’’ कुण्या संवेदनशील शेजाऱ्याने विचारणा केली. ‘‘ ह्याला आणि हार्ट्याट्याक? नाव सोडा!’’

अण्णांना पाच हजाराचा धक्का बहुधा ज्यास्त जोरात बसला असावा. ‘‘ काही नाही हो! टीव्हीवर मोदीजींचं भाषण ऐकत नेहमीप्रमाणे रिकामटेकडे बसले होते, अचानक ‘शंभर लाख कोटी?’ असं ओरडून शुध्दच हरपली हो!’’ घरच्या मंडळींनी ब्रेकिंग न्यूज दिली. इथे आमचा विषय बाजूला पडला, आणि मोदीजींनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गतिमान भारत योजनेची चर्चा सुरु झाली.

‘‘अहो, गेली तीन वर्षं ही फोकनाड ऐकतोय! त्यात हार्ट्याट्याक येण्यासारखं कायाय?’’ पलिकडले शेजारी आप्पा पिढ्यानपिढ्या कांग्रेसवाले आहेत. कां? तर त्यांचे तीर्थरुप कांग्रेसवाले होते, आणि रा. राहुल गांधी पुण्यात आलेले असताना ऐन गर्दीत त्यांच्याकडे बघून गोड हसले होते, म्हणे! ‘‘पण शंभर लाख कोटी हा आकडा जरा काहीच्या काहीच आहे हो! गतिमान भारत योजना कसली? सद्गतीमान योजना आहे ही! थेट मोक्षच! कविमनाचा एखादा माणूस धक्क्यानं जायचा असाच!’’ कुणीतरी सहानुभूतीचे उद्गार काढले.

‘‘हा आणि कविमनाचा? हु:!!’’ इति अण्णा. पुढेमागे याला घोळसण्याचा आम्ही तिथल्या तिथे निर्धार केला. नाही, एखाद्याचे पाश्शे घेतलेही असतील आम्ही. परिस्थिती सगळ्यांनाच असते. पण जगलो वाचलो तर परत केलेच असते ना…कदाचित? ‘‘शंभर लाख कोटी म्हंजे शंभरावर किती शून्य हो?’’ कुणीतरी गणिती प्रश्न उपस्थित केला. ‘‘मला वाटतं, बारा…बाराच!’’ दुसऱ्या कुण्या शेजाऱ्याने उत्तर दिले.

‘‘शंभरावर बारा नाही, एकावर बारा!’’ कुणीतरी चूक सुधारली. शंभरावर बारा की एकावर बारा शून्ये! काय फरक पडतो? की फर्क पईंदा? ‘‘येवढे पैसे भारताच्या उभारणीसाठी खर्च होणार आहेत, मिस्टर!’’ कुणीतरी म्हणाले.

‘‘छ्या! इथं फद्या नाही खिशात दातावर मारायला! शंभर लाख कोटी म्हणे!’’ आणखी कुणीतरी शंका काढली. ‘‘ऐकायला बरं वाटतं ना, मग झालं तर…तेवढीच त्याची किंमत!’’ हातात पायताण घेत घरची मंडळी म्हणाली. चप्पल हातात घेऊन त्या आमच्या निश्चेष्ट देहाकडे चाल करुन येत असतानाच पुन्हा ‘फट’ असा ध्वनी होत्साते आम्ही गतिमानपणे आमच्याच कुडीत घुसलो.

‘‘ उठा, काय मेली ही तऱ्हा-’’ एवढं म्हणत मंडळी माजघराकडे वळली. गर्दी पांगली. आम्ही उठून बसलो. पुनर्जन्म म्हणतात, तो हाच असावा. मोदी है, तो मुमकीन है!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT