Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

६०२, मंत्रालय

ब्रिटिश नंदी

आदरणीय माननीय प्रार्थनीय ना. मा. मु. महाराष्ट्र श्री. उधोजीसाहेब सीएम, यांसी मानाचा मुजरा व लाख लाख दंडवत. अत्यंत खंतावलेल्या मनाने आपल्याला हे निनावी पत्र लिहीत आहे. पत्राखाली नाव नसले, तरी आपण समजून घ्याल, अशी आशा आहे. कारण, आपण फार सुस्वभावी व सुसंस्कृत व संवेदनशील आहात, असे मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन तुम्ही त्यांना भेटून आलेला आहात. म्हणूनच, धीर करून हे पत्र लिहीत आहे.

साहेब, मी या महाराष्ट्राचा साधासुधा सिंपल आमदार आहे. नुसता सिंपल नसून काँग्रेसचासुद्धा आहे. काँग्रेसवाल्यांचा तसा फारसा त्रास नसतो. द्याल ते घेणारी आम्ही माणसे! दिलेत तरी तुमचेच, न दिलेत तरीही तुमचेच!! पण, गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘बंपर सेल’मध्ये मंत्री झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरचे प्रशस्त दालन नकोसे झाले आहे, हे ऐकून वाईट वाटले. सदरील दालन अपशकुनी असल्याचा भ्रम पसरला असून, ही सरळसरळ अंधश्रद्धा आहे, असे माझेही मत आहे. तथापि, अंधश्रद्धेवर माझा विश्‍वास नाही, ही राजकीय भूमिका झाली! एरवी भविष्य न बघता कोण निवडणुकीला उभा राहतो आणि जिंकतो? माझेच पाहा ना, निवडणुकीला उभा राहणार नव्हतो. पण, भविष्यवाल्याने माझी कुंडली बघून ‘यंदा राजयोग आहे’ असे सांगितले होते. त्या भविष्यवाल्याला मी भोंदू म्हणून घराबाहेर काढले! निवडणुकीनंतर सगळी गणिते बदलली आणि गेल्या आठवड्यात चक्‍क शपथ घेऊन मोकळा झालो! विधिलिखित कोणाला चुकते? असो.

नाही म्हटले तरी पुढाऱ्यांनाही हे शकुनबिकुन प्रकरण लागतेच!! महिना-दीड महिन्याच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर (एकदाचा) मंत्रिपदाचा शुभशकुन झाल्यानंतर दालनाला अपशकुनी ठरवण्यात काय पॉइंट आहे? असे म्हणण्यात काही पॉइंट नाही. तरी आपण खालीलपैकी काही उपाय करून पाहावेत, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. बघा, पटते का?
१. दालनाचे शुद्धीकरण करण्याची आवश्‍यकता आहे, असे वाटते. या दालनात गेलेला माणूस टर्म पुरी करीत नाही, असा समज पसरला आहे.
२. दालनाबाहेर एक लिंबू व दोन मिरच्या टांगून ठेवाव्यात. 
३. दालनाच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल ठोकावी.
४. दालनाच्या नैॡत्येला किंवा ईशान्येला किंवा वायव्येला रंगीत माश्‍यांची टाकी ठेवावी. (फेंगशुईच्या लोकांकडून दिशा ठरवून घ्यावी. देखभालीचा खर्च सा. बां. वि.कडे द्यावा.)
५. एक फुलटाइम वास्तुतज्ज्ञ मंत्रालयात नेमावा! त्याला ओएसडी म्हणून नेमणूक द्यावी!
६. बजेटमध्ये बसत असल्यास दालनाची उदकशांत करावी. तेथे गोरगरिबांस शिवभोजन द्यावे.
७. राष्ट्रवादीचे लोक पक्‍के असतात. त्यांच्यापैकीच कोणाला ते दालन ॲलॉट करावे! 
८. एखादा मंत्री खातेवाटपानंतर अडचणीचा ठरू लागल्यास त्याला ‘६०२’मध्ये आत टाकीन’ अशी धमकी द्यावी! 
९. वास्तविक, हे दालन तीन हजार चौ. फू. इतके प्रशस्त असून, तेथे कॉन्फरन्स रूम, अँटिचेंबर अशा उत्तम सोयी आहेत! सदरील दालन मा. मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या समोरच आहे. तेथे अभ्यागतांसाठी स्वतंत्र कक्ष करून टाकावा. अभ्यागतांच्या कक्षात पब्लिकच येणार! ते हवेय कोणाला? तेव्हा पब्लिकलाच ते दालन देऊन टाकावे! पुढचे सारे नियती बघून घेईल!
१०. मला मंत्री करता का? मी त्या दालनात जायला तयार आहे!
...कळावे. आपला नम्र दालनेच्छू आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT