Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : पुन्हा पुन्हा हरि ॐ!

ब्रिटिश नंदी

नेमकी तिथी सांगावयाची, तर विकारी संवत्सरातील श्रीशके १९४२तील माघ नवमी. इयें दिशी इतिहासाने नुसती कूस वळली नाही, तर इतिहास पलंगावर उठोन बसला, मग पायाच्या दिशेला उशी नेवोन पुन्हा उलटा झोपी गेला..! ऐसा दिवस संवत्सरात कधीही कधीही कधीही ना उजाडला, ना मावळला!

इये दिशी महाराष्ट्राच्या राजकारणाने नवे वळण घेतले. नवा झेंडा हाती घेतला. नवी तलवार उपसली!...
गोरेगावच्या नेस्को रणांगणात सैन्य जमू लागलेले. चहू बाजूस ढोल-नगाऱ्यांचा दणदणाट आणि कर्ण्यांचा खणखणाट. छातीवर बाराबंदी असती तर तटतटा तुटोन लोंबू लागली असती. बाहु फुर्फुरत होते. श्‍वास छाताडात मावत नव्हता. डोळियांत अंगार होता. आसमंत जणू विजेने भारलेला. 

‘नासा’च्या उपग्रहातून पाहिले तर नेस्को रणांगणावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे चित्र बघायला भेटले असते, या शास्त्रोक्‍त विचारानिशी आम्ही गर्दीत घुसलो. समोरील मनसैनिकाची तलवार आमच्या मांडीस कचकचून टोंचिली. आम्ही विव्हळलो. अयाईगंऽऽऽ...

‘मर्दा, विव्हळायास काय जहाले?’’ पुढील मनसैनिक डर्काळला. त्याला काळीभोर दाढी होती. आम्ही निमूट राहिलो! पुढे पुढे ढकलाढकली करीत राहिलो. मागील मनसैनिक उलटा माघारी फिरल्यास काय करायचे? या विवंचनेतच आम्ही मांडवात शिरलो.  विशाल मंडपात शिरताच अतिप्रचंड असा मंच दिसो लागला. मंचावर तीन तीन पडदे होते व त्यावर तारे चमकत होते. आजदेखील ‘लाव रे तो व्हिडिओ’चा रंगारंग कार्यक्रम आहे की काय? या विचाराने आम्ही चकित जाहलो. पण नाही, तसे काही नव्हते.

तेवढ्यात मंचावर ते अद्वितीय व्यक्‍तिमत्त्व अवतरले. युगपुरुषांच्या प्रतिमांना वंदन करोन त्यांनी नवा ध्वज पडद्यावर फडकवला. भगव्याचे नवे रुप पाहोन आम्ही नतमस्तक जाहलो. ध्वजाच्या हृदयस्थानी महाराजांची राजमुद्रा झळकत होती. ‘‘प्रतिपश्‍चंद्रलेखेव...’’
‘‘ते काय लिहिलंय?’’ पुढील मनसैनिकाने भाबडेपणाने विचारले. राजमुद्रा वंदनीय असली, तरी ती वाचनीय असणे आवश्‍यक आहे. बराच प्रयत्न करून त्या मनसैनिकाने नाद सोडला. येवढी जोडाक्षरे एकठेपी एकसमयावच्छेदेकरोन वाचणे तसे जिकिरीचेच. असो.

नवीन ध्वजाच्या अनावरणानंतर नृत्यादी रंगारंग कार्यक्रम पार पडले. नाही म्हटले तरी आम्हीही गर्दीतल्या गर्दीत थोडका ठेका धरिला. पक्षाचा नवा झेंडा नाचिवण्याचे काम आमच्याकडे होते. परंतु, एक-दोघा मनसैनिकांनी ती जबाबदारी स्वत:कडेच घेऊन ठेविली.

इथे आमच्या आनंदोत्साहाला पारावार उरला नव्हता. छाती फुगून फुगून इतकी फुगली की आता आणखी फुगणे जवळपास अशक्‍य होते. तेवढ्यात मंचावरोन कार्यकर्त्यांसाठी भोजनाचा बेत ठेवण्यात आल्याची फर्मास घोषणा करण्यात आली. उजवीकडे कार्यकर्त्यांनी जावे आणि डावीकडे पत्रकारांनी जावे, अशी सूचना वारंवार व नम्रपणे करण्यात येत होती. आम्ही दोन्हीकडे थोडे थोडे जाऊन येण्याचे ठरवले...

एवढ्यात तो ऐतिहासिक क्षण येवोन ठेपला. अचानक मंचावर गडबड उडाली आणि महाराष्ट्राचे युवा नेतृत्त्व म्हणून चि. अमितराज यांची निवड जाहीर करण्यात आली. तलवार उपसून चि. अमितराज यांनी एंट्री घेतली. टाळ्यांचा कडकडाट झाला. जयकाराचा पर्जन्य कोसळला.  ते दृश्‍य पाहोन आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शेजारी भगव्या कुडत्यातील अविनाशाजी उभ्यंकर होते. ते आपले दोन्ही हात मनगटापासून खांद्यापर्यंत चोळत होते. आमच्याकडे बघून म्हणाले, ‘‘सकाळपासून अंगावर शहारा येतो आहे नै?’’
खरे, सांगतो, दिवसभर त्याच अवस्थेत साळिंदरासारखे मांडवात फिरत होतो. इतिहास घडताना असे होते, म्हणे. इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT