Dhing-tang 
satirical-news

ढिंग टांग : छप्पर फाडके मुलाखत!

ब्रिटिश नंदी

मा. मु. साहेबांची मुलाखत आम्ही घेतली. ही मुलाखत एवढी स्फोटक होती की त्यामुळे महाराष्ट्र हादरला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत घबराट उडाली. इतकी की ‘मुलाखत थोडी कमी तिखट करत जा,’ असा सल्ला आम्हाला देण्यात आला. त्याप्रमाणे आम्ही मुलाखतीच्या आगजाळ रश्‍शात थोडा गूळ घातला!! ही गूळ घातलेली मुलाखत आम्ही वाचकांसाठी अंशत: देत आहो! पूर्ण मुलाखत वाचली तर वाचकांना भलभलत्या व्याधी जडतील आणि एका जागी बसणे मुश्‍कील होईल, म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे.

मुलाखत दिलखुलास, खेळीमेळीच्या वातावरणात आणि सडेतोड झाली, हे ओघाने आलेच! साहेबांची मुलाखत अशीच असते. वाचा! (आणि भोगा फळे!!) :
आम्ही : (कोचावर नम्रपणे ऐसपैस पसरत) वडे, भजी मागवा काहीतरी!
साहेब : (शिवशिवणारा हात रोखत) आधी प्रश्‍न विचारा!
आम्ही : (सहजपणे)...सध्या काय चाल्लंय?
साहेब : (कोचावर चोरून बसत) आराम!
आम्ही : (च्याट पडत) आराम?
साहेब : (दिलखुलासपणे) परवाच महाबळेश्‍वरला तीन दिवसांसाठी गेलो होतो...
आम्ही : चंगळ आहे एका माणसाची! सिनेमे काय, महाबळेश्‍वर काय..! मागल्या दाराने थेट सत्तेत आलात...
साहेब : (गंभीरपणे) मागल्या दारानं कशाला येऊ?
आम्ही : (कुतुहलाने) मग?
साहेब : (शांतपणे)...छपरातून पडलो!
आम्ही : (इथे अनवधानाने वर बघत) अस्सं होय!
साहेब : (करड्या सुरात) पुढले प्रश्‍न विचारा!
आम्ही : कारभार व्यवस्थित सुरू आहे ना? महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तरं द्यावी लागणार आहेत, म्हणून विचारतोय!
साहेब : (खांदे उडवत) हा प्रश्‍न तुम्ही राष्ट्रवादीवाल्या दादासाहेबांना विचारा!
आम्ही : (खवचटपणे) अचानक सत्तेत आल्याचा धक्‍का पचवताय वाटतं सध्या!!
साहेब : (कठोरपणे) आम्ही धक्‍के देतो, पचवत नाही!! राजकारणात थोडीफार धक्‍काबुक्‍की व्हायचीच!
आम्ही : (चिकित्सकपणे) कुणी कुणाला धक्‍का दिला आणि कोणी कोणाला बुक्‍की दिली? 
साहेब : (मूठ आवळत) नीट विचारा प्रश्‍न...नाहीतर तुम्हालाच बुक्‍की देईन!
आम्ही : (सावरून बसत) सॉरी! तुमच्या जुन्या मित्राने वचनभंग केला म्हणून नाइलाजाने तुम्ही सत्ता स्वीकारलीत, असं तुम्ही म्हणाला होता! ‘हिंदुत्व कुणाची मालमत्ता नाही आणि आम्हाला कोणी नैतिकता शिकवू नये’ असंही तुम्ही म्हणाला होता...
साहेब : (गोंधळून) मी म्हणालो होतो?
आम्ही : (ठामपणाने) अर्थातच! उगीच प्रश्‍न विचारतोय का? सांगा, सत्तेत का आणि कसे आलात?
साहेब : सांगितलं ना मघाशी...छपरातून उतरलो!!
आम्ही : तुम्ही निवडणूक लढवणार आहात का?
साहेब : (मवाळपणे) कशाला उगाच?
आम्ही : सांगितलंच पाहिजे! आज महाराष्ट्राला कळलं पाहिजे की राज्य बदललं आहे! आपलं सरकार आलं आहे! शब्द मोडणाऱ्यांना चांगला दणका मिळाला आहे! हिंदुत्व काही कुणाची मालमत्ता नाही! कुणीही नैतिकता वगैरे आम्हाला शिकवू नये...वगैरे वगैरे! सांगा की सांगा!
साहेब : भले! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे! 
आम्ही : (हनुवटीवर तर्जनी ठेवत स्टायलीत) उत्तरं माहीत असल्याशिवाय आम्ही प्रश्‍न विचारत नसतो!!
साहेब : (खवळून) हो ना! मग तुम्हीच प्रश्‍न विचारा आणि तुम्हीच उत्तरं द्या! 
आम्ही : (सावध होत) असं कसं चालेल? तीन दिवस चालणार आहे ही म्यारेथॉन मुलाखत!
साहेब : (ताडकन उठत) तुम्हाला आत सोडलं कोणी?
आम्ही : (ओशाळून) त्याचं काय आहे...आम्हीसुद्धा छपरातूनच आलो!! जय महाराष्ट्र!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT