Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : अजून आहे बरेच बाकी...!

ब्रिटिश नंदी

बरेच गेले वाहुन तरीही
अजून आहे बरेच बाकी
या मुलखाच्या पल्याड आहे,
राजस दुनिया सुवर्णवर्खी 

या वाटेवर वळण भयानक
खडे बोचरे अन्‌ काटे
आणि विषाच्या चुळा टाकितो
सर्प बिळातचि फुंफाटे

सहस्त्र कोडी टाकुनि जाती
सटवाईची विधिलिखिते
उडवुनि लावा तारेवरची
अमंगळाची दिवाभीते

हजार जिव्हा लवलवती
अन्‌ हजार येती प्रश्न इथे
त्या सगळ्याला एकच उत्तर
शुभंकराची शुभगीते

पांघरुणी तो देह कोंबुनी
कशास कुढसी फुकाफुकी
दे फेकून ते मळके अस्तर
पहा नीट ही रहाटकी
अजूनही फुलतात बागिचे
अजुनि केवडा घमघमतो
रातराणीला वेड लागते
पारिजातही फुलारतो

आभाळाच्या भाळावरती
झनन झांजरे खुळेच मेघ
नि:शब्दाच्या क्षितीजावरती
बगळ्यांची अन्‌ सुरेख रेघ

अजून पाणवठ्यावर ओला,
मस्त नाहातो उन्हात घाट
अजून आहे आतुरलेली
रंगफुलांची पाऊलवाट

पानावळीच्या आडोश्‍याला
अजून असते मंजुळ गान
घरट्यामधल्या संसाराला
किनखापाचे पिंपळपान
पहा, मृगांचा कळप निघाला
ओलांडुनिया तुझीच वाट
पहा, रानभर मोरपिसारा
फुलुनि दावितो जुनाच घाट

थेंब टपोरे वळवाचे अन्‌
तुझ्या टपकती भाळावर
नभातले ते देणे सुंदर
आले तुझिया दारावर

अजूनही मोहरते अंबर
अंग भुईचे शहारते
कूस वळवुनी सैल मनाने 
अंग टाकुनि थर्थरते

पथदीपांच्या रांगेमध्ये
श्वास सोडते सडक अकेली
वाट पाहते आतुरतेने
रहदारीची ती अलबेली

बंद दुकाने बंद जीविते
बंद माणसे, बंद मने
बंदिस्तांच्या बंदिगृहातच
मौनाची ही विशेषणे

परंतु, असल्या बंदीगृहातच
मुक्त उसळते काहीतरी
पल्याडचा तो मुलुख सख्या रे
बोलवितो तुज पहा तरी

म्हणून म्हणतो
 कशास आता
काळोखाचे उगाच कीर्तन
क्षितिजावरती 
आणि उद्याच्या
दीपोत्सव चाले रात्रंदिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT