Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : आमचे लसलसते संशोधन!

ब्रिटिश नंदी

‘जो आत्मस्तुतीत रमला, तयाचा बॅंडहो वाजिला’ असे कुणीतरी म्हणून ठेवले आहे. बहुधा आम्हीच म्हणून ठेवले असेल. काय काय म्हणून आम्ही लक्षात ठेवणार? ज्ञानपिपासू माणसाचे असेच होते. नेमके कोठून आपण ज्ञानकण वेंचले, हेच विसरायला होते. उदाहरणार्थ, आम्ही! गेल्या काही दशकांमध्ये आम्ही इतके लिखाण आणि इतके संशोधन करून इतके शोध लावले आहेत, की आम्ही ते हल्ली मोजणेच सोडून दिले आहे. किती मोजणार? आता तुम्ही म्हणाल, की आम्ही फेकूगिरी करतो. पण वाचकहो, तसे नाही. केवळ आत्मस्तुतीचा दोष नकोसा वाटल्याने आम्ही कधी आमचे शोध जाहीर करीत नाही. 

साधे सर्दी-पडशाचे उदाहरण घ्या. या साध्याशा आजाराला ‘कॉमन कोल्ड’ असे म्हणत असले, तरी त्यास औषध नाही, असे अलोपथिक तज्ञ छातीठोकपणे सांगत असतात. आम्ही त्यांना हंसतो! कारण सर्दी-पडशावरचे जालीम औषध आम्ही ऐन तरुणपणीच शोधून काढले असून, प्राय: दर सायंकाळी आम्ही ते घेत असतो. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या ‘दो बूंद जिंदगीके’ या घोषवाक्‍याप्रमाणे आम्हीही ‘दो गिलास जिंदगीके’ अशी ट्यागलाइन लावून या औषधाचा प्रचार करू शकलो असतो. पण आत्मस्तुतीचे कलम आड आले...असो. 

सर्दी-पडशाचे सोडून द्या, निद्रानाशावरदेखील आम्ही लस शोधून काढली. आम्ही हुडकलेली दवाई घेतल्यावर माणूस कलंडला नाही, असे होऊच शकत नाही. अनेकदा हे औषध जास्त मात्रेत घेतल्यामुळे आम्हाला अनेक रात्री गटारात झोपून काढाव्या लागल्या आहेत. पण या दवाईची जाहिरातदेखील आम्ही कधीच करीत नाही. उगीच कशाला आत्मस्तुती ओढवून घ्या? 

सध्या कोरोना विषाणूचा खात्मा करणारी लस शोधण्याची शर्यत जगभर लागली आहे. भलभलत्या देशाचे भलभलते संशोधक सूक्ष्मदर्शकाला डोळा लावून लशीचा फार्म्युला शोधू पाहात आहेत. पांढरे कोट घालून प्रयोगशाळेत परीक्षानळ्या हलवत बसले की लस तयार होते, असे त्यांना वाटत असेल तर परमेश्वर त्यांना क्षमा करो!! 

जिथे कोरोना विषाणूचा जन्म झाला, त्या चायनात लस तयार असल्याचे वृत्त आले. अमेरिकेतील एका औषध कंपनीने आपल्या लशीमुळे कोरोनाबाधित ठणठणीत बरा झाल्याचा दावा केल्याने भलतीच खळबळ उडाली आहे. बांगलादेशातही औषध सापडल्याची खबर आहे. परवा कुणीतरी आमच्याकडे साबुदाण्याच्या गोळ्या पाठवून तीन दिवस घेतल्यास कोरोना पळेल, असा होमेपाथिक दावा केला. सक्काळी सक्काळी चहाच्या आधी या गोळ्या पोटात घेण्यात याव्यात, असा त्यांचा आग्रह असल्याने आम्ही त्या गोळ्या घेऊ शकलो नाही. कां की सकाळच्या चहाच्या आधी आम्हाला काहीच होत नाही!! जाऊ दे, झाले! 

एका तज्ञ डागतराने आम्हाला रोज सकाळी लिंबू सालीसकट किसून त्याचे सरबत करून प्यायल्यास कोरोनाची बाधा होणे अशक्‍य असल्याचे सांगितले. रात्री निद्रानाशाची लस घेतल्यावर सकाळी कधी कधी लिंबूपाणी घेणे वेगळे आणि हे वेगळे! सांप्रत आम्ही आम्ही लशीच्या संशोधनाच्या नावाखाली चाललेल्या जागतिक धावपळीकडे विचक्षक दृष्टीने पाहात आहो! मंद मंदपणे हंसत आहो!! कारण, या लशीचा शोध शेवटी आम्हालाच (पक्षी : आत्मनिर्भर भारतात) लावावा लागणार हे उघड आहे. 

परदेशी संशोधकांनी लस शोधल्याचे जाहीर केल्यावर आम्ही त्यांची पोल खोलणार आहो! शोध लागला रे लागला, की हे औषध आम्ही फार प्राचीन काळीच शोधून काढले होते, हे आम्ही लगेच जाहीर करू! आहे काय नि नाही काय!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT