Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : येवा, दिल्ली आपलीच आसा!

- ब्रिटिश नंदी

प्रिय नानासाहेब फ. यांसी शतप्रतिशत प्रणाम. तांतडीने पत्र पाठवण्याचे कारण की, काही जोरदार घडामोडी घडू लागल्या आहेत. कालच माझ्या घरी एका अज्ञात इसमाने एक चिठ्ठी आणून दिली. तोंडावर मास्क असल्याने मी त्या इसमास ओळखू शकलो नाही. ‘सावध रहा’ असे पुटपुटत तो इसम चटकन दिसेनासा झाला. चिठ्ठीची घडी उघडून बघितली. कागदावर एक कविता आढळली. कविता अतिशय टुकार, भिकार आणि टिनपाट आहे. त्यातून कसलाही बोध होत नाही. शब्दरचनाही सदोष आहे. असल्या थर्डक्लास कविता ज्या भाषेत कविमंडळींना ‘होतात’, तिला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळणार? या चिंतेने मला ग्रासले. असो. कवितेचे चिठोरे तुम्हाला पाठवत आहे. काही बोध होतो का ते कळवावे. एकंदरित काही घडामोडी घडताहेत असे फीलिंग मात्र येत आहे.

कळावे. आपला. चंदुदादा कोल्हापूरकर

(पुणे ब्रांच)

(गोपनीय कविता- वांचून नुसती नव्हे, टराटरा फाडावी! )

शिंधुसर्सुतिचा झाला संगम, धुणे धुवावे त्या घाटावर

दुबार नाही मिळणे संधि दु,र्गती जाईल निघून भरभर

चावी बसली, कळ हो फिरली,

सळोपळोचे दिवस संपले

रगडत दाढा वदेल राजा, ‘दादा, आले, दादा आले!’

रडत राऊते हसती हसती, निवृत्तीचा कशास टेंभा

घालमेल इंद्राची बघुनि, लाजुनि आली ती बघ रंभा

आवशीक खाव म्हणेल कोणी,

हेचि मम काय तपातपाला!

येवा, दिल्ली आपलीच आसा!

तुम्ही हरी हरी करीत बसा!

-कवि अज्ञात

आदरणीय मा. दादासाहेब कोल्हापूरकर, कमळाध्यक्ष यांसी बालके नानासाहेबाचा शतप्रतिशत प्रणिपात विनंती विशेष. तुम्ही पाठवलेले गोपनीय पत्र आणि त्याहूनही अधिक गोपनीय अशी कविता वाचून काढली. भिंगातून बघितले असता असे लक्षात आले की, कवितेच्या प्रत्येक ओळीतील दोन्ही चरणांचे आद्याक्षर जोडत गेले तर ‘शिंधुदुर्गचा सरदार निघाला आहे’ असा निरोप वाचता येतो. मला वाटते की आपले कोकणचे सुपुत्र (पुत्रपौत्र समाविष्ट) मा. नारोबादादा हे कालच तांतडीने दिल्लीला रवाना झाले असून केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चेत आला आहे. त्यासाठीच ते तेथे गेले असावेत. त्यांना अवजड उद्योग खाते मिळणार, असे संकेत आहेत. मिळू देत, मिळू देत!..हाच इशारा सदर कवितारुपी गुप्त संदेशात देण्यात आला आहे. तो संदेश डिकोड करण्यात मला यश आले याचे कारण मी मुळात प्रचंड हुशार आहे! असले अनेक संदेश मला सुरवातीला येत असत. (हल्ली बंद झाले आहेत!) मा. नारोबादादा यांची केंद्रात सोय लागण्याची वाट मी गेले अनेक दिवस पाहातो आहे. मागल्या खेपेला मा. मोटाभाई यांनी मालवणात येऊन ‘दादांवर अन्याय होऊ देणार नाही’ असे सांगून अन्याय कंटिन्यू ठेवला होता. आता त्यांचे पुनर्वसन (की जीर्णोध्दार?) होण्याची शक्यता दिसते. मा. नारोबादादा दिल्लीला गेले की मगच मी इथे, महाराष्ट्रातील सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करायला घेणार आहे. काळजी नसावी. हे सरकार आपल्या कर्माने (आणि वजनाने) पडेल, आणि स्वत:चाच करेक्ट कार्यक्रम करेल, असे वाटते. बघू या काय होते ते! करेक्ट कार्यक्रम झाला तर तुमचे महसूल खाते नक्की आहे. थँक्यू आणि बेस्ट लक.

सदैव तुमचाच.

नानासाहेब फ.

ता. क. : ही कविता मीच तुम्हाला पाठवली होती! हाहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT