Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : नाना, अण्णा आणि आप्पा...!

ब्रिटिश नंदी

आटपाट नगर होते. तिथे तीन भावंडे गुण्यागोविंदाने नांदत असत. जॉइण्ट फ्यामिली होती. तिन्ही भाऊ कर्तबगार होते. एक होता लहाना, त्याला नाना म्हणत. मधला होता, त्याला अण्णा म्हणत, आणि सर्वात थोरल्या बंधुराजांस आप्पा म्हणायची रीतच पडून गेली होती.

आप्पासाहेबांचा रुबाब मोठा. कर्त्या पुरुषासारखे ते सुपारी कातरत एका खुर्चीत बंगल्यावर बसत. आल्यागेल्याचा मुजरा घेत. चहापाणी बिलकुल विचारत. अण्णासाहेब किंवा नानासाहेबांना त्यांचा धाक वाटे. आप्पासाहेबांचा खडुसपणा त्यांना पसंत नव्हता, पण मुकाट सहन करत होते. का? तर आप्पासाहेब हे थोरली पाती ना!!

मधले जे अण्णासाहेब, ते महाबिलंदर होते. बरेच उद्योग करुन त्यांनी घर बरकतीला आणले होते. ते मनाशी म्हणत, माझ्यामुळे या घराला चांगले दिवस आले, पण आप्पासाहेबांच्यापुढे नमते घ्यावे लागते, हा अन्याय आहे. मनातला हा विषाद ते बाहेर बोलून दाखवत. पण घरी मात्र चिडीचूप! का? तर अण्णासाहेब पडले मधली पाती ना!!

नानासाहेबांची तऱ्हाच वेगळी होती. वास्तविक धाकटा म्हणून त्यांचे कोडकौतुक व्हायला हवे. पण उलटेच घडत होते. दरवेळी नानासाहेबांना पड खावी लागत असे. निर्णय अण्णासाहेब घेऊन टाकत आणि आप्पासाहेबांच्या कानावर घालत. आप्पासाहेब नुसते ‘हं’ म्हणायचा अवकाश, अंमलबजावणी होऊन जात असे. नानासाहेबांना कोणीही विचारत नसे. कां? तर नानासाहेब धाकली पाती होते ना!!

एक दिवस अण्णासाहेब अचानक भडकले. म्हणाले, ‘‘लेको, हा आप्पा काय गमजा मारतो? दोन कवड्या कमवून घरात आणत नाही, आणि म्हणे मी थोरला! ते काही नाही, आजपासून या घरात मीच मोठा! यापुढे सगळ्यांनी माझे ऐकले पाहिजे. कळलंऽऽ...!’’

अण्णासाहेबांनी असा पवित्रा घेतल्याने सर्वांचे धाबे दणाणले. नानासाहेब तर गोंधळूनच गेले. ते अण्णासाहेबांना भेटून म्हणाले, ‘‘भावंडांमध्ये तू मोठा, मी छोटा, असा भेदभाव करु नये. अहंकार बाळगू नये. ॲक्चुअली, मी सगळ्यात मोठा आहे, पण कधी तसं बोलतो का? मान खाली घालून निमूटपणाने राहातो की नाही एकीनं? कळलंऽऽऽ...’’ बोलता बोलता नानासाहेबांनी आपले थोरलेपणाचे घोडे पुढे दामटल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. कोणी कोणाचे ऐकेनासे झाले.

थोरले आप्पासाहेब खुर्चीत, नेहमीप्रमाणे सुपारी कातरत बसून राहिले. बऱ्याच वेळानंतर सुपारी तोंडात टाकत आप्पासाहेब म्हणाले की, ‘‘कोण थोरला, कोण धाकला? कसं ठरवणार?’’

नानासाहेब म्हणाले, ‘‘ज्याची उंची जास्त, तो थोरला!’’ तिन्ही भाऊ उंचीने सणसणीत होते, पण तरीही नानासाहेब अंगुळभर उंचच होते. ती टेस्ट बारगळली.

अण्णासाहेब म्हणाले, ‘‘ज्याचं राजकीय वजन जास्त, तो थोरला!’’ तिघांचेही राजकीय वजन बरे होते. जेमतेम काही तोळ्यांचा फरक निघाला. मग तीही टेस्ट बारगळली.

आप्पासाहेब शांतपणे म्हणाले, ‘‘डीएनए टेस्ट करा!’’ आप्पासाहेबांची आज्ञा कोण मोडणार? शेवटी डीएनए टेस्ट पार पडली!

निष्कर्ष हाती आल्यावर मात्र सर्वांची तोंडे बघण्यासारखी झाली. डीएनए टेस्टचा निकाल गोंधळात भर टाकणारा होता. ते निष्कर्ष पुढीलप्रमाणे :

आप्पासाहेब हे थोरले नसून मधले आहेत, आणि अनुभवाने धाकले आहेत!

अण्णासाहेब हे मधले असले तरी वृत्तीने थोरले आहेत, पण स्वभावत: धाकले आहेत.

नानासाहेब हे खरेखुरे थोरले असूनही कर्तृत्त्वाने धाकलेच आहेत!

सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष : हे तिघे भावंडे अनुवंशशास्त्रीयदृष्ट्या एकमेकांचे भाऊ नाहीत, अगदी नातलगदेखील नाहीत! किंबहुना हे तिघेही तीन वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत.

अतएव, डीएनए चाचणीदेखील रद्दबातल ठरवली आहे. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT