dhing tang
dhing tang 
satirical-news

ढिंग टांग... आड्रेसी नॉट फाऊण्ड!

- ब्रिटिश नंदी

मा. अध्यक्षा महामॅडम यांच्या चरणी बालके नानासाहेब फडणवीसाचा शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. माझे पत्र हातात पडल्यावर तुम्ही उलटे सुलटे करुन बघणार, ‘प्रेषक का नाम व पता’ वाचून तुमच्या भिवया वक्र होणार, हे मला ठाऊक आहे. पत्र चुकीच्या पत्त्यावर आले आहे की काय, असा गैरसमज कृपा करुन होऊ देऊ नये. हे पत्र मला ‘७, लोककल्याण मार्ग’ या आड्रेसवर न पाठवता ‘१०, जनपथ’ याच पत्त्यावर पाठवायचे होते.

आमचे परमगुरु प्रधानसेवक श्री नमोजी यांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या आड्रेसवर परवा एक मोठे टपाल आले. ते तुमच्या स्वाक्षरीचे होते. (त्यावर इतर अठरा सह्यादेखील होत्या.) त्या पत्राबद्दल कळल्यावर आमचे एक ज्येष्ठ सहकारी (जे कोल्हापूरचे आहेत) म्हणाले की आपणदेखील त्यांना १८ हजार सह्यांचे पत्र पाठवू. मी म्हणालो की हव्यात कशाला १८ हजार सह्या? माझी एकट्याची सही पुरेशी आहे! ईश्वरसाक्ष सांगतो की मी माझ्या उण्यापुऱ्या आयुष्यात पहिल्यांदा ’१०, जनपथ, नवी दिल्ली’ या पत्त्यावर पत्र पाठवतो आहे. असे पत्र मी कधी पाठवेन, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते.

सर्वप्रथम माझी ओळख सांगतो- मी एक कमळ पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता असून (हल्ली) नागपूर येथे असतो. लॉकडाऊन उठला की पुन्हा (मुंबईला) येईन! पक्षकार्यानिमित्त माझे दिल्लीला अनेकदा जाणेयेणे होत असे. (हल्ली थांबले आहे.) अनेकदा मी तुमच्या निवासस्थानावरुन गेलो आहे, पण आतमध्ये येण्याचे धाडस झाले नाही. हल्ली विरोधी पक्षाचे लोक स्वत:च्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिण्याऐवजी दुसऱ्याच पक्षाच्या प्रमुखांना पत्रबित्र लिहितात, असे आढळून आले आहे. लोकशाहीचे हे रुप लोभस आहे!! आमच्या पक्षात असला पत्रसंवाद होत नाही. एका बंद खोलीत बोलणी करायची, आणि मामला खतम करायचा, अशी आमची पध्दत आहे! अर्थात आमच्या पक्षात संवादाचे पूल बांधण्याचे कंत्राट प्राय: रस्ते वाहतूक मंत्री (आणि तुमचे आवडते) मा. गडकरीसाहेब यांच्याकडेच असते. (पूल कसले? उड्डाणपूलच म्हणा! ) या पत्राद्वारे मीदेखील त्यांच्याप्रमाणे पुलाची एक वीट चढवावी, असा विचार माझ्याच बालमनात पुढे आला!!

आदरणीय महाम्याडम, वास्तविक ठरल्याप्रमाणे सगळे पार पडले असते तर मी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि सारे काही शिस्तबध्द आणि पारदर्शकपणे पार पडले असते. पारदर्शकता हा माझ्या कारभाराचा स्थायीभाव होता, हे आपल्याला आठवते का? कृपया आठवा!! परंतु, ऐनवेळी आपल्या पक्षाने अनैतिक राजकारणाला पाठबळ देण्याचा दुर्दैवी निर्णय त्यावेळी घेतला व घात झाला. आपण महाराष्ट्रातील परिस्थितीकडे अधिक लक्ष दिले असते तर मा. प्रधानसेवकांना पत्र लिहिण्याची वेळच आपल्यावर आली नसती!!

महाराष्ट्रातील कारभाराची परिस्थिती सुधारली तर केंद्रावरील (पर्यायाने परमप्रिय नमोजींवरील) ताण हलका होईल, व आपले राष्ट्र वेगाने पुढे जाईल, यात शंका नाही. तेव्हा, अन्य कुठल्याही पत्त्यांवर पत्रे पाठवण्याऐवजी योग्य पत्त्यावर पत्र पाठवलेत तर ‘आड्रेसी नॉट फाऊण्ड’ असा शेरा मारुन पत्र परत येणार नाही! सोबत दोन पत्ते देत आहे, कृपया तेथे पत्रे तातडीने पाठवावीत, आणि महाराष्ट्राचे कल्याण करावे. एक पत्ता बांदऱ्याचा असून दुसरा पेडर रोडचा आहे. कृपया कार्यवाहीच्या अपेक्षेत. मोठ्यांस सा. न. आणि लहानांस अ. उ. आ.!!

कळावे आपला नम्र. नानासाहेब फ. (सध्या नागपूर आड्रेस. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT