shiv sena navneet rana ravi rana politics  sakal
संपादकीय

झुंडशाहीचे राजकारण

जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून नव्हे तर एका खासदार-आमदार दाम्पत्याने ‘हनुमान चालिसा’चे पठण कोठे करावयाचे, यासारख्या उपस्थित केलेल्या निरर्थक मुद्दावरून!

सकाळ वृत्तसेवा

जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून नव्हे तर एका खासदार-आमदार दाम्पत्याने ‘हनुमान चालिसा’चे पठण कोठे करावयाचे, यासारख्या उपस्थित केलेल्या निरर्थक मुद्दावरून!

अखेर शिवसेनेला आपल्या मूळच्या म्हणजेच स्थापनेनंतरच्या पहिल्या दोन-अडीच दशकांतील ‘राडा संस्कृती’कडे नेण्यात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. तेदेखील राज्याच्या जनतेसमोरील कोणत्याही महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून नव्हे तर एका खासदार-आमदार दाम्पत्याने ‘हनुमान चालिसा’चे पठण कोठे करावयाचे, यासारख्या उपस्थित केलेल्या निरर्थक मुद्दावरून! आज अवघा महाराष्ट्र कडाक्याच्या उन्हाळ्याने त्रस्त आहे. भारनियमनाची टांगती तलवार जनतेला अस्वस्थ करत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई तसेच बेरोजगारी या प्रश्नांनी जनतेला ग्रासले आहे. अवकाळी पावसाच्या सरी आंब्यासारख्या नगदी पिकाला मातीमोल करून टाकत आहेत. अशी आव्हानात्मक स्थिती असताना राज्याच्या सत्तेतील प्रमुख पक्ष शिवसेना आणि विरोधी बाकांवरील भाजप, हनुमान चालिसा पठणाच्या मुद्दावरून राज्याला वेठीस धरू पाहत आहे. कोणत्या प्रश्नावर किती वेळ खर्ची घालावयाचा याचे भान प्रसिद्धी माध्यमांनाही उरले नाही. अडीच वर्षांपूर्वी भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेने हिरावल्यापासून या पक्षाचे नेते कमालीचे बेचैन आहेत. सत्तेत प्रमुखपद घेऊन मोठ्या थाटाने राज्यकारभार करणाऱ्या शिवसेनाप्रणित ‘महाविकास आघाडी’च्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे भाजपचे अकटोविकट प्रयत्न सातत्याने सुरूच असतात. त्यासाठी भाजपने नारायण राणे यांच्यापासून किरीट सोमय्यांपर्यंत अनेक प्यादी मैदानात उतरवली, तरीही हे सरकार चिवटपणाने टिकून राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर भोंग्याचा वापर आणि हनुमान चालिसा हे मुद्दे उपस्थित केल्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तेच राजकारण विदर्भातील अमरावती शहरातील नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याने पुढे नेत भाजपला या बुद्धिबळाच्या पटावर किमान दोन घरे पुढे नेले आहे.

राणा दाम्पत्याने चार-सहा दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ या ठाकरे कुटुंबियांच्या खासगी निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण करण्याचा मनसुबा जाहीर केला आणि हे अर्थहीन राजकारण गतिमान झाले. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याचे रोजी-रोटीसह सारेच्या सारे प्रश्न एका झटक्यात अडगळीत जाऊन पडले आणि थेट रस्त्यावरचे झुंडशाहीचे राजकारण सुरू झाले. त्याची परिणती अखेर शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात झाल्याने भाजपच्या हाती आयतेच कोलित आले! त्यामुळे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कोलमडून पडली आहे, असा आक्रोश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या बोलक्या पोपटांनी सुरू केला आहे. सोमय्या यांच्या वाहनचालकाने शिवसैनिकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळेच अखेर ती चाल रोखण्यासाठी हा प्रकार घडला, या शिवसेनेच्या दाव्यात तथ्य आहे की नाही, हा प्रश्नही कोसो मैल दूर जाऊन पडला आहे. अशा प्रकारचे हल्ले मग ते कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर असोत त्यांचा कडक शब्दांत धिक्कार करायलाच हवा. मात्र, या चार दिवसांत राणा दाम्पत्याला मुंबईत मिळालेली कुमक आणि शिवसेनेने दाखवलेली झुंडशाही मन विषण्ण करणाऱ्या आहेत. खरे तर राणा दाम्पत्याकडे शिवसेनेने पूर्णतः दुर्लक्ष केले असते तर एकामागोमाग एक विरोधाची प्यादी उभी करण्याचे भाजपचे राजकारण उघडे पडले असते. मात्र, त्याऐवजी शिवसेनेला आपली ताकद दाखवण्याची खुमखुमी आली. गेले चार दिवस वांद्र्याच्या ‘मातोश्री’ परिसरात आणि राणा दाम्पत्याच्या अमरावती व मुंबईतील निवासस्थानाभोवती जे काही सुरू आहे, ती निव्वळ झुंडशाही आहे. त्याचा निषेधच करायला हवा. कारण या झुंडशाहीतून सत्ताधारी वा विरोधी पक्ष मतपेट्यांचेच राजकारण करत आहेत. महाविकास आघाडीच्या कारभारावरचे लक्ष अन्यत्र वेधले गेल्याने शिवसेनेलाही तेच हवे आहे काय, असाही प्रश्न उपस्थित होतोच.

विरोधी पक्षाचा आवाज हा लोकशाही राज्यव्यवस्थेत जनतेचा आवाज समजला जातो. जनहिताच्या प्रश्नांवरून या राज्यात शिवसेनेसह अनेक पक्षांनी उभी केलेली आंदोलने येथील जनतेने पाहिली आहेत. मात्र, शिवसेनाही भाजपने मोठ्या चलाखीने टाकलेल्या या जाळ्यात अलगद अडकली आहे. हे सारे रस्त्यावरचे झुंडशाहीचे राजकारण राज्यात राष्ट्रपती राजवट आणायला दारूगोळा पुरवू शकते, हे गृहीत धरूनच भाजपने ही खेळी केली, हे उघड आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही तशाच स्वरूपाचे विधान केले आहे. मात्र, त्याची जराही फिकीर न बाळगता शिवसेनेनेही आपण सत्ताधारी आहोत, याचे भान विसरून त्या झुंडगिरीत सामील होणे, ही अत्यंत अपरिपक्वतेची कृती आहे. मुंबापुरीत हे रणकंदन सुरू असतानाच, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसांचा मेळावा घेतला आणि तेथे पक्षाध्यक्ष शरद पवारांबरोबरच अर्थमंत्री अजित पवार यांनीही जनतेला ग्रासणाऱ्या प्रश्नांचा उहापोह केला. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस अधूनमधून आवाज उठवते, पण तो अत्यंत क्षीण आहे. इकडे मुंबईत मात्र निरर्थक प्रश्नावर खर्ची घालण्यासाठी तिसरा सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्याकडे वेळच वेळ आहे, असे चित्र या झुंडशाहीने उभे केले. त्यातून बाहेर पडून राज्यापुढील प्रश्नांची तड कधी लावणार हा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT