shrimanta mane write about farmers strike 
संपादकीय

दूध-भाज्यांचं काय; जिनगानीच्या नासाडीवर बोला! (वुई द सोशल)

श्रीमंत मानेshrimant.mane@esakal.com

महाराष्ट्रातला शेतकरी संप नुसताच ऐतिहासिक नाही, तर तो भविष्यातल्या ग्रामीण-शहरी संघर्षाची चुणूकही दाखवणाराही आहे. विशेषत: संपाच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपकऱ्यांवर तुटून पडलेले पांढरपेशे, अन्‌ त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारी शेतकऱ्यांची शिकली-सवरलेली मुलं यांच्यातल्या युद्धानं ती चुणूक अधोरेखित केली. निनावी, खोट्या नावांचे, तटस्थतेचा बुरखा चढवलेले अन्‌ बहुतेक सगळेच विद्वत्तेचा आव आणणारे. अशांना आपण "सायबर चाचे' म्हणू; संप सुरू होताच अन्नदात्याला चिडवत होते, चेष्टा करीत होते अन्‌ त्यातून ग्रामीण-शहरी, शेतकरी-मध्यमवर्गीयांमधली दरी वाढू पाहत होती. संपकऱ्यांवरील या "सोशल' हल्ल्यानं सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांना सुरवातीला गुदगुल्या झाल्या. पण हे फार काही चाललं नाही. दिल्लीत "जंतरमंतर'वर अगदी मलमूत्र प्राशनाचं आंदोलन करणारे तमिळनाडूचे शेतकरी प्रौढ, वृद्धत्वाकडे झुकलेले होते. महाराष्ट्रातल्या शेतकरी संपाचं तसं नाही. संपाचं नेतृत्व शेती व तिचं अर्थकारण, व्यवस्थेनं लादलेला अन्याय समजणाऱ्या तरुण पोरांकडे आहे. आंदोलनाचा चेहरा तरुण आहे.

त्याशिवाय सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची मोठी फळी सक्रिय आहे. नव्या माध्यमांचं तंत्र त्यांना अवगत आहे. त्यांनी बुद्धिभेदाचे प्रयत्न, "फेसबुकी' अपप्रचार उधळून लावला. "अरेला कारे' म्हणण्याचं धाडस दाखवलं. "फार्मर्सस्ट्राइक', "शेतकरीसंपावर' हे हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेडिंगमध्ये राहिले. "तुमचे सल्ले मेडिकलवाल्यांना, डॉक्‍टरांना, किंवा बॅंकवाल्यांना द्या; शेतकऱ्यांचा नाद करू नका. जे नांगर चालवू शकतात ते तलवार चालवतीलच; नव्हे निम्मे वर्ष शेतात व निम्मे रणांगणात, ही आमची परंपरा असल्याचं ठणकावणाऱ्या पोस्ट "व्हॉट्‌सऍप'वर टाकल्या. ""बहिऱ्यांना ऐकू जावं असं वाटत असेल तर आवाज मोठा लागतो,'' हे भगतसिंगांचे उद्‌गार टीकाकारांना ऐकवले. कुणी उपाशी राहावं म्हणून नाही, तर भविष्यात शेतकरी उपाशी राहू नये म्हणून संप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 आंदोलकांनी पहिल्याच दिवशी ओतून दिलेले दुधाचे टॅंकर, रस्त्यावर फेकून दिलेला भाजीपाला, रहदारीच्या चाकांखाली चेंदामेंदा झालेली फळफळावळं, टमाटरच्या लाल रंगात न्हाऊन निघालेल्या वाटा पाहून शहरांमधल्या मंडळींना दु:खाचे उमाळे दाटून आले होते. अर्थात अशी नासाडी करणं हे चूकच आहे. पण "अन्न हे पूर्णब्रह्म' वगैरे सांगत "हे शेतकरी असूच शकत नाहीत', अशी प्रमाणपत्रं या मंडळीकडून दिली जात होती. पण याआधी भाव न मिळाल्यानं टोमॅटोचा झालेला लाल चिखल, जनावरांना खाऊ घालाव्या लागलेल्या मेथी-कोथिंबिरीच्या जुड्या, बांधावर फेकलेल्या बटाट्याच्या राशी, उभ्या पिकांमध्ये सोडावी लागलेली जितराबं अन्‌ जाळावं लागलेलं कांद्याचं पीक, उपटून फेकलेल्या डाळिंबाच्या बागा त्यांना कधी दिसल्या नाहीत. "तेव्हा कुठं गेला होता तुमचा पूर्णब्रह्मचा धर्म', या प्रतिप्रश्‍नाचं उत्तर तेव्हा कुणाकडंच नव्हतं. शेतीमालाच्या नासाडीचं काय बोलता, अख्खी जिनगानीची नासाडी झाली. झाडाला लटकलेले मृतदेह, विहिरीत तरंगणारी कृश शरीरं अन्‌ स्वत:च चिता रचून त्यावर झोकून देणारे अभागी जीव, विहिरीवरच्या मोटारीच्या तारा हातात धरून केलेला आत्मघात यावर ही आपली व्यवस्था कधी बोलली नाही. तो साचलेला आक्रोश आता संपाच्या निमित्तानं बाहेर पडलाय. त्यासाठी तसंच संपाचं संघटन- समर्थनासाठी वापरला जाणारा सोशल मीडिया हे या ऐतिहासिक घटनेचं खास वैशिष्ट्य आहे. 

चार दिवस बळिराजासाठी... 
अर्थात, आंदोलकांना दिलासा देणारंही बरंच काही आहे. शहरांमधले सगळेच संपावर टीका करणारे नाहीत. मातीशी नात्याची आठवण देत इतरांच्या मध्यमवर्गीय जाणिवांना आवाहन करणारे खूप लोक आहेत. चार दिवस त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे. शेती-शेतकऱ्यांचं महत्त्व, अन्नदात्याच्या ऋणाची त्यांना जाणीव आहे. भलेही असे संप किंवा अन्य आंदोलनांचे या वर्गांचे नियम व संकेत वेगळे असोत. डॉक्‍टर संपावर जातात, तेव्हा आजारी लेकराला दवाखान्याच्या पायरीवरून परत नेण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. महसूल खात्याचे कर्मचारी संपावर जातात, तेव्हा सातबारा उतारा न घेताच घरी जावं लागतं. बॅंकांचे लोक संपावर जातात, तेव्हा खात्यात पैसे असून रिकाम्या हातानं परतावं लागतं. शिक्षक संपावर जातात, तेव्हा बंद शाळांकडे पाहून चुकचुकण्यापलीकडे हातात काही नसतं. मग शेतकरी संपावर जाताच इतक्‍या "मिरच्या का झोंबल्या', असा तर्कशुद्ध प्रश्‍न विचारणारे खरेतर फक्‍त राहायला शहरांमध्ये आहेत. ग्रामीण व्यथा-वेदनांच्या जाणिवांमधूनच ही भावना व्यक्त झालीय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT