sonali navangul
sonali navangul 
संपादकीय

...असं घडतं!

सोनाली नवांगुळ

ह ट्ट तर खूप होता, की रात्रीच्यावेळी समुद्र बघावा. इतरांशी नव्हे, स्वतःशीच. समुद्रावर गडद काळोखात गूढ, आकर्षक असं काही सोबतीसह वाचावं. आठवून सांगावं. समुद्राला भरती आलेली असावी. चंद्राचं अस्तित्व असावं... मनाजोगती सोबत नसेल तर समजूतदार एकांत लाभावा. आपणच आपल्याशी धडका देणारं काही लाटांच्या सोबतीनं किनाऱ्याशी येऊ द्यावं, वगैरे वगैरे. काही सोप्या वाटणाऱ्या गोष्टी घडून यायला उशीर लागतो कधीकधी. मग त्या उशिराच्या ताणलेल्या तारेत इच्छा हेलकावे खात, त्रास देत राहाते. नंतर हळूहळू बारीकसा विसर पडतो नि नव्या इच्छांच्या गर्दीत ती एक तुडुंब रोमॅंटिक खेच गुडूप होते. कधीतरी कोणत्यातरी खिन्न वेळी ती आठवली की दुखतं. हळूहळू ते दुखणंही गुडूप झाल्यासारखं होतं. इच्छा मनाच्या तळाशी सुप्त नि शांत पडून राहाते. तिला धक्का लागत नाही, सुख-दु:ख जाणवत नाही. गंमत अशी, की अशा तऱ्हेनं इच्छेला सहजसाधेपणाने सोडून दिलं की तिलाच सुचत नाही. तिला एकटं राहायला आवडत नाही. मग काही न कळवता- सवरता ती आपल्यासमोर अचानक उगवते. अशावेळी मात्र कुठले खटलेकज्जे न लावता तिच्या मिठीत शिरायचं.

तर झालं असं, की अलिबागला जेव्हा जेव्हा जाईन, समुद्रावर नक्की जायचं, हे मी लावून धरलेलं. तशी संकोची नाही मी; पण कधीकधी जुन्या किंवा समाजाच्या चाकोरीच्या ‘उपकारांच्या देवळां’चं स्मरण होतं नि कुणाला काही सांगावं वाटत नाही. मित्रमंडळींजवळ हळूच मी माझी समुद्राची इच्छा सरकवून ठेवलेली. कुण्णी बघेना तिच्याकडे. बोच, खिन्नता, त्रास, विसर, सुप्तावस्था सगळं टप्प्याटप्प्यानं झालं. या वेळी नव्या झालेल्या मित्रमंडळींनी सहजच समुद्राकडं जायचं ठरवलं. मी होतेच अग्रभागी उत्साही. समुद्रापर्यंत जायला नीट विनाअडथळा वाट; सोबत रसिक, बुद्धिमान, देखणे मित्रमैत्रिणी नि केशरीसा झालेला पूर्ण वाटोळा चांदोबा. रात्री बाराचा प्रहर. समुद्राच्या तोंडाशी असलेलं माडांचं बन. झावळ्यांचा नि समुद्राच्या गाजेचा भरून गेलेला आवाज. सावल्यांनी घातलेल्या पायघड्या. रात्रीच्या पक्ष्यांचे नि रातकिड्यांचे आवाज. खुळावल्यासारखं झालं की. थोडंसंचं पुढं गेल्यावर बाजूच्या कठड्यांच्या मधून समुद्राशी नजरभेट झाली. भरती पूर्णांगांनी उमलून आलेली. चंद्राची किरणं लाटांना ऐन जागी अशी चमकवून टाकत होती, की नजरबंदीच झाली. कुणीतरी गाणं सुरू केलं. बाकी शांतपणे स्वतःशी बसून आपलं आपलं गाणं गात असावेत. एकूण वातावरणानं ग्रेसच्या कवितेसारखं कळतंय- कळत नाहीसं, पण प्रगाढ चुंबकीय आकर्षण तयार केलं, की त्या उतारावरून थेट लाटेच्या चमकेवर जाऊन बसावं वाटत होतं.

इच्छांनी आपल्या आकर्षणानं पाठलाग करत आपल्यासमोर यावं नि आपण दुसरीकडेच हरवून बसलेलो असताना सर्वांग धुपवत आपल्याला मिठी घालावी असंही घडतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT