sampadkiy
sampadkiy sakal
संपादकीय

त्रेतायुगातील एक जन्मकथा...!

सकाळ वृत्तसेवा

ढिंग टांग

ब्रिटिश नंदी

अस्तमान सूर्यनारायणाची मंदावलेली उन्हे,

रघुकुल-प्रासादाच्या

पायदंड्यांवर रेंगाळलेली...

अंत:पुरातील दिव्या-दिवल्या लावण्याची

सुरु होती, प्रतिहारीची त्वरा...

प्रासादाबाहेरील उद्यानातील

श्वेतमयुर आणि कपोतांच्या मनीं

लागले होते घरट्यांकडे

परतण्याचे वेध.

निरोपाची किरणे अंगावर घेत

सरयुमाईचे पात्र वाहात होते निर्ममपणे.

अशावेळी एक वृध्द, एकलकोंडी स्त्री

गवाक्षामधून पाहात

टाकत होती उष्ण, कोरडे उसासे.

‘‘श्रीमन अयोध्यानाथ येत आहेत,’’

असे सांगून दासी चटकन फिरली मागे,

पाठोपाठ चंदनाचा परिमळ दर्वळला,

आणि निळीसावळी तेजस्वी मूर्ती

मंद पावले टाकीत आली आत.

‘‘माते, स्मरण केले होते?,’’ दूर कोठे

बासुरीचा नाद उमटावा, तशा

मृदू स्वरात विचारणा झाली.

‘‘दशरथनंदना, जो कधीही होऊ नये,

म्हणून मी इतका अट्टहास केला,

तो तुझा राज्याभिषेक पार पडला,

रामराज्य सुरु झाले! आता

मज वृध्देने इथं प्रासादसुखांच्या

मोहपाशात कां अडकून पडावे?

दूरस्थ एखाद्या वनात मी

उर्वरित आयुष्य घालवीन!’’

काहीशा खरखरीत स्वरात

मागणी उमटली, त्या स्वरात होते

थोडे वार्धक्य, थोडे कुटिलतेचे अवशेष,

आणि बराचसा कडवटपणा.

‘‘क्षमा असो, माते कैकई, पण

येथे तुजला काय कमी आहे?

कटुता माझ्या मनात तेव्हाही नव्हती,

आताही नाही, तुझ्याठायी मला

सदैव दिसले ते मातृत्त्व.

...ते तसेच आजही दिसते!’’

नकारार्थी मान हलवत ती

वृध्दा म्हणाली, ‘‘माझ्यात

असलेल्या आणि नसलेल्या

तथाकथित मातृत्त्वामुळेच

तर पुढले रामायण घडले!

तुझ्या रामराज्याला माझी

दृष्ट न लागो, म्हणून तर म्हणत्ये,

इथून पुढे मीच वनवासास जात्ये...’’

अधोवदन कौसल्यापुत्राने

विनम्रपणे तिचा सुरकुतलेला हात

घेतला आपल्या सुरक्षित हातात,

आणि तो म्हणाला, ‘‘माते, मंथरेने

तुझे कान भरले नसते, तर कदाचित

मीच घडलो नसतो...

लोकापवादाच्या भयाने तातश्रींनी

प्राणही त्यागले नसते...

अनुनयाच्या आविर्भावात अंगावर

आलेल्या शूर्पनखेचे नाक-कान कापून

तिला विद्रुप करण्याची पाळी

भ्राता लक्ष्मणावर आली नसती,

आणि कंचुकीच्या मोहापायी

सीतेने सुवर्णमृगाच्या पाठी

मला धाडले नसते...

दशग्रंथी विद्वान असूनही दशाननाने

केवळ बुध्दी फिरल्याने केले नसते

सीतेचे हरण, आणि हनुमंताला

अवघी लंका जाळण्याची संधीही

मिळाली नसती...

पण विधिलिखित कोणाला टळते, माते?’’

दीर्घकाळ कुणीही काही बोलले नाही.

शेवटी वृध्देनेच कठोरपणे प्रारंभ केला :

‘‘कौसल्येच्या मुला, रामराज्य सुरु झाले,

इथवर ठीक, परंतु, काल रात्री

एका रजकाने काय म्हटले,

ठाऊक आहे का तुला?

स्वपत्नीस ताडिताना तो म्हणाला की,

परक्या घरी राहून आलेल्या पत्नीचा

स्वीकार करायला मी काय

अयोध्येचा राजा नव्हे!!

...ऐकलीस का ती बाजारगप्प?’’

...एक गंभीर सुस्कारा दालनात घुमला,

ती निळीसावळी आकृती मंद पावलांनी

परतली, दिवे-दिवट्या तेवत राहिल्या,

त्यांच्या प्रकाशात वृध्देच्या

मुद्रेवरले कठोर स्मित अधिकच

भयप्रद भासू लागले...

- त्या क्षणी (त्रेतायुगात) सोशल मीडियाचा

जन्म झाला, अशी वदंता आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT