vikram gokhale Sakal
संपादकीय

व्रतस्थ अभिनेता

कलाक्षेत्रात छाप उमटवायची तर त्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करावे लागते आणि केवळ वारसा लाभला म्हणून सहजपणे यशस्वी होता येत नाही

सकाळ वृत्तसेवा

कलाक्षेत्रात छाप उमटवायची तर त्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करावे लागते आणि केवळ वारसा लाभला म्हणून सहजपणे यशस्वी होता येत नाही, या वास्तवाची जाणीव असलेल्या विक्रम गोखले यांनी अंगभूत गुणांना अपार परिश्रमांची जोड दिली आणि स्वतःची अशी ओळख संपादन केली. त्यांच्या निधनाने नाट्य व चित्रपटसृष्टीने एक मनस्वी कलाकार गमावला आहे. उंचापुरा बांधा, भेदक नजर, दमदार आवाज आणि आपल्या संयत अभिनयाने भूमिका जिवंत करण्याची हातोटी ही वैशिष्ट्ये असलेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले.

ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या गोखले यांनी सातत्याने वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका साकारत रसिकांना पूरेपूर आनंद दिला. सामाजिक जीवनात आवश्यक साधनशुचिता जपत व आपले सामाजिक दायित्व कायम पूर्ण करीत ते परिपूर्ण आयुष्य जगले. खरे तर, विक्रम गोखले यांच्या घराण्यात सिनेमा व रंगभूमीची मोठी परंपरा. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री, तर आजी कमलाबाई गोखले पहिल्या बालअभिनेत्री.

त्यांचे वडील चंद्रकांत गोखले प्रथितयश अभिनेते होते व एवढी मोठी परंपरा असूनही विक्रम गोखले यांना संघर्ष चुकला नाही. जगण्यासाठी पडेल ती कामे करावी लागली, मात्र त्याचा गवगवा त्यांनी कुठेही केला नाही. पुण्यात जन्मलेल्या व भावे हायस्कूल आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विक्रम गोखलेंनी ‘आग्र्याहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ आदी नाटकांतून बालकलाकार म्हणूनच अभिनय केला होता, मात्र मुंबईत अभिनेता म्हणून जम बसवण्यासाठी त्यांना अनेक उंबरे झिजवावे लागले. आपला ‘समृद्ध वारसा’ सांगत काम मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही.

‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातून त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला, मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ‘बॅरिस्टर’ या नाटकातून. विक्रम गोखलेंची अभिनयाची पद्धत माहिती असलेल्या विजया मेहतांना ते या भू्मिकेला न्याय देतील, असे वाटले नव्हते. मात्र एकदा या भूमिकेत शिरल्यानंतर त्यांनी कमाल करून दाखवली. ही आव्हानात्मक भूमिका ते रंगमंचावर जीव ओतून साकारत व प्रत्येक खेळाच्या शेवटी टाळ्यांचा कडकडाट मिळवत. त्यांचा रंगभूमीवरील हा प्रवास ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘स्वामी’, ‘महासागर’पासून त्यांचे शेवटचे नाटक ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकापर्यंत अव्याहतपणे सुरू राहिला. दुसरीकडे, मराठी चित्रपटसृष्टीला भारदस्त आवाज असलेला देखणा अभिनेताही मिळाला होता. ‘अनोळखी’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली व नंतरच्या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे आले. प्रेक्षकांना त्यांचा ‘कळत नकळत’ व ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील नायक लक्षात राहिला.

‘वजीर’ या गळेकापू राजकारणाचा पट उभा करणाऱ्या चित्रपटातील त्यांचा अभिनय कमालीचा प्रत्ययकारी झाला आणि पुरस्कारही मिळवून गेला. हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या, पण महत्त्वपूर्ण भूमिकाही ते साकारत राहिले. यात अमिताभ बच्चनपासून अक्षयकुमारपर्यंतच्या अनेक कलाकारांबरोबरच्या भूमिकांचा समावेश आहे. नाटक, सिनेमा व दूरचित्रवाणीवरील त्यांचा सातत्यपूर्ण वावर त्यांच्या चाहत्यांना आनंद देत राहिला. ‘गोदावरी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील निःशब्द अभिनयापर्यंत हा प्रवास सुरू राहिला. मध्यंतरी, ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकात अभिनय करताना रंगमंचावर संवाद म्हणताना त्यांना त्रास झाला व त्यांनी रंगभूमीवरून ‘एक्झिट’ घेतली. मात्र, त्यांनी ‘विक्रम गोखले ॲक्टिंग ॲकॅडमी’च्या माध्यमातून नव्या कलाकरांना घडविण्याचे व्रत कायम ठेवत हजारो अभिनेते तयार करीत सामाजिक भान जपले. अभिनयाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता व्रत म्हणून पाहणारा असा अभिनेता पुन्हा होणे नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT