Adha Hai Chandrama raat adhi  sakal
सप्तरंग

आधा है चंद्रमा, रात आधी...

गूढ, नीरव शांततेत निशाराणी पहुडली आहे...धरणीमातेला न्हाऊ घालणाऱ्या टिपूर चांदण्याचा मंदमंदसा प्रकाश आसमंतात पसरला आहे...

सकाळ वृत्तसेवा

गूढ, नीरव शांततेत निशाराणी पहुडली आहे...धरणीमातेला न्हाऊ घालणाऱ्या टिपूर चांदण्याचा मंदमंदसा प्रकाश आसमंतात पसरला आहे...आकाशातून ढगांमागून तिरक्या नजरेनं अवनीला न्याहाळणारा चंद्रमा सरोवरातल्या जलाशयात पडलेलं आपलंच सुंदरसं प्रतिबिंब जणू निरखत आहे...

लुकलुकणाऱ्या तारकादळानं अंधारात उधळलेल्या शुभ्र चांदण्या आकाशात विखरून चमचम करत आहेत...आकाशात तारे एकमेकांना काही इशारे करत आहेत...अंधाऱ्या नभातल्या चंद्रमाचं असं रूप प्रेमिकांना नेहमीच आकर्षित करत आलं आहे, प्रणयाची प्रेरणा देत आलं आहे. गीतकार हसरत जयपुरी एका गाण्यात असं लिहितात.

धीरे धीरे चल चाँद गगन में...

धीरे धीरे चल चाँद गगन में

कहीं ढल ना जाए रात,

टूट न जाए सपने

अरे धीरे धीरे चल...

प्रणयाची धुंदी चढवणाऱ्या अशा रात्रीत सरोवराकाठी एक प्रेमी युगुल प्रेमाचा वार्तालाप करत आहे. रात्र कधी संपूच नये, सुखाचे हे क्षण निसटून जाऊच नयेत असं दोघांच्याही मनात येत आहे. तरीही, आता गेलं पाहिजे, अशा विचारानं ती जाऊ लागते. तशात उत्स्फूर्तपणे तो गाऊ लागतो.

आधा है चंद्रमा, रात आधी

रही न जाए तेरी-मेरी बात आधी,

मुलाकात आधी

आधा है चंद्रमा...

ती त्याला समजावत आहे...आपला हा प्रेमाचा वार्तालाप असा अर्ध्यातच राहू दे. मनातली तृप्तीची अभिलाषासुद्धा अतृप्तच राहू दे. नेत्रांच्या पापण्या आता अर्धवटपणे लवंडू लागल्या आहेत. हळूहळू आसवांची धार ओसंडून वाहू लागली आहे.

पिया आधी है प्यार की भाषा

आधी रहने दो मन की अभिलाषा

आधे छलके नयन, आधे ढलके नयन

आधी पलकों की भी है बरसात आधी

तुझ्या मधूनच अशा जाण्यानं मंद मंद वाहणारा वारा, हा आसमंत, या तारकादळाचं संगीत सगळंच कसं तृषार्त झालं आहे. ही तृष्णा भागणार कशी? आकांक्षा पूर्ण होणार कशी? तो पुन्हा विचारतो.

आस कब तक रहेगी अधूरी?

प्यास होगी नहीं क्या ये पूरी?

प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन

प्यासे तारों की भी है बारात आधी

आधा है चंद्रमा...

आता ती राधेचा आणि कृष्णाच्या मुरलीचा दृष्टान्त देत सांगते की, ओठ अर्धवट विलग झालेत. नेत्रसुद्धा जड झालेत. मीलनाची उत्सुकता तशीच राहिली. ती राहू दे.

सूर आधाही श्याम ने साधा

रहा राधा का प्यार भी आधा

नैन आधे खिले, होंट आधे हिले

रही मन में मीलन की वो बात आधी

आधा है चंद्रमा...

आलंकारिक अशी गीतरचना करून कवीनं साधे शब्द कमालीचे पैलूदार केले आहेत. ‘सूर आधाही श्याम ने साधा’ असा पंक्तीतला अनुप्रास आणि अन्यत्र येणारी यमकं यांच्यामुळं काव्य भावपूर्ण होतं.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातले कवी भरत व्यास यांचं हे काव्य आहे. त्यांचं वैशिष्ट्य हे की, अनेक हिंदी गाणी लिहिताना त्यांनी आपल्या गीतांमध्ये जास्तीत जास्त शुद्ध हिंदी शब्दांना अथवा संस्कृत शब्दांना स्थान दिलं आहे. उर्दू शब्दांचा वापर कमी.

आशा भोसले यांनी शब्दांतले अलंकार सुयोग्यपणे उच्चारून फार नजाकतीनं गीत गायिलं आहे. आपलं पहिलंवहिलं हिंदी सिनेगीत गाताना महेंद्र कपूर यांनी आशा भोसले यांना चांगली साथ दिली आहे. गाण्याची गोड चाल आणि वाद्यांचं संयोजन यातच या गीताची खुमारी आहे. गिटार, सतार, संतूर यांसारखी तंतुवाद्यं आणि जोडीला तबला व घुंगरं या वाद्यांचा सुंदर मिलाफ इंट्रो आणि इंटरल्यूडला तर छान आहेच; पण गाणं संपल्यानंतरही थोडा वेळ ते संगीत अवश्य ऐकत राहावं असंच आहे.

मालकंस रागाचं सौंदर्य किती कर्णमधुर असतं ते महान संगीतकार सी. रामचंद्र यांनी इथं दाखवून दिलं आहे. याआधी ‘मन तरपत हरिदरशन को आज’ या गीतातून मालकंस राग इतक्याच सुंदरतेनं बुजुर्ग संगीतकार नौशाद यांनी सादर केला होता. हे गाणं संगीतकाराचं आहे हेच खरं.

संध्याबाईंच्या अतिशय देखण्या अशा नृत्यकौशल्याची झलक या गीतातून दिसते. एकावर एक ठेवलेल्या अशा नऊ घागरी डोईवर घेऊन त्यांनी केलेला नृत्याविष्कार केवळ अप्रतिम आहे. तशा अवघड अवस्थेतही त्यांचे पदन्यास आणि हस्तमुद्रा पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. नायक महिपाल ठीक.

आकाशात निळसर प्रकाशात चमकणारी चंद्राची कोर, जमिनीवरचा जलाशय, भोवतालची वृक्षराजी असं सगळं नेपथ्य जरी स्टुडिओतलं असलं तरी ते सुंदररीत्या सजवण्यात आलं आहे. एक कविराज कविता करत असतात. त्यांना ‘मोहिनी’नामक सुंदरी कल्पनेत अधूनमधून दिसत असते. तिच्यावर या कविता त्यांना स्फुरतात.

कवितांना वाहव्वा भरपूर मिळते; पण कमाई काही नाही. घरात बायका-पोरं खायला मोताद. या कारणास्तव मुलांना घेऊन बायको घर सोडून जाते. कवी तिचा शोध घेत असताना त्याला एका सरोवराच्या भोवतीचं सुंदर वातावरण पाहून मोहिनी दिसू लागते आणि त्याला ही कविता स्फुरते. काही काळानंतर त्याच्या लक्षात येतं की, आपल्याला जिथं तिथं दिसणारी मोहिनी ही दुसरी-तिसरी कुणी नसून आपली पत्नी जमना हीच आहे.

असं आहे कथानक. ‘श्यामल श्यामल बरन, कोमल कोमल चरन...’, ‘तू छुपी है कहाँ, मै तडपता यहाँ...’ ‘अरे जा रे हट, नटखट, ना छू ले मेरा घुँघट, पलट के दूँगी आज तुझे गाली रे’ इत्यादी छान छान गाण्यांनी आणि संध्याबाईंच्या नृत्यानं सजलेला हा चित्रपट होता नवरंग. नवरंग चित्रपटातलं प्रस्तुत गाण्यातलं नृत्य पाहून एकावर एक कळशी (अर्थात् दोन-तीनच) डोईवर ठेवून नृत्य करण्याची प्रथा पुढची काही वर्षं सुरू होती. गणेशोत्सवातल्या मित्रमेळ्यांमध्ये अशा प्रकारचं नृत्य हमखास सादर केलं जात असे.

दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोळ्यांना काहीतरी इजा झाल्यानं त्यांची दृष्टी जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. डोळ्यासमोरचा हा अंधार असाच कायम राहिला तर आयुष्य अंधकारमय होईल असा विचार ते करत असत.

जीवनात वेगवेगळे रंग भरलेले आहेत म्हणून हे जीवन सुंदर आहे. आपल्या स्वयंपाकघरातसुद्धा विविध रंग असतात. पिवळी हळद, लाल तिखट, पांढरं मीठ, हिरवी मिरची इत्यादी. ते जीवनातलं सौंदर्य आहे. शांतारामबापूंचे डोळे सुदैवानं तंदुरुस्त झाल्यानंतर हे जग किती रंगीबेरंगी आहे, ते रंग आपण पडद्यावर दाखवावेत अशा भावनेतून १९५९ मध्ये त्यांनी ‘नवरंग’ या चित्रपटाची निर्मिती केली.

नऊ या अंकाला आपल्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. विविध भावना व्यक्त करणारे करुण, हास्य, बीभत्स इत्यादी नऊ रस आहेत...नऊ ग्रह आहेत...तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे इंद्रधनुष्याचे सात रंग असले तरी तांबड्याच्या मागं इन्फ्रा रेड आणि जांभळ्याच्या पलीकडं अल्ट्रा व्हायोलेट असे प्रकाशकिरण आहेत.

हे सगळे ‘नव रंग’ आहेत. सिनेमाच्या सुरुवातीला शांतारामबापूंनी स्वत: कृष्ण-धवल रंगात विविध रंगांचं जीवनातलं महत्त्व विशद केलं आहे. निवेदन केल्यानंतर मुख्य सिनेमा सुरू होतो. विशेष म्हणजे, या हिंदी सिनेमाची कथा ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती.

जाता जाता : ‘सैरंध्री’ या हिंदी भाषेतल्या पहिल्या रंगीत सिनेमाची निर्मिती व्ही. शांताराम यांनी १९३३ मध्ये केली होती.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT