Cinema 
सप्तरंग

पुन्हा कालातीत सिनेमा

अक्षय इंडीकर akshayindikar1@gmail.com

वेगवेगळ्या अनवट वाटांवरून चालणाऱ्या जगभरातल्या काही दिग्दर्शकांविषयी लिहिण्याचा प्रयत्न मी या सदरातून केला. देशोदेशीच्या अनेक प्रतिभावान लेखक-दिग्दर्शकांची ऊर्जा, त्यांच्या कलात्मक जाणिवेतून निर्माण होणारी सिनेमाची भाषा याविषयीची काही निरीक्षणं त्या त्या देशाच्या संदर्भात बघण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. या सगळ्याचा खटाटोप का, तर सिनेमाच्या भाषेची एक उन्नत अशी चिरंतन साक्षरता निर्माण व्हावी...माणूस म्हणून जगत असताना एक व्यापक भान आपल्या ठायी वृद्धिंगत व्हावं... 

जगभरातल्या लेखक-दिग्दर्शकांचा हा प्रवास वाचकांपुढं मांडत असताना सिनेमाचा विद्यार्थी म्हणून मलाही त्या त्या फिल्ममेकरच्या बलस्थानांना आणि त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या विश्वाला सामोरं जाण्याची संधी पुन्हा मिळाली. 
या सर्व फिल्ममेकरच्या मांदियाळीवर नजर फिरवताना मला याची मनोमन जाणीव होते की सिनेमाचं हे जग विराट आहे...अथांग आहे. आपलं रोजचं जगणं विसरून त्या अद्भुत अशा जादूई जगाला सामोरं गेल्यावर जे विश्व आपल्या समोर उलगडत जातं ते स्तिमित होऊन न्याहाळत राहणं एवढंच आपण करायचं असतं. 

समोर असलेल्या गोष्टी अतिशय सत्यतेनं मांडण्याची ताकद कॅमेरा हे माध्यम बाळगतं. समोर दिसत असलेला काळ त्यात बांधून ठेवत असताना, तो काळ कायमचा बद्ध-बंदिस्त होत आहे, याची जाणीव कॅमेऱ्याला नसावी. 
अरुण कोलटकरांच्या कॅमेऱ्यावरच्या कवितेत कॅमेरा या यंत्राची हीच ताकद मांडण्यात आली आहे. एक तटस्थ भाव राखून समोर सुरू असलेल्या घटनेला आनंदाचं आणि दुःखाचं कोणतंही भावनिक परिमाण न लावता अतिशय कॅमेरा वस्तुनिष्ठपणे - विज्ञानाच्या तत्त्वानानुसार - समोरचं दृश्य चित्रित करत राहतो. 

वस्तुनिष्ठ चित्रण करण्याच्या पलीकडे जाऊन मानवी गोष्ट सांगायची आहे, ज्या गोष्टीत माणसाच्या सुखाचा, दुःखाचा अतिशय व्यक्तिनिष्ठ असा ओला पदर सामावलेला आहे याची जाणीव सिनेमा निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकाला असते. यातूनच नवनव्या संकल्पना, नवी शहरं आणि अनेक कंगोरे असणारी हाडा-मासाची जिवंत माणसं निर्माण करून ती कालातीत करू पाहण्याची, पर्यायानं किंवा  अजाणतेपणानं अमरत्वाची आस कोणताही कलावंत त्याच्या नकळत लावून घेत राहतो. 
सिनेमाचे एवढे प्रवाह आणि एवढ्या वेगवेगळ्या तऱ्हांचा सिनेमा हा त्याच्या जन्मापासूनच होत आला आहे. 

आपल्याकडे केवळ आणि केवळ हॉलिवूडपटांचा भडिमार होत आल्यानं ‘केवळ तोच एक सिनेमा आहे,’ असं समजून बसण्याची गल्लत केली जाते. अनेकदा जागतिक सिनेमा म्हणून प्रेक्षकांच्या माथी मराठीतले तथाकथित (फारसे नाहीतच म्हणा) समीक्षक हॉलिवूडच्या सिनेमांच्या कथा सांगण्यात धन्यता मानतात. 

माझा हॉलिवूडला विरोध नाही; पण अनेकदा भडिमार केलेल्या मार्केटिंगच्या महाजालातून खरा सकस सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, त्यामुळे इतर देशांचा  सिनेमा अस्तित्वात आहे हे अनेकांच्या गावीही नसतं, त्यांना त्याचा थांगपत्ताही नसतो. 

सिनेमाची भाषा; मग तीमध्ये अनेक मुद्दे अंतर्भूत होतात. उदाहरणार्थ : सिनेमाची आंतरिक लय...दृश्यांच्या मांडणीतून तयार होणारी लय...त्या लयीचा कथानकाच्या त्या आशयाच्या मागणीनुसार केलेला वापर...सिनेमाची एकेक फ्रेम अर्थपूर्ण होईल आणि अनेक अर्थ ध्वनित होतील अशी रचत जाणं...इत्यादी. समोर चाललेलं दृश्य किती वेगवेगळ्या कोनांतून चित्रित करता येतं आहे याची सिनेमा करणाऱ्या प्रत्येक कलावंताची आपापली कारणं असतात. त्या कारणांचा शोध म्हणजे सिनेमाच्या भाषेचा शोध. ‘सिनेमात गोष्ट सांगायची आहे,’ असं आपण अनेकदा म्हणतो. मात्र, गोष्टीची गंमत ही असते की गोष्ट सांगितल्यावरच पूर्ण होते. मात्र, इथं गोष्ट (कथा) अशी काही एक,  एका नजरेत बघता येईल अशी गोष्ट नसते. म्हणजे असतात त्या गोष्ट सांगायच्या पद्धती! चित्रकला-स्थापत्यकला-संगीत यांत अभिप्रेत असलेलं नृत्य-नाट्य-संगीत या सगळ्यांच्या संयुगातून सिनेमासारखा एक लोभसवाणा आविष्कार निर्माण होतो. हा आविष्कार मानवी प्रतिभेनं समृद्ध करण्याची कला म्हणजेच फिल्ममेकिंग. 

सिनेमाला सामोरं जाणं म्हणजे जग बघण्याची एक अतिव्यापक खिडकी आपल्या मानच्या भिंतीत बसवणं! जगभरातील जवळपास वीसेक देशांत माझ्या सिनेमांचं प्रदर्शन झालं आहे. त्यानिमित्तानं अनेक महत्त्वाच्या चित्रपटमहोत्सवांना उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं. त्यातून एकच जाणवलं की सिनेमाच्या समुद्रात उडी मारल्यावर सरतेशेवटी हाताशी आलेली एक ओंजळ आयुष्यभर पुरेल एवढी तहान भागवणारी आहे... 

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT