Director-Jia-zhangke 
सप्तरंग

चिनी मातीतलं चित्र

अक्षय इंडीकर akshayindikar1@gmail.com

अक्राळविक्राळ, आडवातिडवा पसरलेला चीन. एवढ्या मोठ्या देशाच्या विकासात कोणत्या तरी एका वर्गाचा मोठ्या प्रमाणावर बळी गेला असणार हे स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. कोणताही देश कष्टकरी माणसांच्या जगण्याची किंमत मोजून त्या कष्टाच्या मोबदल्यात देऊ केली गेलेली झगमगाटाची झूल पांघरून दिमाखात मिरवत असतो. चीन त्याला अपवाद कसा असेल? कुणी तरी कुठं तरी नव्या शक्यतेच्या शोधात, रोजचं जगणं चांगलं जगता यावं या अपेक्षा उराशी बाळगून स्थलांतर करतं. स्थलांतर करणाऱ्या माणसांचा समूह दोन प्रकारचा असतो. ऐच्छिक स्थलांतर करणारा आणि लादलेलं स्थलांतर अंगावर ओझ्यासारखं बाळगून चालणारा.

चीनमधल्या सांस्कृतिक क्रांतीनंतर लोकांच्या दैनंदिन जगण्यात अनेक अर्थांनी मूलभूत बदल झाले; मग ते बदल रोजच्या जगण्यात अनेक स्तरांवर भेडसावू लागले. या जगण्याला मायक्रोस्कोपिक नजरेनं पाहणारा आणि त्या जगण्याची एक सांगीतिक शोकात्मिका रचणारा पडद्यावरचा लेखक म्हणजे जिया जांगके. चीनमधील चित्रपटदिग्दर्शकांच्या सहाव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारं हे नाव. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे काही सिनेमे अतिशय गुप्तता राखून तयार केले. हे सिनेमा ‘अंडरग्राउंड सिनेमा’ म्हणूनसुद्धा ओळखले जातात. या सदरातून ज्या ज्या दिग्दर्शकांविषयी आपण जाणून घेतलं ते ते दिग्दर्शक आपल्या मातीशी, मुळाशी जात आपापल्या देशातील एका संस्कृतीचं चित्र मांडत ते समोरचं चित्र निमिषार्धात वैश्विक करून टाकतात. 

चित्रपट पाहणाऱ्या जगभरातल्या जाणकार रसिकांना, आपण आपल्या भवतालातील एखादी गोष्ट बघत आहोत याचं भान देऊन हे दिग्दर्शक आपली कलाकृती कालातीत करतात. जिया जांगके यांच्या सिनेमानं चीनमध्ये सुरुवातीच्या काळात स्थानिक प्रेक्षकांना भुरळ घालायला सुरुवात केली. मात्र, हळूहळू चीनच्या पलीकडेही जगभरातील चित्रपटमहोत्सवांत त्यांच्या सिनेमाला जाणकार समीक्षक अतिशय मानानं दाद देऊ लागले. 

जिया यांची ओळख जगातला एक महत्त्वाचा चित्रपटदिग्दर्शक म्हणून होऊ लागली. ती ओळख आणखी ठळक करणारं निमित्त ठरलं ते व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार. तो मिळाला होता त्यांच्या अजरामर कलाकृतीला. त्या कलाकृतीचं नाव ‘स्टील लाईफ’. अस्थिर आणि स्थिर जगण्याचं वेगवेगळ्या प्रतलांवरून केलेलं चित्रण मांडण्यात जिया कमालीचे यशस्वी ठरले होते. 

आपली अशी एक खास चित्रशैली म्हणून ओळखली जावी असं कोणत्याही दिग्दर्शकाचं स्वप्न असतं, म्हणजे चित्रपट संपल्यानंतर श्रेयनामावली नाही आली तरी, हा शॉट या दिग्दर्शकानं घेतलेला आहे, हे ओळखू यावं एवढं काम जगातले ग्रेट दिग्दर्शक करून ठेवतात. म्हणजे, कृष्ण-धवल चित्रीकरण असलेला लांब ट्रॉलीवरून घेतलेला एखादा शॉट काही मिनिटं सलग पडद्यावर चालतो तेव्हा जाणकार प्रेक्षक सहजपणे ‘हा हंगेरियन दिग्दर्शक बेला तर यांचा त्यांच्या खास शैलीत घेतलेला शॉट आहे,’ हे ताबडतोब ओळखतात. ही झाली त्या दिग्दर्शकाची शैली. समोरचा अवकाश बघण्याची दृष्टी, अवकाश आणि पर्यायानं जगणंच बघण्याची दृष्टी. मी जगाकडे अशा अशा कोनातून बघतो हीच जीवनधारणा सिनेमा करत असताना पणाला लागत असते. जसा एखादा कवी एकेक ओळ, त्या ओळीतील एकेक शब्द आपली सगळी भाषिक ताकद पणाला लावत त्या वेळच्या मगदुरानं एक काव्य निर्माण करतो, त्याचप्रमाणे दिग्दर्शक आपली क्रिएटिव्ह प्रतिष्ठा पणाला लावून एकेक शॉट पडद्यावर जिवंत करत नेत असतो.  

जिया यांचा सुरुवातीचा काळ इतर अनेक कलांच्या सान्निध्यात गेला. त्यांनी चीनमधील अतिशय महत्त्वाच्या अशा ‘बीजिंग फिल्म अकॅडमी’त प्रवेश घेतला, त्याच वेळी त्यांना जगातील सिनेमाविषयक अनेक प्रवाहांना सामोरं जाण्याची संधी मिळाली. आपल्या जगण्याला सिनेमा ही एकच गोष्ट आधार देऊ शकते याची जाणीव एव्हाना त्यांना झाली होती आणि आपला भवताल अनेक लोकांसमोर मांडायचं सगळ्यात चांगलं माध्यम सिनेमा हे आहे हे त्यांना तरुण वयातच जाणवलं होतं व हेच माध्यम आपण हाताळायचं अस त्यांनी मनोमन ठरवलं होतं. 

त्यांच्या पहिल्या काही शॉर्ट फिल्म म्हणजे अतिशय साधे असे प्रयोग वाटत असले तरी त्यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या काही फिल्म त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची जाण अतिशय समर्थपणे दाखवून देतात. चीनच्या इतिहासातली अतिशय प्रसिद्ध असलेली घटना म्हणजे तिआनमेन चौकातील आंदोलन. त्यासंदर्भात जिया यांनी एक छोटी फिल्म केली होती. सुरुवातीपासूनच त्यांच्या राजकीय विचारांच्या वाटचालीला चित्रपट हे माध्यम सापडलं. जिया यांच्या चित्रपटनिर्मितीच्या वैशिष्ट्यांमधलं सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, फिक्शन आणि नॉनफिक्शन यांच्या सिनेमारेषा पुसत  एका गुंतागुंतीच्या जगाची रचना करणं. ‘द वर्ल्ड’ हा त्यांचा सिनेमा एका मनोरंजननगरीवर आधारित आहे. तिथं जगातील सात आश्चर्यं आहेत, म्हणजे त्यांच्या प्रतिकृती. ताजमहाल वगैरेच्या प्रतिकृती. तिथं काम करणाऱ्या कामगारांच्या भावविश्वावर जिया यांचा कॅमेरा फिरत राहतो. मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात; पण त्या इमारतींच्या पोटाशी अनेक कामगारांच्या व्यथा असतात असं थोडक्यात जिया यांचं म्हणणं. कष्टकरी वर्गाचं जगणं सिनेमाच्या रूपातून मांडणारा हा दिग्दर्शक सध्या नव्या लोकांचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी एक स्थानिक; पण अतिशय ग्लोबल असा फिल्म फेस्टिव्हल उभा करतो आहे. ‘स्टील लाईफ’, ‘द वर्ल्ड’, ‘२४ सिटी’, ‘यूजलेस’, ‘टच ऑफ सिन’ या त्यांच्या कलाकृती चीनच्या समकालीन जगण्याचा सांस्कृतिक दस्तऐवज आहेत.
(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.) 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT