hutatma rajguru monument sakal
सप्तरंग

हुतात्मा राजगुरू यांचं स्मारक

हुतात्मा भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या त्रयीचं नाव देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामासंदर्भात एकत्र घेतलं जातं. त्यापैकी राजगुरू यांचा वाडा व स्मारक पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर आहे.

सकाळ वृत्तसेवा

हुतात्मा भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या त्रयीचं नाव देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामासंदर्भात एकत्र घेतलं जातं. त्यापैकी राजगुरू यांचा वाडा व स्मारक पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर आहे.

- अंजली कलमदानी anjali.kalamdani10@gmail.com

हुतात्मा भगतसिंग-राजगुरू-सुखदेव या त्रयीचं नाव देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामासंदर्भात एकत्र घेतलं जातं. त्यापैकी राजगुरू यांचा वाडा व स्मारक पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवराम हरी राजगुरू यांचं मूळ गाव पुण्यापासून जवळच खेड इथं आहे. भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांना ता. २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ता. २३ मार्च हा हुतात्मादिन म्हणून पाळला जातो.

नाशिक रस्त्यावरील खेड या गावी राजगुरू यांचा जन्म ता. २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. आज हे गाव राजगुरुनगर म्हणून ओळखलं जातं. भीमा नदीच्या काठी राजगुरू-कुटुंबाचा वाडा आहे. या वाड्याच्या अनेक भागांची पडझड होऊन दुरवस्था झाली होती. राजगुरू यांचा जन्म ज्या खोलीत झाला त्या खोलीच्या दुरुस्त्या करून त्यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे; परंतु त्यालगत असलेल्या देवघराच्या भागाची पडझड होऊन हा भाग दुर्लक्षित होता. वाड्याच्या काही भागात आजही काही रहिवासी राहतात. राजगुरू यांचे वंशज पुण्यात राहतात. शिवराम हरी राजगुरू यांना लहानपणी रघुनाथ असंही संबोधलं जायचं. त्यांना थोरले बंधू होते व ते सरकारच्या चाकरीत होते.

शिवराम यांना दांडग्या स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं होतं. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं. आईनं दिलेल्या तुटपुंज्या पैशाच्या आधारे त्यांनी नाशिक गाठलं व तिथून काही काळानं ते काशी इथं गेले. नेहमीच्या शिक्षणाबरोबरच व्यायामशाळेत त्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा यांचं शिक्षणही आत्मसात केलं. काही वेळा कठोर उपास करून, आपण अन्नाशिवाय कसे व किती दिवस तग धरू शकतो, हे त्यांनी अजमावलं. काशी इथं त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली आणि तिथलं क्रांतिमय वातावरण त्यांना पोषक ठरलं. देशाच्या स्वातंत्र्याच्या ईर्ष्येनं भारावलेले शिवराम यांच्यातील क्रांतिकारक तिथं घडत गेला.

‘पंजाबकेसरी’ लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांची हत्या करणारा पोलीस अधिकारी स्कॉट याला ठार मारण्याचा विडा भगतसिंग यांनी उचलला व राजगुरू त्यात सहभागी झाले. अचूक नेमबाजीत प्रावीण्य प्राप्त केलेल्या राजगुरू यांनी स्कॉटवर दबा धरून लाहोर इथं गोळ्या झाडल्या; पण तो ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्स निघाला. ता. २७ फेब्रुवारी १९२८ हा तो दिवस होता. त्यानंतर वेशांतर करून भगतसिंग व राजगुरू लाहोरहून राजकोट इथं गेले व तिथून काशी इथं परतले. १९२९ च्या सप्टेंबरमध्ये पोलिसांनी त्यांना पकडलं. कारावासात त्यांचा छळ झाला; पण ते दृढ राहिले. कारावासात त्यांची भगतसिंग व सुखदेव या सहकाऱ्यांशी पुन्हा भेट झाली. अखेर, लाहोर खटल्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राजगुरू यांचं स्मारक तसं दुर्लक्षितच राहिलं. राजगुरुनगर इथं ‘हुतात्मा राजगुरू स्मारक समिती’ आहे, तिच्या प्रयत्नानं स्मारकाची डागडुजी झाली. वाड्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या देवघराची बरीच पडझड झाली होती.

अर्धवट रखडलेल्या कामात कंत्राटदाराला योग्य दिशेअभावी काम पुढं नेणं अडचणीचं जात होतं. तपशीलवार तयार झालेल्या रेखांकनांच्या आधारे व जागेवर वारंवार सूचित केल्याप्रमाणे लाकडांमध्ये राजगुरूंच्या वाड्याचा भाग पूर्ववत् उभा राहू लागला. देवघर हा मध्ये चिंचोळा चौक असलेला वाडा आहे. त्याचं अर्धं बांधकाम भाडेकरूंनी व्यापलेलं आहे. दगडी जोत्यावरच्या दगडानं घडवलेल्या तळखड्यावर लाकडी खांब व तुळयांचा ढाचा तयार झाल्यावर खालची उजाड ओसरी पूर्ववत् दिसू लागली. लाकडी जिन्याची जागा निश्चित करण्यासाठी पुरातत्त्व खात्यानं, सल्लागार व समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते निर्णय घेतला. लाकडी मजला व त्यावरील उतरतं छत तयार झाल्यावर वाड्याचं ‘वाडापण’ नजरेत भरू लागलं. मधला मजलाही लाकडी फळ्यांमध्ये करताना पारंपरिक पद्धतीनं लाकडी घटकांचं चौकटकाम तयार केलं.

मध्यभागी उघडणारा चौक सोडला तर तिन्ही बाजूंच्या भिंतींचं बांधकाम वीट व चुना यांमध्ये पूर्ण झालं. चौकाच्या बाजूनं उघडणाऱ्या पहिल्या मजल्यावर पारंपरिक पद्धतीच्या वाड्याच्या उंच महिरपीच्या खिडक्या करून खालच्या बाजूला लाकडी कठडा दिला आहे. वाड्यांमधील खिडक्यांची ही पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून खेळती हवा व उजेड अंशतः बंदिस्त व अंशतः उघड्या चौकातून प्रमाणात मिळत राहतो. उर्वरित भागाला लाकडी बंदिस्त तावदान उभारलं. लाकडी घटकांना तेलाचं आवरण चढल्यावर पारंपरिक वाड्याची शान वाड्याला लाभली. देवघर ही वाड्यातील सर्वात महत्त्वाची जागा. उपलब्ध छायाचित्रावरून रेखांकनं केल्यावर कारागिराकडून त्याचं काम चुन्यामध्ये पूर्ण करून घेतलं.

लाकूडकामातील सुबक, माफक कलाकुसरीचं काम असलेल्या अर्ध्या वाड्याचं जतन-संवर्धन पूर्ण झालं आहे. अजून अर्धा वाडा आणि नियोजित कामाचं व स्मारकाचं बरंच काम व्हायचं आहे.

अवघं तेवीस वर्षांचं कोवळं आयुष्य देशासाठी बलिदान करणाऱ्या या युवकांसाठी मोठं राष्ट्रीय स्मारक व्हायला हवं आणि आजच्या तरुणांना व अनेक पिढ्यांना त्यांच्या ध्येयनिष्ठ कर्तृत्वाची माहिती असायलाच हवी. जतन-संवर्धनाच्या कामात कुणी अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करण्यात कधी कधी फार मोठं समाधान दडलेलं असतं. संपूर्ण वाड्यापैकी अर्ध्या वाड्याचं जतन-संवर्धन पूर्ण झालं. ते पूर्ण करताना त्याचं संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं पूर्ण करणं यापलीकडे त्यात मोठं आव्हान नव्हतं.

कारण, हा वाडा पारंपरिक वाडापद्धतीनं बांधलेला कौटुंबिक वाडा होता. त्याचं महत्त्व मात्र फार मोठं अशासाठी होतं की, देशासाठी बलिदान दिलेल्या राजगुरू यांचा तो वाडा आहे. राजगुरू यांना ही आदरांजली वाहण्याची संधी आमच्या ‘किमया परिवारा’तर्फे आम्हाला मिळाली, हे ‘किमया’चं भाग्य म्हणावं लागेल. अपूर्णतेतच कधी कधी सकारात्मक पूर्णत्वाची संधी दडलेली असते, हे कुठल्याही व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग नसलेलं तत्त्व कधी कधी स्वतःच्या अनुभवांतूनच शिकायला मिळतं.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

SCROLL FOR NEXT