देशाच्या दक्षिण दिशेकडील जंगलांनी मला कायमच भुरळ घातली आहे. भारताच्या प्रत्येक भागातील जंगलांना मी आजवर अनेकदा भेट दिली. प्रत्येक भागातील जंगलं तितकीच सुंदर असली तरी दक्षिणेकडच्या जंगलांनी वेगळेपण जपलं आहे. इथे ठायी ठायी बहरलेला निसर्ग आपल्याला कायम खुणावत राहतो. नजर जाईल तिथपर्यंत पानापानात दाटलेला ‘हिरवा’ आपलं लक्ष वेधून घेतो. आणि मग आपण इथल्या जंगलांच्या प्रेमात पडतो.
दक्षिणेतल्या जंगलांमध्ये फिरताना इथे असलेली अलौकिक जैवविविधता आपल्याला इथल्या निसर्गाची श्रीमंती सांगून जाते. अनेकदा दक्षिणेतल्या जंगलांबद्दल लोक तक्रार करताना दिसतात. दक्षिणेतल्या जंगलात गेलो की फक्त जंगलच बघावं लागतं, मोठे प्राणी अजिबात दिसत नाहीत, वगैरे वगैरे. पण मला वाटतं आपण त्या जंगलांकडे बघण्याची ‘नजर’ बदलली की आपल्याला त्यात लपलेली सुंदरता आणि त्यात असलेली जैवविविधता सहज दिसते.
इथे आपलं आणि जंगलाचं थेट संभाषण होऊ शकतं. मला असं कायम वाटत आलंय की निसर्गाच्या अधीन झालो की आपल्याला त्याची भाषा कळायला लागते. आणि मग एकदा का आपण आणि तो यातली आपणच आखलेली अदृश्य रेषा पुसली गेली की निसर्ग आपल्याशी संवाद साधतो. किंबहुना आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो. आणि या संवादातून आपल्याला त्या जंगलाचं सौंदर्य, त्याची परिभाषा कळायला लागते. जंगलातलं प्रत्येक झाड, पक्षी, प्राणी ते अगदी छोट्या कीटकांचं निरीक्षण करताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. दक्षिण भारतातली अनेक जंगलं आपल्याला अशा आनंदाची अनुभूती देऊन जातात. अफाट निसर्गसौंदर्याने नटलेल्या दक्षिण भारतातल्या एका अलौकिक जंगलाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ‘अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प’.
मला निसर्गात फिरण्याची गोडी लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात मी महाराष्ट्रातली नागझिरा, ताडोबा, नवेगाव, दाजीपूर, कोयना अशी अनेक जंगलं पालथी घातली. पण मला दक्षिण भारतातली जंगलं खुणावत होती. बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्यावर मी ठरवलं होतं की अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायचं. २००७ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या या जंगलाला अगदी इंग्रजांच्या काळापासूनचा म्हणजे साधारण १८४८ पासून व्यवस्थापनाचा इतिहास आहे. त्याकाळी हे जंगल तत्कालीन मद्रास राज्यातील जंगलांच्या व्यवस्थापनात आदर्श मानले जाई. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि तिरुपूर जिल्ह्यात असलेला हा व्याघ्र प्रकल्प सुमारे १ हजार ४७९.८७ चौरस किलोमीटर.
एवढ्या मोठ्या भागात पसरला आहे. यात सुमारे ९५८.५९ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५२१.२८ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून असलेल्या या जंगलात आपल्याला नानाविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, झाडे, इ. पाहायला मिळतात. वाघांच्या पांगण्याच्या क्रियेत आणि भ्रमणमार्गाच्या अस्तित्वात अन्नामलाई अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या जंगलात वाघांची संख्याही चांगल्या प्रमाणावर आहे. पूर्वेला पराम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प, नैऋत्येला चिन्नार वन्यजीव अभयारण्य आणि एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, याशिवाय नेन्मारा, वाझाचाल, मलायात्तुर, मलायुर ही संरक्षित वने यांनी या जंगलाला वेढलेले आहे. यामुळे वाघांच्या आणि पर्यायाने इतर प्रजातींच्या संरक्षणात अन्नामलाईचा मोठा वाटा आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज साईटमध्ये अन्नामलाईच्या करियन शोला, ग्रास हिल्स आणि मंजमपट्टी या भागांचा समावेश करण्यात आला आहे.
सुमारे २५०० सपुष्प वनस्पतींच्या उपजाती अन्नामलाईमध्ये सापडतात. याशिवाय आंबा, फणस, आलं, हळद, काळीमिरी, वेलची, जायफळ, दालचिनी, आवळा, याम, पेरू, शेवगा, इ. प्रकारची झाडे, फळझाडे, फुलझाडेही अन्नामलाई जंगलात मोठ्या प्रमाणावर आहेत. सुमारे ७० प्रजातींचे मासे, सुमारे ७० प्रजातींचे उभयचर आपल्या इथल्या पाणवठ्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात बघायला मिळतात. याशिवाय सुमारे ३०० प्रजातींचे पक्षी आणि सुमारे ५० पेक्षा अधिक प्रजातींचे सस्तन प्राणी यांनी अन्नामलाई जंगलाला समृद्ध केले आहे. दुर्मिळ सिंहपुच्छ माकडाचा आढळ हे अन्नामलाईचे आणखी एक खास वैशिष्ट्य. याशिवाय निलगिरी थार, निलगिरी वानर, निलगिरी मार्टिन असे इतर दुर्मिळ प्राणीही अन्नामलाईमध्ये सापडतात.
अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प हा भारतातील २९ वा व्याघ्र प्रकल्प आहे. जंगलाला सगळ्यात मोठा असलेला धोका म्हणजे आजूबाजूच्या लोकांचे जंगलावर असलेले अवलंबित्व. आजही काही गावं जंगलाच्या आत आहेत. वनविभागाकडून त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत. अन्नामलाई जंगलात आणि आसपासच्या भागात असलेल्या गावांमध्ये सहा प्रकारच्या आदिवासी लोकांची वस्ती प्रामुख्याने आढळते. कदार, मालासर, मलयमालासर, पुलैयर, मुदुवर आणि एरावलर हे ते सहा प्रकार.
आजूबाजूच्या लोकांच्या जमातीतही इतक्या मोठ्या प्रमाणावर विविधता असणारे अन्नामलाई हे भारतातील एकमेव जंगल आहे. पोल्लाची, वालपराई आणि उडूमलपेट तालुक्यात असणाऱ्या या जंगलापैकी पोल्लाची येथे नारळ, गुळ, भाज्या आणि गुरांची खूप मोठी बाजारपेठ आहे. उंचसखल भूभाग हे अन्नामलाईचे वैशिष्ट्य. अक्कामलाई, जम्बू मलाई, पाप्पलाम्मान, वेल्लारी, परातुम्बा, कालाभाथूर, कदावरी अशी १२ शिखरं अन्नामलाईमध्ये आहेत. या शिखरांची सरासरी उंची २००० मीटरच्या आसपास आहे. मोसमी पाऊसही जंगलात चांगल्या प्रमाणावर पडतो. पश्चिम घाटाच्या अन्नामलाई पहाडात वसलेल्या या जंगलाचे सौंदर्य अशा विविधतेमुळे जास्त खुलले आहे.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणाऱ्या अन्नामलाईला मी पहिल्यांदा किरण पुरंदरेसोबत भेट दिली. यानंतर मी अनेकदा या जंगलात जाऊन आलो. नजर जावी तिथपर्यंत पसरलेली हिरवाई, जंगलात भरपूर प्रमाणात आढळणारी जैवविविधता, इथला उंचसखल भूभाग, दोन डोंगरांमध्ये अडकलेल्या शोला जंगलप्रकारचं काही प्रमाणातलं अस्तित्व यामुळे अन्नामलाईच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. इथे आलो की निसर्गाची परिभाषा आपल्याला कळायला लागते आणि आपण नकळत त्याच्याशी जोडले जातो. त्याच्यात आणि आपल्यात सुसंवाद सुरु होतो आणि आपण निसर्गवेडे होतो.
कसे जाल? : पुणे/मुंबई-कोईम्बतूर-पोल्लाची-अन्नामलाई
भेट देण्यास उत्तम हंगाम : डिसेंबर ते एप्रिल
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : वाघ, बिबट्या, गवे, चितळ, सांबर, भेकर, रानडुक्कर, वानर, मुंगूस, तरस, अस्वल, रानकुत्रे, पिसोरी, निलगिरी थार, निरीगिरी वानर, सिंहपुच्छ माकड, निलगिरी मार्टिन, वानर, कोल्हा, खोकड, ससा, रानमांजर, हत्ती, शेकरू, इ.
पक्षी : मोर, राखी रानकोंबडा, भृंगराज, मधुबाज, कृष्णगरुड धनेश, मलाबारचा कवड्या धनेश, माउंटन इम्पेरीयल पिजन, बेडूक तोंड्या, बहिरी ससाणा, काळा सुतार, निलगिरी रानपारवा, निलपरी, वायनाड लाफिंग थ्रश, सातभाई, कोतवाल, डोंगरी मैना, निलगिरी फ्लायकॅचर, खाटिक, घुबडांचे अनेक प्रकार, इ.
सरपटणारे प्राणी : मण्यार, नाग, घोणस, धामण, अजगर, फ्लाइंग लिझर्ड/ड्रेको, घोरपड, इ.
फुलपाखरे : कॉमन रोझ, क्रीम्सन रोझ, कॉमन जे, लाईम बटरफ्लाय, कॉमन मॉर्मॉन, रेड हेलन, ब्लू मॉर्मॉन, सदर्न बर्डविंग, कॉमन वॉंडरर, मॉटल्ड इमिग्रंट, कॉमन ग्रास येलो, स्पॉटेड ग्रास येलो, स्पॉटलेस ग्रास येलो, वन स्पॉट ग्रास येलो, कॉमन जेझेबल इ.
(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळचे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.