ताडोबाच्या जंगलातला वाघ आणि बछडा.
ताडोबाच्या जंगलातला वाघ आणि बछडा. 
सप्तरंग

तारूच्या जंगलात...!

अनुज खरे informanuj@gmail.com

अगदी पुराणकाळात एका गावातला ‘तारू’ नावाचा युवक आणि वाघ एकदा समोरासमोर आले. कितीही झालं तरी वाघाची आणि तारूची ताकद यात फरक होता. दोघांमध्ये खूप वेळ चाललेल्या जोरदार झटापटीनंतर तारूनं देह ठेवला; पण या घटनेनं तारूला देवत्व मिळवून दिलं. आपल्यापेक्षा अधिक मोठ्या शक्तीशी सामना करताना मरण आलं तर अशा व्यक्तीची आदिवासी लोकांमध्ये देव मानून पूजा केली जाते. फरक एवढाच की आदिवासी लोक मूर्तिपूजक नाहीत. त्यांच्यात एखाद्या दगडाला त्या देवाचं प्रातिनिधिक रूप मानलं जातं. ज्या ठिकाणी हे युद्ध झालं तिथं एका झाडाखाली ‘तारू’ देवाची स्थापना करण्यात आली. या लोकांनी त्या देवाला नाव दिलं ‘तारुबा’. अजूनही गेली शेकडो वर्षं या देवाला इथल्या आदिवासी लोकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त नावाचा अपभ्रंश झाला आणि नाव झालं ‘ताडोबा’!

तारूच्या या भूमीवरचं जंगल आजही त्याच्या नावानं ओळखलं जातं. जंगलाचं नाव आहे ताडोबा जंगल. सन १९५५ ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ म्हणून हे ११६.५४ चौरस किलोमीटरचं जंगल संरक्षित करण्यात आलं. पुढं या जंगलाच्या भोवती असलेल्या जंगलाला सन १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि त्याला नाव दिलं गेलं ‘अंधारी वन्यजीव अभयारण्य’. कालांतरानं सन १९९५ मध्ये हे दोन्ही प्रदेश मिळून नामकरण झालं ‘ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प’. आज ६२५.८२ चौरस किलोमीटरचा ‘कोअर भाग’ आणि ११०१.७७ चौरस किलोमीटरचा ‘बफर भाग’ अशा एकंदरीत १७२७.५९ चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण भागात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे प्रशासकीयदृष्ट्या तीन भाग करण्यात आलेले आहेत. ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा. ‘ताडोबा’ हा जंगलातला उत्तरेकडचा भाग, तर कोळसा हा दक्षिणेकडचा भाग. मोहर्ली हा दोघांच्या मधला भाग. तिन्ही भागांत जंगल वेगवेगळं आहे हे ताडोबाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कोळसा आणि ताडोबा या भागांत गवताळ कुरणं जास्त प्रमाणावर आहेत, तर मोहर्ली या भागात बांबूचं प्राबल्य अधिक.

अन्न आणि पाणी यांची मुबलकता यांमुळे अशी विविधता ताडोबात पाहायला मिळते. ताडोबा, मोहर्ली, कोळसा या तिन्ही क्षेत्रांत तीन मोठे तलाव आहेत. ताडोबा आणि कोळसा या भागांत ब्रिटिशांच्या काळात साधारणतः सन १९०४ मध्ये बांधलेली विश्रामगृहं आहेत. या विश्रामगृहांच्या जवळच दोन मोठे तलाव आहेत, तर मोहर्ली भागात तेलिया धरणामुळे तयार झालेला तलाव आहे. याशिवाय पांढरपौनी तलाव नंबर १ व २, जामनी, ९७ नंबर पाणवठा, जामूनझोरा, चिखलवाही, आंबेबोडी, वसंत बंधारा, काटेझरी, उदर मटका, अस्वलहिरा, आंबेदोबाड, रायबा, कुवानी, ऐनबोडी, पंचधारा असे बारमाही पाणी असणारे छोटे-मोठे तलाव ताडोबात आहेत. जामूनबोडी, शिवणझरी असे अगदी हिवाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी टिकून राहणारे तलावही इथं आहेत. या सगळ्या तलावांमध्ये पाण्याची क्षमता वाढावी आणि पाणी अगदी मे महिन्याच्या अखेरपर्यंत टिकून राहावं यासाठी वन विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय जंगलात अनेक ठिकाणी मानवनिर्मित पाणवठे वन विभागानं निर्माण केलेले आहेत. फक्त रस्त्यालगत असणारे पाणवठे वन विभागानं आतल्या बाजूला हलवले आहेत.

जामनी तलावात उगम पावणारी आणि मूलकडे वाहणारी अंधारी ही नदी अनेक वन्यप्राण्यांची जीवनदायिनी आहे. या तलावांची, इथल्या काही भागांची नावंही गमतीदार आहेत. बोडी म्हणजे छोटा तलाव. तलावाकाठी ऐनाची झाडं आहेत म्हणून त्याला नाव पडलं ऐनबोडी. गंमत म्हणजे ऐनबोडी नावाचे तीन तलाव ताडोबात आहेत. ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा या तिन्ही विभागांत प्रत्येकी एक. जांभळाची अनेक झाडं काठावर असल्यामुळे नाव मिळालं जामूनबोडी, आंब्याची झाडं खूप असणाऱ्या तलावाला आंबेबोडी. पाण्याच्या पाटाच्या बाजूला आंब्याची झाडं खूप म्हणून नाव मिळालं आंबेपाट. काटेरी झुडपाच्या बाजूला एक नैसर्गिक झरा वाहतो म्हणून त्या भागाला नाव पडलं काटेझरी. एका भागातल्या आंब्याच्या झाडावरचे आंबे काळे पडले त्या भागाला नाव मिळालं काळा आंबा! एका भागातले आंबे आंबट निघाले म्हणून आंबटहिरा! जामूनझोरा, शिवणझरी, आंबेउतार, अस्वलहिरा, अस्वलटोक, सांबऱ्यापाट, अंधारी नदीतला वाघडोह, वाघनाला, वाघदरी, पंचधारा असे अनेक भाग त्यांच्या नावावरून त्यांचं वैशिष्ट्य दर्शवतात.

वन विभागाच्या प्रयत्नांनी बफर झोनमध्येही पर्यटन सुरू करण्यात आलं. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. बफर झोनमध्ये चालणाऱ्या पर्यटनात इतर व्याघ्रप्रकल्पांना ताडोबानं केव्हाच मागं टाकलंय. याचं कारण बफर झोनमध्ये सहजतेनं होणारं व्याघ्रदर्शन हे आहे. वाघांची संख्या वाढली ही गोष्ट एकाअर्थी चांगली आहे; पण हे दुधारी तलवारीसारखंही आहे. वाघ हा हद्द घोषित करणारा प्राणी आहे, त्यामुळे एखाद्या जंगलात किती वाघ राहू शकतात याचं गणित ठरलेलं आहे. त्या संख्येच्या वर वाघ वाढले की साहजिकच वाघ जंगलाच्या बाहेर पडतात. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी जंगल असणारे काही विशिष्ट भाग राखून ठेवलेले असतात. त्यांना ‘कॉरिडॉर’ असं म्हणतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे हे ‘कॉरिडॉर’ कमी व्हायला लागले आहेत. जंगलाचं क्षेत्रही काही ठिकाणी कमी व्हायला लागलं आहे. असं झालं की सुरू होतो मानव आणि वन्यप्राणी यांच्यातला संघर्ष.

ताडोबानं मला कायमच भुरळ घातली आहे. विस्तीर्ण ताडोबा तलाव, पाण्याच्या इतर जागा, रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेले बांबू, त्यामुळे बांबूचं तोरण बांधल्यासारखे दिसणारे रस्ते, कोळशातल्या लाल मातीच्या रस्त्यावर उमटलेल्या वाघाच्या ठसठशीत पाऊलखुणा, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, मुबलक पाणी....चितळ, सांबर, गव्यांचे बहुसंख्य कळप, विविधता दर्शवणारं पक्षीवैभव, मोहर्ली प्रवेशद्वार ते ताडोबा विश्रामगृहापर्यंतचा डांबरी रस्ता आणि त्यावर होणारं व्याघ्रदर्शन, काटेझरी परिसरातलं घनदाट जंगल; एक प्रकारची गूढता भरून राहिलेला वाघडोहाचा परिसर या सगळ्यानं माझ्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. 

गेली अनेक वर्षं मी ताडोबात येतोय; पण तरीही मला ताडोबा जंगल संपूर्ण कळलं असं मी चुकूनही म्हणणार नाही. प्रत्येक भेटीत नवीन अनुभव देणारं हे जंगल मला प्रत्येक वेळी त्याचं नवीन रूप दाखवतं. मग त्यापासून नवीन काहीतरी शिकायला मिळतं. निसर्ग आपल्याला कायम भरभरून देत असतो. ‘देणारा तो आणि घेणारे आपण’ हे सूत्र ज्यानं जाणलं तो त्यातून काहीतरी शिकला. सढळ हातांनी आपण त्याचं हे देणं स्वीकारलं की आपली ओंजळ कधीही रिक्त राहणार नाही. ओंजळ घट्ट धरण्याची जबाबदारी आपली. एकदा का ते ओंजळीतून निसटलं की मातीमोल होईल आणि मागं उरेल ती फक्त माती...!

कसे जाल? 
1) पुणे-नागपूर-चंद्रपूर-ताडोबा/ पुणे-नागपूर-चिमूर-ताडोबा  
2) भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?  
सस्तन प्राणी :
मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, ससा, वानर, रानकुत्रे, चांदी अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा-घुबड, गव्हाणी घुबड, धनेश, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, नवरंग, सुतारपक्षी.
सरपटणारे प्राणी : मगर, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस.
वृक्ष : साग, ऐन, अर्जुन, बेहडा, बिजा, भेरा, बोर, बेल, चिचवा, धावडा, कुसुम, मोह, मोवई, सालई, करू, सावर, शिसम, शिवण, सूर्या, तेंदू.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT