महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादी २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश असणारा आपला भारत हा एक खंडप्राय देश. प्रत्येक राज्याला एक स्वतंत्र अस्तित्व. इथल्या अनेकानेक भाषांमध्ये, इथल्या संस्कृतीत विविधता आहे. प्रत्येक गोष्टीत विविधता आढळणाऱ्या या देशात निसर्गसंपदेतही विविधता आढळली नसती तरच नवल. जैवविविधतेचा खजिनाच जणू निसर्गदेवतेनं इथं रिता केला आहे.
भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांची तर बातच न्यारी. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅँड आणि त्रिपुरा ही सात राज्ये ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखली जातात. या सातही राज्यांमध्ये निसर्गघन अगदी ओथंबून बरसला आहे! या सौंदर्यात भर टाकणारं ठिकाण म्हणजे आसाममधलं ‘नामेरी व्याघ्रप्रकल्प.’ भारतातील ५० व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. पूर्वी ‘नामेरी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळख असणाऱ्या या संरक्षित वनाला आता व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे.
आसामच्या सोनितपूर या जिल्ह्यात असलेलं ‘नामेरी’ हे सुमारे ४६४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. यापैकी जंगलाचा ३२० चौरस किलोमीटर भाग हा कोअर भाग आहे, तर २० चौरस किलोमीटर भाग हा बफर भाग आहे. अरुणाचल प्रदेशात असलेल्या ‘पाके व्याघ्र प्रकल्पा’ला नामेरीची हद्द भिडलेली आहे. ‘नामेरी’ आणि ‘पाके’ या दोहोंनी सुमारे १६६२.४५ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यातील एका हिमसरोवरातून उगम पावणारी कामेंग नदी नामेरी अभयारण्यातून वाहते. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीनं सोनितपूर जिल्ह्यातून आसाममध्ये प्रवेश केला की तिला ‘जिया भराली’ असं म्हणतात. ‘सेसा ऑर्किड अभयारण्य’ आणि ‘ईगलनेस्ट अभयारण्य’ यांच्या मधूनही वाहणाऱ्या या कामेंग नदीनं नामेरीचं सौंदर्य अधिक खुलवलं आहे.
उष्णकटिबंधीय सदाहरित, निमसदाहरित आणि ओलसर पानझडी अशा तिन्ही प्रकारांत हे नामेरी अभयारण्य मोडतं.
व्याघ्रप्रकल्प असूनही इथं आपल्याला पायी नेचर ट्रेल करावा लागतो. सोबत सुरक्षेसाठी पुढं एक आणि मागं एक असे दोन बंदूकधारी असतात. वन्यप्राणी अचानक समोर आला तर काय, म्हणून घेतलेली ही खबरदारी. हे बंदूकधारी उत्तम पक्षीनिरीक्षकही असतात आणि आपले मार्गदर्शकही. इथं चालताना आपल्याला चौफेर लक्ष ठेवावं लागतं. आपली पंचेंद्रियं जागृत ठेवावी लागतात.
एकदा आम्ही दहाजण असंच पक्षीनिरीक्षण करत असताना चांगले लांबलचक सुळे असलेला एकांडा हत्ती अचानक समोर आला. आम्ही ‘सुलतान टीट’ नावाचा पक्षी बघण्यात मग्न असल्यामुळे हत्तीची ही अचानक झालेली ‘एंट्री’ आमच्या लक्षातच आली नव्हती. हत्ती एवढा अजस्र प्राणी...पण कधी कधी आपल्याला मुळीच चाहूल लागू न देता तो हालचाल करू शकतो. आम्हीही त्याला अचानकच दिसल्यामुळे तोही जरा गोंधळला. त्यानं एक मोठा आवाज करून नाराजी दर्शवली. शेवटी, त्याला तिथून घालवण्यासाठी आमच्याबरोबरच्या बंदूकधाऱ्यांना हवेत दोन फैरी झाडाव्या लागल्या. तेव्हा त्या हत्तीनं तिथून काढता पाय घेतला.
वेत आणि इतर प्रकारचे बांबू इथं मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कामेंग आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर गवताळ प्रदेश आहेत. जंगलाच्या एकूण भागाच्या केवळ दहा टक्के भागात हे गवताळ प्रदेश असल्यानं उष्णकटिबंधीय सदाहरित आणि ओलसर पानझडी जंगल इथं मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक प्रकारची झाडं, तसेच डेंड्रोबियम, लेडीज स्लीपर, असे ऑर्किडचे काही प्रकारही दिसतात.
आभाळाशी गप्पा मारायला उंचच उंच वाढलेल्या झाडांवर अवलंबून असलेले अनेक जीव इथं आढळतात. मुबलक खाद्य आणि राहण्यास योग्य जागा यांमुळे इथं पक्ष्यांच्या सुमारे ३०० जाती आढळतात. आसामचा राज्यपक्षी असलेला ‘व्हाईट विंग्ड् वूड डक’ हा इथं आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी होय. हा पक्षी पाहण्यासाठी देश-विदेशांतून निसर्गप्रेमी ‘नामेरी’मध्ये येतात.
गगनाशी नातं सांगणाऱ्या जुन्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे हॉर्नबिल पक्षी हे नामेरीचं आणखी एक वैशिष्ट्य. ग्रेट पाईड हॉर्नबिल, रुफस नेक्ड् हॉर्नबिल असे धनेशाचे प्रकार इथं आढळतात. वैशिष्ट्यपूर्ण अशी ‘हॉर्नबिल एक्स्प्रेस’ तुम्हाला इथं दिसू शकते. एकापाठोपाठ उडणारे असे हॉर्नबिल म्हणजे जणू पक्ष्यांची अंबरातील माळच...
एकंदरीत, नामेरी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वन्यप्राण्यांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवनच! आकाश निरभ्र असल्यास हिमालयाच्या पायथ्याला वसलेल्या नामेरीमधून हिमशिखरांचंही दर्शन घडतं. इथं फार थोडी हॉटेल्स आहेत, त्यांपैकी ‘जिया भराली’, ‘नामेरी इको कॅम्प’ ही काही चांगली. अत्यंत उबदार, आरामदायक टेंट्स हे या हॉटेलांचं वैशिष्ट्य. इथल्या रुचकर ‘बांबूराईस’ची चव जिभेवर दीर्घ काळ रेंगाळत राहते. कामेंग नदीवर असणारं रिव्हर राफ्टिंग हे इथलं अजून एक वैशिष्ट्य. १८ किलोमीटर असणारं हे राफ्टिंग कोणत्याही वयाचा माणूस आरामात करू शकतो. हे राफ्टिंग करत असताना अत्यंत दुर्मिळ असा हिमालयन तुरेवाला किंगफिशर आणि आयबिसबिल यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांचं दर्शन घडून जातं.
आसाममधील इतर जंगलं आणि अरुणाचल प्रदेशमधील ‘पाके व्याघ्रप्रकल्प’ यांना जोडणारा ‘नामेरी’ हा अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. एकंदरीत, आनंदाची पर्वणीच असणाऱ्या ‘नामेरी’च्या वास्तव्यात निसर्गप्रेमींचं भान हरपून जातं.
कसे जाल?
पुणे-गुवाहाटी-तेजपूर-नामेरी
भेट देण्यास उत्तम कालावधी
नोव्हेंबर ते एप्रिल
काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी : वाघ, बिबट, क्लाउडेड लेपर्ड, अस्वल, हिमालयन ब्लॅक बेअर, हत्ती, गवा, सांबर, रानकुत्रा, भेकर, हॉग डिअर, खोकड, ससा, कॅप्ड् लंगूर, आसामी माकड, हिमालयन यलो थ्रोटेड मार्टिन, रानडुक्कर, मलाया खार, लाजवंती इत्यादी.
पक्षी : सुमारे ३०० प्रजातींचे पक्षी : व्हाईट विंग्ड् वूड डक, व्हाईट चिक्ड् तित्तिर, रुफस नेक्ड् धनेश, रुडी किंगफिशर, ब्लू इअर्ड् किंगफिशर, तिबोट्या खंड्या, अमूर फाल्कन, जेरडान्स बाझा, काळा बाझार, पल्लास मत्स्यगरुड, मत्स्यगरुड माउंटन इम्पिरिअल पीजन, ब्लू नेप्ड् पिट्टा, व्हाईट क्राऊन्ड् फोर्कटेल, सुलतान टीट इत्यादी.
सरपटणारे प्राणी : किंग कोब्रा , नाग , घोणस ,
मण्यार , अजगर , धामण , असाम रूफ टर्टल ,
इंडियन सॉफ्ट शेल्ड कासव इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.