gopal krishna gokhale
gopal krishna gokhale Sakal
सप्तरंग

सामंजस्याच्या कलेचा समाजसेवक !

अरुण तिवारी (tiwariarun@gmail.com)

गोपाळ कृष्ण गोखले यांची आज १५६ वी जयंती. अवघं ४८ वर्षांचं आयुष्य वाट्याला आलेल्या या माणसानं एवढ्या अवाढव्य खंडप्राय देशाच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त केला. जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी केलेला राजकीय प्रयोग हा एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. थोर समाजसुधारक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे सल्लागार असलेल्या गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींना देखील मार्गदर्शन केलं. मुळात गांधीजींनी भारतामध्ये यावं आणि हा देश पाहावा म्हणून गोखलेच आग्रही होते. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी गांधीजींनी हा देश नीट फिरून पहावा अशी गोखल्यांचीच इच्छा होती.

लोकमान्य टिळकांच्यानंतर दहा वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोखल्यांचा जन्म झाला, पुढे त्यांची वाटचाल देखील टिळकांच्या मार्गानेच झाली. टिळकांप्रमाणे तेव्हाच्या बॉम्बेतील (आताची मुंबई) एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षकी पेशा स्वीकारला. गोखले आणि टिळकांमधील साम्य संपतं ते इथंच. ब्रिटिशांशी दोन हात करण्याबाबत गोखले आणि टिळक यांच्या दृष्टिकोनात आमूलाग्र फरक होता. गोखल्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी भूमिकेशी कधीही तडजोड न करता काही गोष्टी आग्रहाने घडवून आणल्या. गोखल्यांनी १८९७ साली वेल्बे आयोगासमोर तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या खर्चाची केलेली गोळीबंद मांडणी अनेकांना अवाक्‌ करणारी होती. यामुळे ब्रिटिशांच्या बौद्धिक अहंकाराला मोठा धक्का बसला होता.

गोपाळरावांची १९०५ साली बनारस येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली होती. विशेष म्हणजे याच अधिवेशनात स्वदेशी चळवळीचं रणशिंग फुंकण्यात आलं होतं. प्रशासनामध्ये उच्चस्थानी जाऊ पाहणाऱ्या तरुणाईबाबत गोखले बरेच आशावादी होते. आपल्या हातामध्ये काही विशेषाधिकार आले आहेत असं त्यांना वाटता कामा नये, त्यांनी स्वतःहून समाजसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असं गोखल्यांना वाटायचं. इथं गोखल्यांचं प्रेरणास्थान हे पर्शियाचे राजे फ्रेडरिक द्वितीय हे असावेत कारण त्यांनाही नेहमीच स्वतःला राज्याचा प्रथम सेवक म्हणवून घेणं आवडायचं.

गोखल्याचं तत्वज्ञान आजच्या स्थितीमध्येही कुठं लागू पडतं? खरंतर एखाद्या गोष्टीला थेट विरोध करणं हे समाजासाठी थोडसच चांगलं असतं. टोकाची असहमती आणि कटुता मात्र सार्वजनिक जीवनामध्ये फारशी लाभदायी नसते. त्यामुळं तरुणांमध्ये सामंजस्याच्या कलेचा विकास होणं गरजेचे असून त्याचे धडे देखील त्यांना दिले जावेत, याबाबत गोखल्यांचा आग्रह होता. बलराम नंदा यांनी लिहिलेल्या गोखल्यांच्या चरित्रातून मला त्यांच्या तीन अनोख्या गुणवैशिष्ट्यांचं दर्शन झालं.

परस्पर सहकार्याची भावना

अन्यजणांकडून जे मिळतं तेच लोक इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारत बळकावलेला नाही. ते तर त्यांचं केवळ प्रशासकीय कर्तव्य पार पाडत आहेत, नेहमीच त्यांचा तिरस्कार करणं हे देखील फारसं योग्य नाही, असं गोखल्यांना वाटायचं. त्याकाळी लोकांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागायचं त्या गोखल्यांनी ब्रिटिशांसमोर मांडल्या. विशेष म्हणजे त्यावर तोडगा काढण्यात देखील त्यांना यश आलं. परस्पर सहकार्याच्या माध्यमातून गोखल्यांनी काही समस्यांचे निराकरण केलं.

गोखलेंची मुंबई कायदेमंडळ आणि गव्हर्नर जनरल यांच्या इम्पिरिअल कौन्सिलमध्येही निवड झाली होती, या व्यासपीठांचा त्यांनी ब्रिटिश प्रशासन अधिक लोकाभिमुख कसं होईल यासाठी वापर केला. जेव्हा स्वातंत्र्यलढाच सुरू झाला नव्हता तेव्हा सामंतशाही मानसिकतेतून सत्ता गाजविणाऱ्यांना ब्रिटिश प्रशासन चांगला पर्याय ठरू शकतं, किमान ते अंतर्गत कारभार तरी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतं असं गोखल्यांचं प्रामाणिक मत होतं. एखाद्या व्यक्तीनं आपण जसे बोलतो तसंच वागायला देखील हवं. ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्यास्थापने मागे भविष्यातील उत्तम प्रशासक घडविण्याचा गोखलेंचा हेतू होता. कोणताही चेहरा नसलेल्या सामान्य माणसाच्या अधिकारांचे कशा पद्धतीनं जतन करता येईल याचं ज्ञान त्यांना व्हावं म्हणून हा सगळा खटाटोप सुरू करण्यात आला होता. ज्यांच्या हातामध्ये काहीच नाही त्यांना आधार देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.

सर्वशक्तिशाली ब्रिटिशांकडून भारतीयांसाठी अधिक काय चांगलं घेता येईल? याकडे गोखल्यांचं लक्ष होतं. राजकीय संवादाचा दर्जा वाढवून त्यांनी महात्मा गांधी यांच्यासाठी सुपीक भूमी तयार केली होती, पुढे गांधीजींनी त्याच जमिनीत एक मोठा वृक्ष लावला. आताचे राजकीय नेते आणि त्यांचे वारसदार पाहिले तर आपला भ्रमनिरास होतो. राजकारणाचा अर्थ केवळ सत्तेपुरता मर्यादित नाही, ती लोकसेवेची संधी असते. आजच्या स्वार्थी राजकारणाच्या काळामध्ये गोखले एखाद्या दीपस्तंभासारखे भासतात. विदुराचा अभ्यास केल्याशिवाय जसं महाभारत पूर्ण होत नाही तसंच गोखल्यांना अभ्यासल्याशिवाय अन्य राष्ट्रीय महापुरुषांचंही आकलन होत नाही. गोखल्यांना वगळून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचारच होऊ शकत नाही.

(सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT