MLA
MLA 
सप्तरंग

दमदार तुम्ही आमदार...

अरविंद जगताप saptrang@esakal.com

चित्रपटामध्ये सहसा गाण्याची मागणी प्रेमगीताची असते किंवा नृत्यासाठी अथवा ज्याच्यावर नाचता येईल असं गाणं हवं असतं. कवीला आव्हान वाटेल अशा संधी तुलनेनं कमी असतात. मला कविता किंवा गाणं लवकर सुचत नाही. ते वरदान असतं काही लोकांना. पण तरीही कधी कधी गाणं लिहायची वेळ येते. ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ या  चित्रपटाच्या वेळी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी आग्रह केला. तूच लिही. लावणी हवी होती. पण नेहमीसारखी नाही. चित्रपटाच्या कथेला अनुसरून काहीतरी भाष्य करणारी लावणी. शृंगार नसलेली. थेट राजकीय. नेहमीप्रमाणे गाण्याची जबाबदारी टाळून बघितली. पण शक्य झालं नाही. मग प्रयत्न करायचं ठरवलं. 

आपल्याकडे आमदार, खासदार किंवा नगरसेवक कुणी असो. काही गोष्टी कॉमन असतात. सगळे कार्यसम्राट असतात. हा शब्द वापरायचं नेते लोक धाडस कसं करतात काय माहीत ? कुणीही कार्यसम्राट ही पदवी आपल्या नावाला लावून घेतो. खरंतर आपल्या देशात रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, शिक्षण या बाबतीत अजूनही किती तक्रारी आहेत. राष्ट्रीय महामार्ग सोडले तर गावोगाव रस्त्यांची अवस्था आपण बघतो. हजारो खड्डे असलेल्या रस्त्यावर कार्यसम्राट नेत्यांचे भलेमोठे होर्डिंग पाहताना हसावं का रडावं कळत नाही. खड्ड्यामुळं आपली फक्त पाठ दुखत असते. पण होर्डिंग पाहून डोकं पण दुखू लागतं. अशा नेत्यांची आपल्या आसपास कमी नाही. आपण सगळे गावोगाव फिरतो ते योजना बघण्यासाठी. पण दुर्दैवाने आपल्यावर वेदना सहन करायची वेळ जास्त येते. विकासाच्या नावाने पिढ्यानपिढ्या भकास होत जाणारी गावं आणि शहरं दिसत राहतात. ती वेदना मनात साचत राहते. मग नकळत सुचत जाते. 

दमदार तुम्ही आमदार 
चालू द्या, दमानी 
कामं आधी पुरी होऊ द्या 
मंग खुशाल लावा कमानी.. 

आपल्याकडे होर्डिंग आणि कमानीची स्पर्धा आहे. चांगल्या योजना, ग्रंथालय, दवाखाने, तलाव उभे करण्यापेक्षा कमानी उभ्या करून अजरामर होण्याची स्पर्धा चाललेली असते नेत्यांची. दुर्दैवानं त्या कमानी कुणाला सावलीसुद्धा देऊ शकत नाहीत. पण गावोगाव तुम्हाला अशा कमानी दिसतील. शौचालय नसलेल्या गावात हजारो रुपये खर्चून कमानी उभ्या केलेल्या दिसतात. शाळेची इमारत कोंडवाड्यासारखी असते. पोरांना बसायला जागा नसते. आणि खर्च ग्रामपंचायतीच्या सभागृहावर होत असतो. सरपंचांच्या खुर्चीपेक्षा शाळेतल्या शिक्षकाची खुर्ची, मुलांचे बाक चांगले असले पाहिजेत. कारण उद्याचा भारत शाळेत घडत असतो. ज्या गावच्या शाळेत मुलांना वाचायला चांगली पुस्तकं नसतात तिथली नेते मंडळी साक्षर असतील पण सुशिक्षित म्हणण्यासारखी नसतात. आपल्याच कमानी, आपल्याच आरत्या ओवाळून घेणारी माणसं लोकांची दुखः समजून घेऊ शकत नाहीत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमचेच बार आणि कॉलेज तुमची 
कल्याण केलं तुम्ही घरचं 
जरा गावासाठी जरा नावासाठी 
आता होऊ द्या खर्च 

गावासाठी खर्च होऊ द्या हे सांगायची वारंवार वेळ येते. कुणालाही असं वाटत नाही की आजवर सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री वगैरे लोकांच्या वैयक्तिक खर्चासाठी किती पैसे खर्च झालेत याचा हिशोब करावा. त्यामानानं आपल्या मतदारसंघाचा विकास किती झाला याचा ताळेबंद मांडावा ? पाच वर्षात आपल्या नेत्याची जेवढी प्रगती झाली  
त्यामानाने आपली सामान्य नागरिक म्हणून काय प्रगती झाली? नेत्याच्या संपत्तीत हजारो पटीने फरक पडतो. नागरिकाच्या? हा हिशोब मतदार म्हणून कधी करणार आपण? 

अहो नळ आले दारी दहादा 
त्याला पाणी येईल का नाही हो ? 
मरण आलं वाट पाहून 
ते धरण होईल का नाही हो? 

आपण वाट बघतो. काही ठिकाणी पाइपलाइनसाठी फक्त खड्डे खोदतात. त्यात पाईप टाकलेच जात नाहीत. फक्त खर्च दाखवला जातो. जिथे पाईप टाकले जातात तिथे पाणी येत नाही. फक्त नळ बदलले जातात. जेसीबीनं मोठ मोठे खड्डे....पाणी येणार कुठून ? फक्त ठेकेदाराची कमाई होते. गावकरी प्रेक्षक असतात. रोजगार हमी योजनेसारख्या चांगल्या योजनेचा पण नेत्यांनी विनोद करून ठेवला. जुन्या जाणत्या चांगल्या नेत्यांनी केलेल्या चांगल्या कामावर, योजनांवर बोळा पुसलाय. महात्मा गांधी आज असते तर शंभर टक्के खेड्याकडे चला असं म्हणाले नसते, इतकी गावांची वाईट अवस्था केलीय. सगळे पक्ष सारखेच गुन्हेगार आहेत. सब घोडे बारा टक्के. आणि प्रत्येक पक्ष, विचारसरणी ज्या महापुरुषांच्या आठवणी सांगून मतं मागतात त्यांची काय अवस्था आहे? गावोगाव उभ्या केलेल्या  किती पुतळ्यांना बघावं वाटतं? कामचलाऊ नेते असले की पुतळेही कामचलाऊ वाटू लागतात. कित्येक महापुरुष बघावे वाटत नाहीत इतके विद्रूप पुतळे बनवले जातात. हा त्या महापुरुषांचा सन्मान नाही, अपमान आहे हे सुद्धा लोकांना कळत नाहीं. नेते आपल्या आई बापाच्या पुतळ्यावर जेवढा खर्च करतात तेवढा महापुरुषांच्या पुतळ्यावर का करत नाहींत? यांच्या घराण्यातल्या कुठल्या माणसाचा पुतळा असा केविलवाणा दिसतो? आणि पुतळे होऊनही लोकांना काय फायदा होतो? 

पुतळे झाले गावोगाव 
पण माणूस उरलं का नाही हो? 
जरा गावासाठी जरा नावासाठी 
आता होऊ द्या खर्च 

होऊ द्या खर्च हा आपल्यासाठी विनोद असतो. पार्टीचा विषय असतो. पण कुठल्याच राजकीय पार्टीला गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी होणाऱ्या खर्चाची काळजी नाही. किती लाख कोटी विकासासाठी खर्च झालेत आणि नेमका किती विकास झालाय याचा आपल्यालाही पत्ता नाही. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनं किती धावा केल्यात याचा हिशोब आपण अचूक ठेवतो. पण आपल्या आमदार खासदारानं काय काम केलंयं याचा आपल्याकडे हिशोब नाही. शाहरुख, सलमानचे किती सिनेमे किती कोटी कमवतात हे आपल्याला तोंडपाठ आहे. पण आपल्या गावात किती कोटी वाया गेलेत या गोष्टीकडे आपण लक्ष दिलेलं नाही. लिहिण्यासारखं खूप आहे. पण गाण्यातल्या ओळीत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. मनापासून. आपण सगळेच चुकतोय. आपल्याला नेत्यांना दोष देता देता स्वतःलाही अपडेट करायला लागणार आहे. 

लोकशाहीला लावा आग 
गावामधी लाईट नसन तं 
जनतेचंबी बांधा स्मारक 
चांगली कुठं साईट आसन तं 
द्या बटाईनी हे राज्य तुम्ही 
कंडीशन लई वाईट आसन तं 
जरा गावासाठी जरा नावासाठी 
आता होऊ द्या खर्च..

(सदराचे लेखक गीतकार व लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT