Ashok Patki writes Himesh Reshammiya father Bipin Reshammiya introduced synthesizer in industry for first time 1975
Ashok Patki writes Himesh Reshammiya father Bipin Reshammiya introduced synthesizer in industry for first time 1975  
सप्तरंग

सिंथेसायझर...

अशोक पत्की

आताचा आघाडीचा संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील बिपीन रेशमिया यांनी १९७५ मध्ये सिंथेसायझर पहिल्यांदा इंडस्ट्रीत आणले

आताचा आघाडीचा संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील बिपीन रेशमिया यांनी १९७५ मध्ये सिंथेसायझर पहिल्यांदा इंडस्ट्रीत आणले. त्या वेळी ते वाद्य बिपीन रेशमिया भाड्याने देत असत. हळूहळू त्याची मागणी वाढू लागली. एक दिवस मी श्री. कल्याणपूर यांना म्हणालो, की सिंथेसायझर नावाचे एक नवीन वाद्य आले आहे. ते सगळ्या वाद्यांपेक्षा भारी आहे. त्या वेळी लगेचच आमचा कॅनडा दौरा होता. श्री. कल्याणपूर यांनी ते वाद्य आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचविले होते. सुमनताई आणि आम्ही सगळ्यांनी सिंथेसायझरसह रिहर्सल केली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला. मी सिंथेसायझर सुरू करण्यास गेलो. माझी बोटे फिरत होती. त्यातून आवाज काहीच येत नव्हता...

गोष्ट १९६९ची. सांताक्रूझ विमानतळावर आम्ही रात्री दहा वाजता पोहोचलो. सेव्हन ओ सेव्हन बोइंग या विमानात आम्ही पहिल्यांदाच बसणार होतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप उत्सुकता होती. खिडकीजवळ जागा मिळावी, याकरिता आमच्यामध्ये चढाओढ लागलेली होती. एअर इंडियाचे ते विमान होते आणि विमानात खाण्या-पिण्याची चांगली रेलचेल होती. जेवण उत्तम होते. एकूणच तो तामजाम पाहून आम्ही सगळे भलतेच खुश होतो. जेव्हा आम्ही वेस्ट इंडिज विमानतळावर उतरलो तेव्हा आमचे स्वागत अगदी भारतीय पद्धतीने करण्यात आले. हारतुरे घालून ओवाळणी करण्यात आली.

चार ते पाच गाड्यातून आम्ही सगळी मंडळी हॉटेलकडे गेलो. वेस्ट इंडिज म्हणजे दुसरे गोवा. बैठी घरे, छोटी नारळाची झाडे, लांब समुद्रकिनारा तसेच तेथील माणसेही हिंदी किंवा इंग्रजी भाषा बोलणारी. त्या वेळी सुमनताईंनी सोलो गाणी गायली. ड्युएट गाणी गाणार कोण, असा प्रश्न सगळ्यासमोर उभा राहिला होता. सुमनताईंनी मला ड्युएट दोन ते तीन गाणी बसविण्यास सांगितली आणि ही गाणी अशोक तुम्हीच माझ्याबरोबर गायची असे सांगितले. मी घाबरत घाबरत ती गाणी गायली. माझ्याही गाण्याला छान प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर साधारण एक महिन्याने हिल्टन हॉटेलमधील एक माणूस मला भेटायला आला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही गायक म्हणून आमच्या हॉटेलमध्ये काम करणार का? तुम्हाला गाडी-बंगला आणि चांगले मानधन देऊ. दररोज संध्याकाळी एक तास हिंदी गाणी गायची.’’

मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ द्या. मला माझ्या आई-बाबांशी बोलायला लागेल.’’ त्यानुसार मी आई-बाबांशी संपर्क साधला आणि विचारले. त्यांनी सांगितले की, ‘‘आपली संस्कृती आणि आपले आचारविचार वेगळे आहेत. तू लहानाचा मोठा मुंबईमध्ये झाला आहेस. थोडे दिवस तुला तेथे छान वाटेल. नंतर तुला कंटाळा येईल. त्यामुळे तू ज्या ग्रुपबरोबर गेला आहेस, त्यांच्याबरोबर परत ये.’’ आता लोक म्हणतात, की अशोक तू भारतात परत आलास, ते बरे झाले. नाही तर आपण एका चांगल्या संगीतकाराला मुकलो असतो.

छोट्या छोट्या शहराचे वसलेले वेस्ट इंडिज आहे. बार्बाडोस, त्रिनिदाद अशी काही नावे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल, तर सहा व्यक्ती बसतील, अशी विमाने होती. एखादा जाडजूड माणूस असला, तर केवळ पाच माणसे. हा सगळा अनुभव आमच्यासाठी नवीन होता. त्रिनिदादला श्रीकृष्णाचे मंदिर होते. तेथे भजनाचा कार्यक्रम सुमनताईंनी केला. आम्ही तो दौरा खूप एन्जॉय केला. साधारण तीनेक महिन्यांनी आम्ही मायदेशी परतलो. त्यानंतर सुमनताईंच्या मुलीला सुट्टी असली, की आम्ही परदेश दौऱ्यावर जायचो. कधी लंडन, कधी सिंगापूर, अमेरिका, दुबई, कॅनडा असे वेगवेगळे देश आम्ही फिरलो. तब्बल पंधरा वर्षे आम्ही सतत परदेश दौरे करीत होतो. त्यानंतर जगजित सिंह यांच्याबरोबर अमेरिका, कुवेत आणि ऑस्ट्रेलिया येथे जाण्याचा योग आला.

नंदू भेंडेबरोबर लंडनला जाऊन आलो. त्याचे असे झाले की, माझे सन १९८२ मध्ये लग्न झाले होते आणि मी काश्मीरला गेलो होतो. तेव्हा मला नंदूचा फोन आला. विचारले, ‘‘तू परत कधी येणार आहेस? आपल्याला लंडनला जायचे आहे?’’ मी म्हणालो, ‘‘आता लंडनला मी एकटा येणार नाही, तर आम्ही दोघे येऊ.’’ त्याने ते हसतमुखाने मान्य केले. तेव्हा लंडनचे रिटर्न तिकीट दहा हजार रुपये होते. आम्ही लंडनला गेलो. स्वच्छ रस्ते, थंडगार हवामान. तेथील शिस्त बघितली. तिथे दीडेक महिना आम्ही होतो.

त्यानंतर माझे स्वतःचे कार्यक्रम होऊ लागले. तेव्हा मीदेखील विविध परदेश दौरे केले. महेश मांजरेकरांनी मराठी चित्रपट पुरस्कार लंडनला ठेवला होता. तेथे मला ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणार होता. त्यामुळे लंडनला गेलो होतो. आता २०१९ मध्ये मला डॅलस येथून फोन आला आणि तेथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम मी केले. तेव्हा माझ्याबरोबर मंदार आपटे, माधुरी करमरकर वगैरे मंडळी होती.

१९७५ मधील एक गोष्ट. आताचा आघाडीचा संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील बिपीन रेशमिया. त्यांनी सिथेंसायझर पहिल्यांदा इंडस्ट्रीत आणले. त्या वेळी ते वाद्य बिपीन रेशमिया भाड्याने देत असत. हळूहळू त्याची मागणी वाढू लागली आणि मग प्रत्येक स्टुडिओत अर्थात फेमस स्टुडिओ, मेहबुब स्टुडिओ, फिल्म सेंटर (हाजीअली) बॉम्बे लॅब (आगरबाजार) वगैरे ठिकाणी ते वाद्य ठेवण्यात आले. त्यानंतर स्टुडिओंची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. एके दिवशी मी श्री. कल्याणपूर यांना म्हणालो, की सिंथेसायझर नावाचे एक नवीन वाद्य आले आहे. ते खूप भारदस्त आहे. त्याचा आवाज दणदणीत आहे. ते सगळ्या वाद्यांपेक्षा भारी आहे. पुढे त्यांना असेही सांगितले, की सुमनताईं गात असताना मी हार्मोनियम वाजवीनच आणि म्युझिक आले की सिंथेसायझर वाजवीन. म्हणजे कार्यक्रम कसा भरगच्च आणि उत्तम होईल. त्या वेळी लगेचच आमचा कॅनडा दौरा होता म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या वाद्याची सगळी माहिती घेतली आणि आम्ही कॅनडाला गेलो तेव्हा ते वाद्य आमच्यासमोर हजर. श्री. कल्याणपूर यांनी फोन करून ते वाद्य आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचविले होते. मग सुमनताई आणि आम्ही सगळ्यांनी एक रिहर्सल करायची, असे ठरविले. खरे तर त्या वाद्याबाबत मला काही माहिती नव्हती; तरीही मी प्रयत्न केला. आमची रिहर्सल छान झाली.

या नव्या वाद्यामुळे गाण्यांमध्ये जीव आल्यासारखे वाटले. सुमनताई म्हणाल्या की, आता रिहर्सल पुरे झाली. उद्या सगळ्यांनी कार्यक्रमाची तयारी करा... सगळ्यांना ऑल द बेस्ट. ते नवीन वाद्य बंद केले आणि बॅगेत ठेवले. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला. सुमनताईंचे नेहमीप्रमाणे पहिले गाणे झाले. नंतर मी सिंथेसायझर सुरू करण्यास गेलो. त्यावर हात ठेवला. माझी बोटे फिरत होती; परंतु त्यातून आवाज काहीच येत नव्हता. सुमनताईंच्या ही बाब लक्षात आली आणि दुसरे गाणे घेणार तोच त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, की या वाद्याचा नीट अभ्यास करा आणि वाजवायला घ्या. आता मुंबईला जाईपर्यंत त्याला हात लावू नका... मी लगेच ते वाद्य बंद करून टाकले. त्याला हातच लावला नाही. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर मी वाद्याचा परिपूर्ण अभ्यास केला. क्षणभर मलाही वाटले, की किती बटणे आहेत त्या वाद्यामध्ये आणि वेगवेगळे आवाज किती येऊ शकतात. आज त्या वाद्यामुळेच माझ्याकडे गाडी आली व घर आले... सकाळी आठ ते रात्री दोन वाजेपर्यंत मी रेकॉर्डिंग करीत असे. ही सगळी सिंथेसायझरची कमाल होती. त्यातच सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी आज चांगला वादक, चांगला अॅरेंजर व संगीतकार झालो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT