महायान काळातली सुंदर शिल्पं sakal
सप्तरंग

महायान काळातली सुंदर शिल्पं

वेरुळच्या लेणींची नावे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दक्षिणेकडे असलेल्या लेणी, ज्यांना क्र. १ ते १२ असे क्रमांक दिले आहेत त्या बौद्ध धर्मीय लेणी आहेत. त्यातील दहाव्या क्रमांकाचे ‘विश्वकर्मा’ किंवा ‘सुतार लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुरा-पर्यटन

केतन पुरी,ketan.author@gmail.com

वेरुळच्या लेणींची नावे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दक्षिणेकडे असलेल्या लेणी, ज्यांना क्र. १ ते १२ असे क्रमांक दिले आहेत त्या बौद्ध धर्मीय लेणी आहेत. त्यातील दहाव्या क्रमांकाचे ‘विश्वकर्मा’ किंवा ‘सुतार लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अकरावी लेणी ‘दोन ताल’ आणि बारावी लेणी ‘तीन ताल’ म्हणून प्रसिद्ध आहे. वेरुळच्या उत्तर आणि दक्षिण भागात, डोंगराच्या उतारावर एकाच वेळी दोन वेगळ्या धर्मीयांनी लेणींची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यातील बौद्ध लेणींच्या निर्मितीसाठी अजिंठा, घटोत्कच वगैरे भागात कार्यरत असलेले कारागीर वेरुळ परिसरात दाखल झाले होते. अनेक अप्रतिम आणि अविश्वसनीय शिल्पांची निर्मिती होऊ लागली.

वेरुळच्या १२ बुद्ध लेणींपैकी केवळ १ चैत्यगृह आहे. बाकी सर्व लेणी विहार प्रकारातील आहेत. पहिल्या क्रमांकाच्या लेणीमध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्प नाही. हे अत्यंत साधे विहार आहे. वेरुळच्या इतर बौद्ध लेणींमधून अनेक शिल्पांची रेलचेल दिसून येते. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या धर्मचक्रप्रवर्तन, भूमिस्पर्श वगैरे मुद्रेतील भव्य प्रतिमा आहेत. त्यासोबतच बोधिसत्त्व अवलोकितेश्वरच्या प्रतिमाही ठळकपणे नजरेस भरतात. हातामध्ये वज्र धारण केलेला वज्रपाणी, कमलधारी पद्मपाणी, पुस्तक हातामध्ये घेतलेला बोधिसत्त्व मंजुश्री, मधुश्री, हातामध्ये ध्वजधारण केलेला ज्ञानकेतू, फुलांची माळा हातामध्ये घेतलेला मैत्रेय, तलवार हातामध्ये धरलेला स्थिरचक्र वगैरे बोधिसत्त्वांच्या प्रतिमाही विपुल स्वरूपात आहेत. अनेक लेणींच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धांच्या प्रतिमेसोबत या बोधिसत्त्वांच्या प्रतिमा अंकित केल्या आहेत.

लेणी क्र. ११ आणि १२ मधील बोधिसत्त्व तर तब्बल १२-१५ फूट उंचीचे आहेत. तसेच तारा, महामायुरी, हारितीसारख्या स्त्री देवतांचे अंकन विपुल प्रमाणात केले आहे. हारितीची कथा मोठी विलक्षण आहे. हारिती ही यक्ष जाती कुळातील. असे म्हणतात, की हारिती राजगृहातील लहान मुलांना पकडून त्यांना खात असे. हारितीचे जंभालसोबत लग्न झाले होते. जंभाल हा बौद्ध परंपरेतील कुबेर म्हणून ओळखला जातो. या जंभालासोबत लग्न झाल्यावर या दांपत्याला तब्बल पाचशे मुलं झाली. पण तरीही तिची दुसऱ्यांचं मुल खाण्याची दुष्ट सवय गेली नाही. एकदा गौतम बुद्धांनी तिचा सर्वांत लहान आणि अतिशय आवडता मुलगा ‘प्रियंकर’ लपवून ठेवला. आपल्या लाडक्या पुत्राच्या वियोगाने हारिती हतबल झाली, व्याकूळ झाली. तिच्या आतमध्ये असणारे मातृत्व जागे झाले. गौतम बुद्धांकडे क्षमायाचना केल्यानंतर तिने पुन्हा कधीही लहान मुलांना त्रास न देण्याचे वचन दिले. बुद्धांनी तिचे मूल परत केले. तेव्हापासून हारिती लहान मुलांची संरक्षक देवता म्हणून प्रसिद्ध झाली.

अजिंठ्याच्या लेणी क्र. २ मध्ये हारिती आणि जंभालासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. वेरुळला कित्येक ठिकाणी आपल्याला हे जोडपे एकत्रितपणे कोरलेले पाहायला मिळतात. वेरूळच्या लेणीसमूहात कोरलेले एकमेव चैत्यगृह म्हणजेच ‘विश्वकर्मा लेणी’ अनेकांगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक अभ्यासकांच्या मते, भारतात खोदण्यात आलेले सर्वांत शेवटचे चैत्यगृह आहे. ही लेणी दुमजली आहे. या लेणीचे चैत्य गवाक्ष सुद्धा विशेष आहे. नेहमीप्रमाणे पिंपळाच्या पानाचा आकार न देता काहीसा आयताकृती आकार देत दोन्ही बाजूंना दोन खिडक्या कोरण्यात आल्या आहेत. या गवाक्षाच्या समोरील बाजूस भलामोठा छज्जा तयार करण्यात आलाय. एका अरुंद रस्त्याने आपल्याला लेणीच्या वरच्या बाजूस जाता येते. या चैत्य गवाक्षावर आपल्याला एक शिलालेख कोरलेला दिसतो. त्याचा अर्थ असा होतो, ‘सर्व गोष्टींना काही ना काही कारण आहे व हे कारण तथागत बुद्धांनी निवेदिले आहे. प्रत्येक वस्तुमात्राला अंत आहे आणि हेच तत्त्व महाश्रमणांनी सांगितलं आहे.’ हा मंत्र महायान काळात फार प्रसिद्ध होता आणि याचा वापर अनेक महायानपंथीय आचार्यांनी केला आहे. महायान काळातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तूपाच्या समोरील भागात कोरण्यात आलेली बुद्ध प्रतिमा. महाराष्ट्रात नाशिक, अजंठासारख्या महायान काळात निर्माण करण्यात आलेल्या लेणी समूहात अशाप्रकारची रचना आपल्याला आढळून येते. वेरुळच्या विश्वकर्मा लेणीतील स्तूप सुद्धा असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

लेणी क्र. ११ आणि १२ अनुक्रमे दोन ताल आणि तीन ताल या नावांनी ओळखण्यात येतात. दोन्ही लेणी तीनमजली आहेत तरीही असं नामकरण करण्यामागे एक गंमत आहे. ११ व्या क्रमांकाच्या लेणीचा तळमजला १८७६ पर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखाली लपला होता. वेरुळच्या लेणींचा अभ्यास आणि त्यांचे लिखित स्वरूपातील नोंदणीचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सुरू झाले होते. नंतर कधीतरी हा मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला आणि ही दोन ताल लेणी तीन मजल्यांची असल्याचे आढळून आले.

लेणी क्र. ११ आणि १२ ह्या बौद्ध धर्मीयांच्या अखेरच्या कलाकृती म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा राष्ट्रकूट राजांकडून वेरुळच्या प्रसिद्ध कैलास मंदिराचे निर्माण कार्य सुरू होते, त्या कालखंडात म्हणजेच आठव्या शतकाच्या मध्यान्हात कधीतरी या दोन्ही लेणींची उभारणी सुरू होती. अभ्यासकांच्या मते, या लेणीच्या निर्मितीसाठी राष्ट्रकूट राजांनी दान दिले असण्याची शक्यता आहे. १२ क्रमांकाच्या लेणीमध्ये चौदा बुद्ध प्रतिमा आहेत. हे फार दुर्मीळ अंकन आहे. मानवजन्मातील प्रत्येक कल्पात बुद्ध पदवी प्राप्त झालेल्या चौदा बुद्धांचे अंकन येथे दिसून येते. त्यांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत विपाश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छंद, कनकमुनी, काश्यप आणि शाक्यसिंह हे ध्यानमुद्रेत असून गर्भगृहाच्या डाव्या बाजूला यांचे अंकन आहे. तर उजव्या बाजूस वैरोचन, अक्षोभ्य, रत्नसंभव, अमिताभ, अमोखसिद्ध, वज्रसत्त्व, वज्रराज बुद्धांचं अंकन आहे.

वेरुळच्या बौद्ध धर्मीय लेणी फार सुंदर आहेत. गौतम बुद्ध, बोधिसत्त्व अवलोकितेश्वर, तारा या आणि यांसारख्या अनेक बौद्ध देवतांचा अभ्यास करण्यासाठी वेरुळ निर्विवादपणे सर्वोत्तम ठिकाण आहे, यात शंका नाही. या बौद्ध लेणींच्या निर्मितीवेळी त्याच डोंगरावर उत्तर दिशेला अतिभव्य अशा धुमार, रामेश्वर लेणींची निर्मिती होत होती. त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी पाहू या पुढील भागात.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक

असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT