बिल्किस
बिल्किस SAKAL
सप्तरंग

बिल्किस, आम्हाला माफ कर!

रसिका आगाशे

प्रिय बिल्किस,

आम्हाला माफ कर... शक्य असेल तर!

तुझी मुलगी मारली गेली. तुझ्या घरचे लोक मारून टाकण्यात आले. तू गरोदर असताना तुझ्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारे तुझ्या शेजारपाजारचे, तुला ओळखणारे होते. त्यांनी तुला घराबाहेर मुलीशी खेळताना, वाण सामान आणताना बघितलं असणार. रस्त्यात येताना जाताना सलाम दुआ, नमस्कार, चमत्कारही झाले असतील कदाचित; पण म्हणून धार्मिक उन्माद कमी होत नाही हे त्यांनी सिद्ध केलं! ते एकामागून एक असा तुझ्यावर बलात्कार करत राहिले.

तू वाचलीस आणि हिमतीने केस लढवत राहलीस. ते लोक गजाआड गेले आणि आता सुटून बाहेर आले. त्यांचा बाहेर लाडू-पेढा देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचं स्वागत करण्यात आलं. आम्ही हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि काहीही करू शकलो नाही. आम्ही सगळे घाबरलेलो आहोत गं!

तुला भीती नाही वाटली? कुठून आणलीस एवढी हिम्मत? शारीरिक, मानसिक अत्याचार झाल्यानंतर, जवळचं कुणी राहिलं नाही, तेव्हा कुठून लढा द्यायला शिकलीस? ज्यांनी तुझं आयुष्य संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, ते विजयोन्मादात बाहेर आले तेव्हा काय वाटलं असेल तुला? योनीच्या त्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या का गं?

किळस, फक्त किळस वाटत राहली, जेव्हा त्यांच्या सुटकेची बातमी वाचली. आम्ही एक नाटक केलं होतं बिल्किस. बलात्कारित, पीडित, एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्या, ॲसिड फेकलेल्या, रस्त्यातून सुरक्षितपणे घरी न येऊ शकणाऱ्या बायकांचं नाटक... त्यात तुझं एक पात्र होतं. या परिस्थितीमध्ये ही आशा देणारं, जगण्याची नवीन उमेद देणारं पात्र. जे तू आहेस. एक समाज म्हणून तुझ्यासोबत अनेक लोक उभे राहिले. त्या सगळ्यांचे आभार मानणारा तुझा व्हिडीओ मला अजूनही आठवतो. आज त्या समाजातले असंख्य जण न्यायाची बाजू घेतली म्हणून स्वतःच गजाआड आहेत आणि नराधम सुटलेले आहेत. गुजरातमधल्या एका आमदाराने असेही म्हटले आहे, की ‘‘सुटलेल्या गुन्हेगारांपैकी अनेक ब्राह्मण आहेत आणि सुसंस्कारी आहेत’’ यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत आणि तशीही प्रतिक्रिया देण्याची भीती वाटते गं हल्ली.

आम्हाला खरंच माफ कर बिल्किस. आम्ही घाबरट आहोत. या देशात बाईला न्याय मिळणं हीच अवघड गोष्ट आहे. त्यात तू मुसलमान! धार्मिक दंग्यांमध्ये तुझ्यावर बलात्कार झाला. तुझ्या धर्माच्या लोकांना शिक्षा द्यायचा हाच मार्ग होता म्हणे माझ्या धर्माच्या लोकांकडे. शतकानु शतके तुझ्या धर्माचे लोक हेच करत आले आहेत असं आम्हाला रोज सांगितलं जातं. त्याचा बदला म्हणून तुझ्यावर बलात्कार केला गेला होता गं. तू स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून तुझं वेगळं काही अस्तित्व नव्हतं त्या क्षणी. तू फक्त तुझ्या धर्माची प्रतिनिधी होतीस आणि तुझी योनी हे बदला घेण्याचं स्थान होतं!

अनेक लोक असंही म्हणत आहेत, की तू जिथे राहतेस त्या गुजरात राज्यात निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे तुझ्या गुन्हेगारांना लवकर सोडून देणे हा तुझ्यापान पान १ वरून

समाजातील लोकांसाठी दिलेला एक इशारा आहे. तुला अजूनही वाटत होतं, की तू व्यक्ती आहेस. छे गं, आपण फक्त आपल्या जात, धर्म यांचे प्रतिनिधी आहोत. तेही गरज भासल्यास.

इथे अनेक लोक म्हणतील, की जेव्हा मुसलमान लोक हिंदू स्त्रियांवर बलात्कार करतात तेव्हा तू काही बोलत नाहीस! (खरं तर प्रत्येक बलात्काराच्या बातमीनंतर माझ्यातली बाई रोज कणाकणाने मरते आहे असंच वाटतं आणि हो, मी बोलतच राहते.) दुसरा एक मतप्रवाह हाही असतो, की माणूस सुधारू शकतोच, गुन्हेगारांना दुसरी संधी मिळाली पाहिजे. खरं सांगू बिल्किस, मी फाशीच्या शिक्षेचा कायम विरोध करत आले आहे, कारण एका माणसाला फाशी दिली, की आपण समाज म्हणून त्या गुन्ह्याच्या भागीदारीतून स्वतःला मोकळं करून घेतो. गुन्हेगार सुधारू शकतात, यावर माझाही विश्वास आहे; पण गुन्हेगार सुटून आल्यावर जर त्याचा सत्कार होणार असेल तर...?

बिल्किस, तू मला ओळखत नाहीस; पण माझ्यासारखे अनेक आहेत, ज्यांना आता या क्षणी, तुला घट्ट मिठी मारून... तुझ्याचकडून थोडी हिम्मत घ्यायची आहे. राजकारण, धार्मिक उन्माद, सडलेले मेंदू या सगळ्यात एक माणुसकी नावाची गोष्ट, एक मानवी संस्कृती, याचं रोज पतन होत आहे. ते डोळ्यांदेखत घडत असताना, आम्ही मांजरासारखे डोळे मिटून घेतले आहेत.

आम्हाला माफ करू नकोस. खरं तर, जेव्हा आजच्या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा समाज म्हणून आम्ही किती सडलेले होतो याचं उदाहरण म्हणून आमचा उल्लेख होईल... आमच्यासारख्यांच्या वाट्याला हेच येऊ शकतं; पण तू हिम्मत सोडू नकोस!

बिल्किस, तू वाचलीस आणि हिमतीने केस लढवत राहलीस. ते लोक गजाआड गेले आणि आता सुटून बाहेर आले. त्यांचं स्वागत करण्यात आलं. आम्ही हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि काहीही करू शकलो नाही. आम्हाला माफ कर बिल्किस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT