british nandi writes jp nadda congress party trinmool congress 
सप्तरंग

ढिंग टांग : नड्डाजींची बखर!

ब्रिटिश नंदी

जे भविष्यात घडणार आहे, ते आत्ताच लिहून ठेवलेले बरे! कोणे एकेकाळी नोस्ट्राडामस नावाचा एक पुण्यात्मा होऊन गेला. त्याने संपूर्ण जगाचे भविष्य लिहून ठेवले होते. एकविसाव्या शतकात एक दाढीधारी योद्धा घोड्यावरुन दौडत येईल, आणि सारे जग जिंकेल असे त्याचे भाकित होते. ते खरे ठरले! नमो नम:!!

नोस्ट्राडामसला सतत दृष्टांत होत. विशेषत: सायंकाळी तो अनुष्ठानाला बसला, की त्याला थोड्यावेळाने आपोआप दृष्टांत होत. आजही अनेक लोक सायंकाळी बसतात, पण त्यांना दृष्टांत होत नाहीत. कां की ते पुण्यात्मा नसतात! हल्ली हल्ली मलाही अनुष्ठानाला न बसताच दृष्टांत होऊ लागले आहेत. येणारा काळ मला स्पष्टपणे दिसतो आहे. नमो नम:!

नोस्ट्राडामसने सगळे भविष्य सांकेतिक, गूढ लिपीत आणि भाषेत लिहून ठेवले. भरीस भर म्हणजे त्यातही काव्यरुपात लिहून ठेवले. (कोण वाचणार?) बखर ऐतिहासिक भाषेत लिहावी, अशी सूचना होती. पण ती तरी कोण वाचणार? म्हणून मराठीत लिहितो आहे. भविष्यातील पिढ्या पोथी उघडून पाहतील, आणि च्याट पडतील. कुणीएक नड्डाजी नामक भविष्यवेत्त्याने किती अचूक भविष्य लिहून ठेवले आहे, असे म्हणून मनोमन हात जोडतील. नमो नम:!

आगामी काळात पुढील पन्नास युगे कमळ पक्षाचेच राज्य असेल. त्याच्यापुढली पन्नास युगेही कमळ पक्षाचीच असतील. कमळ पार्टी सोडल्यास एकही पार्टी उरणार नाही. कारण सगळेच मतदार कमळ पार्टीच्या उमेदवारालाच एकगठ्ठा मते देतील. इतर पार्टीचे उमेदवार नसतीलच, कारण इतर पार्ट्याच नसतील!! काँग्रेसची अवस्था आत्ताच इतिहासजमा झाल्यागत आहे. परिवाराद्वारे चालवला जाणारा कुठलाही राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्ष औषधालाही उरणार नाही. सगळेच्या सगळे एक तर कमळ पक्षात विलीन होतील, किंवा या पक्षाचे नेते अन्य पारिवारिक उद्योगांना लागतील. नमो नम:!

उदाहरणार्थ, प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे तण नष्ट होतील. राजकारणातून निवृत्त झालेल्या ममतादिदींच्या पेंटिंग्जची प्रदर्शने लागतील, आणि त्या प्रदर्शनांचे वृत्तांकन आणि छायाचित्रे छापून आणण्यासाठी त्या माध्यमांच्या कचेऱ्यांमध्ये खेट्या घालतील. तरीही कोणी त्यांची चित्रे विकत घेणार नाही! उरलेल्या (चिक्कार) वेळेत त्या कविता लिहितील. कवितांना हल्लीच बरे दिवस नाहीत, भविष्यात तर सगळेच अवघड आहे. त्यामुळे त्यांच्या कविता दिवाळी अंकातही कोणी छापणार नाही.

दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचे नेते देशभर पांगतील, आणि इडली-डोश्यांच्या रेहड्या टाकतील. काही विकासशील नेते हॉटेले टाकतील. ‘येथे बालकामगार काम करत नाहीत’ किंवा ‘येथील नोकरांना दररोज पगार दिला जातो’ असल्या पाट्या लिहून सचोटीने व्यवसाय करतील! त्याहूनही छोट्या प्रादेशिक पक्षांचे नेते केळी विकतील! आवळ्याच्या सीझनमध्ये आवळे विकतील!! नमो नम:!

महाराष्ट्रात परिवारवादी शिवसेना हा पक्ष कमळ पक्षात जवळपास विलीन झालाच आहे. उरलेले नेते एक तर बटाटेवडे विकतील, किंवा पोलिसांच्या पिंजरा गाड्यांतून फिरताना दिसतील! मराठी अस्मितेच्या आरोळ्या कमळ पक्षातले पुढारीच ठोकताना दिसतील!! नमो नम:!

आगामी काळात देशात सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त कमळाचेच चिन्ह दिसेल. इतके की या देशात गुलाब, जास्वंद, झेंडू, तेरडा, घाणेरी आदी फुले फुलतच नाहीत, असा जगात समज पसरेल. कमळ डबक्यात उगवते, पण भविष्यकाळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने कमळाची कुंडीतही लागवड करता येईल. चंद्र, शुक्र आणि मंगळावरही कमळ पक्षाची कार्यालये उघडतील. आता बास! नमो नम:!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT