सप्तरंग

जगण्यातलं शहाणपण (मधुराणी प्रभुलकर)

मधुराणी प्रभुलकर

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर
आजकाल तशी प्रत्येक घरी एकेकटीच असतात मुलं. आम्हालाही स्वराली, एकुलती एकच. तरी बरं आमच्या सोसायटीत भरपूर मुलं आहेत. खेळायला खाली जागा आहे. मोकळं ढाकळं वातावरण आहे. त्यामुळे क्वचित कुणाला सॉरी म्हणणे, आपली वस्तू दुसऱ्याला देणे, वाटून घेणे, भांडून परत एकत्र येणे मूलभूत समाजात मिसळण्याचे नियम आपोआप शिकायला मिळतात. नाहीतर बंद दरवाज्यांच्या सोसायट्यांमध्ये मुलं अगदी एकलकोंडी, आत्मकेंद्री आणि एकटी-एकटी होत चालली आहेत. 

तर गेल्या काही दिवसांपासून कोकणातून, ओळखी-ओळखीतून, एक ‘ताई’ आणलीय स्वरालीशी खेळायला, तिच्याकडे थोडं लक्ष द्यायला वगैरे. १७-१८ वर्षांच्या या ताईचं नाव आहे ‘दामिनी’. ५-६ दिवसच झालेत तिला येऊन, येता क्षणी तिनं स्वरालीला आपलंसं केलं. दोघी खूप मस्ती करतात. लपाछपी, पकडापकडी, भिकार- सावकार मस्त खेळत असतात. तासन्‌तास चित्र रंगवत बसतात. तिचे मराठीचे उच्चार थोडे वेगळे आहेत. ‘खेलुया’, ‘पलुया’ असं म्हणते. 

स्वरालीला आधी खूप हसू यायचं. आता तिने तिची ‘ळ’ची शिकवणीसुद्धा घ्यायला सुरवात केलीय. आल्यापासूनच ती घरातल्यासारखी वाटली म्हणून मी तिला म्हटलं, ‘मला मॅडम नको हं, ताईच म्हण!’

तर तिने माझं सहज ‘ए ताई’ केलं आणि तिसऱ्याच दिवशी मला झापलेसुद्धा. ‘कसं लावलंयस तू कपाट? असं कोंबतेस का कपडे कपाटात? नीट ठेव नं...!’ तिच्या या दटावणीनी मला हसूच यायला लागलं. ‘अगं, नीट ठेवलं तर सापडतच नाहीत मला कपडे’, असं गमतीशीर उत्तर देऊन मी मोकळी झाले. इतके दिवस एकच चिमणी चिवचिवायची... आता दोन!

मी आणि प्रमोद परवा तिच्याशी गप्पा मारत होतो. तिला कसली आवड आहे, पुढे काय शिकायचं, कुठला कोर्स वगैरे करायचाय का? वगैरे, वगैरे. त्याचवेळी तिला विचारलं, तिच्या गावाविषयी घरच्यांविषयी. ही दामिनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली जवळच्या खेड तालुक्‍यातील ‘पोयनार’ नावाच्या गावी राहते. मातीचं घर, शेणानं सारवलेलं, कौलारू छप्पर, आसपास झाडी, जवळच ओढा! आम्हाला दोघांनाही कोकण फार आवडतं. त्यात तिने केलेलं हे वर्णन रम्य वगैरेच वाटत होतं. ती पुढे सांगू लागली. तिला अजून ३ बहिणी आहेत. बाबा एकटेच कमावते. पगार ५०००. ‘काय?’ आम्ही चकितच झालो.

आपसूकच तोंडातून बाहेर पडलं, ‘‘भागतं?, कसं काय?’’

ती म्हणाली, ‘थोडी शेती आहे. त्यात भात, नाचणी, थोड्या भाज्या पिकवतो. तेच खातो. एक गाय आहे. तिचं दूध घेतो. एकमेकींचे कपडे घालतो. सणावाराला नातेवाईक कपडे घेतात ते पुरतात वर्षभर!’’ असं म्हणत ती निरागस आभाळभर हसली. मी आणि प्रमोद एकमेकांकडे बघतच राहिलो. सेंद्रिय भाजी, धान्य आणण्यासाठी आम्ही किती पैसे मोजतो. गाईच्या शुद्ध दुधासाठी लांब प्रवास करून जातो... आणून फ्रीजमध्ये ठेवून ८ दिवस वापरतो. प्रदूषण विरहित हवा मिळवण्यासाठी सकाळी झाडीत फिरायला जातो. खूप कष्ट करतो, कितीही कमावले तरी पुरत नाहीतच पैसे! हे पाच हजारात सर्वांत उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य जगतायत. मला अचानक तिचा, तिच्या जीवनाचा हेवा वाटायला लागला आणि स्वतःच्या सततच्या असंतुष्ट धडपडीची कीव!

मी तिला न राहवून विचारलं, ‘बाई गं, इथे कशाला आलीस तू?’ तर म्हणे, ‘बाबा म्हणाले, शहरात जा. शहाणपण शीक. मी काय अभ्यासात चांगली नाही. तर म्हटलं, पैसे कमवेन. धाकटी हुशार आहे, तिला शिकवेन’ एवढ्याशा त्या कुडीतल्या जिवाचा, मनाचा मोठेपणा बघून मला गलबलून आलं आणि मनात म्हटलं, ‘बाई गं, तुझ्यापाशी असलेलं शहाणपण पुरेसं आहे गं जगायला! आम्ही आमच्या मुलांना कुठल्याही बोर्डाच्या कितीही महागड्या शाळेत घातलं नं तरी हे नाही शिकवू शकणार... जे तू शिकलीस जगण्यातून...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT