सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ ; पुण्यात बर्फ पडला तर!

परतीचा पाऊस नुकताच परतून गेला असला तरी अचानक सरप्राईज द्यायला कधीही परतून येऊ शकतोच.

प्रसाद शिरगावकर

पुण्यात आता चांगलीच थंडी पडायला लागली आहे. आणि परतीचा पाऊस नुकताच परतून गेला असला तरी अचानक सरप्राईज द्यायला कधीही परतून येऊ शकतोच. तर थंडी आणि पाऊस ह्या दोन्हीची युती (किंवा आघाडी म्हणा हवं तर!) झाली तर पुण्यात बर्फ पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही! समजा पुण्यात यंदा बर्फ पडलाच तर काय होईल?

तर सगळ्यांत पहिली गोष्ट म्हणजे, ‘भिडे’ पुलावर किती बर्फ साचलाय याच्या बातम्या आणि त्यावर विनोद करणाऱ्या पोस्ट्स व्हायरल होतील! मग, रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या संपेल. सगळे खड्डे बर्फाने भरून जातील. रस्त्यांवरच्या ट्रॅफिकची समस्या संपेल कारण रस्त्यावर दोन-चार फूट बर्फ साचल्याने त्यावर गाड्याच चालवता येणार नाहीत. पुणेकर स्केटिंग करत ऑफिसला जात असतानाचे सेल्फीज काढताना दिसतील. झालंच तर, ‘घरासमोर गाडी पार्क केल्यास गाडी व मालकास बर्फात गाडण्यात येईल’ अशा पाट्या प्रसिद्ध पेठांमध्ये दिसायला लागतील. आणि ‘आमचे येथील चहा दहा सेकंदाच्या आत प्यावा, नंतर त्याची कुल्फी झाल्यास जादाचे पैसे आकारले जातील’ अशा पाट्या ‘अमृततुल्यां’मध्ये दिसायला लागतील!

पर्वतीवर फिरायला जाणारे पेन्शनर्स स्किइंगचे सेट घेऊन जाताना दिसतील. पायऱ्या एका दमात चढून जाऊन स्किइंग करत खाली येतील! ‘सवाई’ला मात्र नेहमीसारखीच गर्दी होईल. फक्त, शालींऐवजी श्रोते डिझायनर घोंगड्या आणि दुलया लपेटून येतील. गायकही बर्फातले राग सादर करायच्या अनोख्या संधीचा फायदा घेतील. सवाईतल्या फूड स्टॉल्सवर बर्फाळी वातावरणात खायचे खास उकळते पदार्थ मिळतील आणि अर्थातच तिथेही झुंबड असेल!

‘मुलायम बंड्या आणि दणकट पायजमे’ विकणाऱ्या पुणेरी दुकानांमध्ये ‘अस्वली स्वेटर्स’ मिळायला लागतील. झालंच तर ‘आंबे, रातांबे आणि पेणच्या गणेशमूर्ती’ विकणाऱ्या ‘सिझनेबल’ दुकानांमध्ये खिडक्यांवरचा बर्फ वितळवणारी यंत्रं मिळायला लागतील.

मग पावसाळ्यात जसं कवितांना उधाण येतं तसं पुणेकरांच्या बर्फाळी कवितांना अचानक उधाण येईल.

शुभ्र शुभ्र ते गार गालिचे,

हिम-स्फटिकांच्या मखमालिचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी गारठली होती!!

असं म्हणणाऱ्या आधुनिक बालकवींपासून ते

ओळखलंत का सर मला,

बर्फात आला कोणी

कपडे होते गारठलेले

गालांवर गोठलं पाणी

म्हणणाऱ्या आधुनिक कुसुमाग्रजांपर्यंत अनेक कवी बर्फाळी कविता पाडायला लागतील.

ह्या सगळ्यांवर कळस म्हणजे ‘आमच्या लहानपणी काय उकडायचं हिवाळ्यात,’ असं आजोबा नातवांना सांगतील, अन् ‘आम्ही तुमच्या इतकेच हिवाळे पाहिलेत’ असं नातू आजोबांना सांगतील! ह्या साऱ्या बरोबरच, ‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही हो’ हे एक-दोन वर्षांचे पुणेकरही अफाट पुणेरी आत्मविश्वासानं बर्फात कुडकुडत सांगायला लागतील!

पुण्यात बर्फ पडला तर असलं खूप काय काय सॉलिड भारी होईल. पडूच दे यंदा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT