Panhalgad Fort
Panhalgad Fort  esakal
सप्तरंग

कल्पक आणि सर्जनशील विचारांचे माहेरघर : किल्ले पन्हाळगड

सकाळ डिजिटल टीम

लेखक : देवदत्त गोखले

पन्हाळा (पन्हाळगड) महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला... हा किल्ला कोकण आणि घाटमाथा यांच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून साधारणतः तीन हजार १०० फुटांवर आहे. या किल्ल्याची करवीर राज्य संस्थापनेच्या काळात राजधानी होती. महाराजांचा पराक्रम, बाजीप्रभू देशपांडे यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्य वाचवण्यासाठी मावळ्यांनी जिवावर उदार होऊन केलेले कष्ट, शिवा काशीद यांचे बलिदान या सर्वांची साक्ष पन्हाळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर देतो.

एखादे काम नावीन्यपूर्ण पद्धतीने करणे म्हणजेच कल्पकता! कल्पकता आणि सर्जनशीलता अनेक संधींना जन्म देते. या संधींचा उपयोग आपल्या कामात करता आला पाहिजे. पन्हाळगड पाहिल्यावर सगळ्यात जास्त मनात जे भरते, ते म्हणजे सोयी-सुविधांनी परिपूर्ण बांधकाम. कल्पकता आणि सर्जनशीलता या किल्ल्यावरील अनेक वास्तूत आढळते. किल्ल्यावरील विहिरी, कुंड, धान्याची कोठारे, यांची रचना पाहताना एका उत्तम अभियांत्रिकी नजरेचा आपल्याला अनुभव येतो. तसेच हा गड आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी इथे अनेक सुधारणा आणि नवीन बांधकामे केली. गडातून बाहेर जाणाऱ्या वाटा, तटबंदी आणि बुरूज पाहताना महाराजांच्या बुद्धिमत्तेचे, हुशारीचे महत्त्व आणि महानता आपल्याला कळते.

कल्पकतेचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पुढील इतिहासप्रसिद्ध घटना. सिद्धी जौहरचा अत्यंत खडा पहारा आणि वेढा पडला असतानाही महाराज आपल्या कल्पक विचारांमुळे त्यावर मात करून, रात्रीच्या काळोखात ‘राजदिंडी’ वाटेमार्गे विशाळगडाकडे निसटले. समांतर तटबंदीतून राजदिंडी ही वाट गडाखाली उतरते. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे पन्हाळ्याचा जोड किल्ला पावनगड. या डोंगराला तट, बुरूज, दरवाजा, जुन्या वास्तू, मंदिरे असा किल्ल्याचा साज चढवला तो शिवाजी महाराजांनी. म्हणूनच सिद्धी जौहरच्या सैन्याची फसगत होऊन सुरवातीला पन्हाळा समजून पावनगडालाच वेढा घातला. नंतर लक्षात आल्यावर त्याच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला.
अनेक शाह्यांची या गडावर सत्ता होती. गरजेप्रमाणे अनेक कल्पक वास्तू इथे उभ्या राहिल्या. सज्जाकोठी ही किल्ल्यावरची महत्त्वपूर्ण दुमजली इमारत आहे. सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना शिवाजी महाराजांची गुप्त खलबते इथेच चालत. या प्रांताचा कारभार पाहताना संभाजी महाराजदेखील या कोठीत वास्तव्यास होते. ही गडावरील महत्त्वाची वास्तू आहे. गडावर असलेला अंबरखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. हे गडावरचे सर्वांत उंच ठिकाण. याच्या सभोवती खंदक आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे येथे आहेत. या कोठारांना हवा व प्रकाश खेळता राहण्यासाठी झरोके, अचूक पद्धतीत समांतर बांधलेल्या कमानी आणि बाहेरच्या बाजूने असलेल्या फसव्या पायऱ्या आहेत. पूर्वी तिथे सरकारी कचेऱ्या, दारूकोठार आणि टाकसाळ होती. ‘तीन दरवाजा’ हे पश्चिमेकडे एकापाठोपाठ असलेले तीन दरवाजे आहेत. यांचे बांधकाम शिसं ओतून केले आहे. जवळ गेल्याशिवाय इथे दरवाजा आहे, हे लक्षातसुद्धा येत नाही. तीन दरवाजांच्या वरच्या बाजूला असलेली वास्तू म्हणजे अंधारबाव. ही तीन मजली विहीर आहे. याचं बांधकाम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात खाली खोल विहीर, त्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आणि वरच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे. या गडावर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असणारी ड्रेनेज यंत्रणा आढळते. गडाच्या पश्चिम टोकावर पुसाटी बुरूज आहे. या बुरजावरून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेवर नजर टाकता येते. गडाचा अर्धा तट नैसर्गिक कड्यांनी सुरक्षित झाला आहे. तसेच काही ठिकाणचा भाग तट बांधून अधिक सुरक्षित केला आहे.

आपल्या कामात कल्पकता आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पन्हाळगडावर कल्पक पद्धतीने बांधलेला अंबरखाना, तीन दरवाजा, अंधार बाव, दुहेरी तटबंदी, दुतोंडी बुरूज आणि अशा अनेक वास्तू आहेत. प्रत्येक बांधकाम करताना त्यामागचा असलेला विचार महत्त्वाचा होता. या सर्व रचनांमधून महाराजांचा उत्तम अभियांत्रिकी विचार प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच, ही सर्व बांधकामे म्हणजे अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहेत. दिसायला साधे पण वेगळ्या पद्धतीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असल्यामुळे शत्रू अनेकदा संभ्रमात पडत आणि अचंबित होत असत. म्हणूनच, किल्ले पन्हाळगड हा केवळ इतिहास अभ्यासकांसाठी नव्हे, तर अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी कल्पकता व सर्जनशीलतेचं माहेरघर आणि अभ्यासण्यासाठीचे उत्तम अभ्यास क्षेत्र आहे.

(लेखक गोखलेज ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती), जळगावचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT