Lata Mangeshkar
Lata Mangeshkar sakal
सप्तरंग

ये जिंदगी उसी की है...!

धनंजय कुलकर्णी

लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी द्वितीय स्मृतिदिन. त्यानिमित्त एका ‘अल्बम’ची चर्चा आवर्जून व्हायलाच हवी! विशेष म्हणजे त्यातील सर्वच गाणी लतादीदींच्या आवडीची होती.

लता मंगेशकर नावातील सात अक्षरांमध्ये ‘सा रे ग म प ध नि’ हे सप्तसूर दडलेले आहेत. तमाम भारतीयांच्या रसिक मनावर गेली ७५ वर्षे अधिराज्य गाजवणारी ही अनभिषिक्त सम्राज्ञी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्यातून निघून गेली. जगातील जेवढी म्हणून गुणवत्तेची, सुंदरतेची आणि कलात्मकतेची विशेषणे आहेत ती लतादीदींच्या स्वराला अन् गीताला लाभलेली आहेत.

तमाम साहित्यिकांनी, विचारवंतांनी, राजकीय तत्त्ववेत्त्यांनी जसा हा स्वर आपल्या काळजात जतन करून ठेवला आहे तितकाच किंबहुना काकणभर सरस इथल्या सामान्य जीवन जगणाऱ्या कामगारांपासून ते थेट महालात राहणाऱ्या आमीरजाद्यांनी या स्वरावर निस्सीम प्रेम केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक गाण्यासोबत रसिकांचा भावजीवन निगडित झाला आहे. त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज चर्चा एका ‘अल्बम’ची!

लता मंगेशकर यांना स्वत:ला कोणती गाणी आवडत असावीत, असा प्रश्न कायमच रसिकांमध्ये चर्चिला जातो. दीदींच्या आवडीच्या गाण्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका वेळोवेळी रसिकांसमोर आल्या. त्यात प्रामुख्याने तीन घटनांचा उल्लेख मला अपरिहार्यपणे करावासा वाटतो. त्यांच्या गायकीला २५ वर्षे पूर्ण झाली त्या वेळी १९६७ मध्ये ‘एचएमव्ही’ने ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रिब्युट टू लता मंगेशकर’ नावाने त्यांनी गायलेल्या त्यांच्या आवडीच्या दहा गीतांची रेकॉर्ड आणली होती.

ओ सजना बरखा बहार आई (परख), कही दीप जले कही दिल (बीस साल बाद), लग जा गले (वह कौन थी), बेकस पे करम कीजिए (मुगल-ए-आजम), अल्ला तेरो नाम (हम दोनो), ऐ री मै तो प्रेम दिवानी (नौबहार), जीवन डोर तुम्ही संग बांधी (सती सावित्री), मावळत्या दिनकरा (मराठी भावगीत), बैरन नींद न आये (चाचा जिंदाबाद) आणि बहारे फिर भी आयेगी (लाहोर) अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांचा समावेश त्यात होता.

त्यानंतर दीदींच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘माय फेव्हरिटस्’ ही ५० गीतांची ध्वनिमुद्रिका १९८८ मध्ये आली. या दोन्ही रेकॉर्डवर त्या काळी माध्यमात भरपूर साधकबाधक चर्चा झाली. हीच गाणी का निवडली... ही गाणी का नाही, अशा प्रकारची! दीदींची ती स्वत:ची आवड होती. त्यांना कोणतीही गाणी निवडण्याचा हक्क आहे, हेच रसिक विसरले. अर्थात यातदेखील दीदींचा आपल्या गाण्यांवरील प्रेमाचा हक्क हेच कारण होते.

त्यांच्या एका रेकॉर्डवर मात्र रसिक निहायत खूष झाले. इतर गायक-गायिकांची त्यांना आवडणारी गाणी स्वत:च्या स्वरात गायची! असा प्रकार संगीत क्षेत्रात यापूर्वी कधी झाला नव्हता. आपल्या आवडत्या कलाकाराला आदरांजली देण्याचा तो अभिनव प्रयोग होता. याच रेकॉर्डबाबत आपण आज चर्चा करणार आहोत.

साधारण नव्वदच्या दशकात लतादीदींनी त्यांना आवडणाऱ्या इतर गायक-गायिकांची गाणी स्वत:च्या स्वरात ध्वनिमुद्रित करून ‘श्रद्धांजली’ या नावाने रसिकांना बहाल केली. रसिकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले. ही गाणी दीदींनी ध्वनिमुद्रित केली तेव्हा त्यांचे वय ६५ होते, पण या वयातही त्यांचा आवाज इतका सुंदर लागला होता, की रसिक पुन्हा पुन्हा त्यांनी गायलेली आणि ओरिजनल गाणी ऐकू लागले.

भारतीय चित्रपट संगीतकाळाच्या त्या केवळ साक्षीदारच नव्हत्या, तर या कालखंडाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी होत्या. त्या काळातील ओ. पी. नय्यर यांचा सन्माननीय अपवाद वगळला तर दीदी सर्व संगीतकारांकडे सर्व गायक-गायिकांसोबत गायल्या होत्या. ही सीडी करताना दीदींनी कलाकारांची सोलो गाणी निवडली. या सीडीचे ध्वनिमुद्रण ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांनी केले होते.

यातील सर्व गाणी त्या वेळी दिवंगत कलाकारांची असल्याने ‘श्रद्धांजली’ हे समर्पक नाव दिले गेले. भारतीय चित्रपट संगीतातील गाजलेला पहिला पुरुष स्वर म्हणजे कुंदनलाल सैगल यांचा. लतादीदींना त्यांची गाणी प्रचंड आवडायची. त्यात सैगल यांची सात गाणी आहेत.

बालम आयो बसो मोरे मन में (देवदास), दो नैना मतवारे हम पार जुलूम करे (माय सिस्टर), अब मै काह करू (धरती माता), सप्त सूरन तीन ग्राम (तानसेन), मै क्या जानू क्या जादू है, सो जा राजकुमारी सो जा (जिंदगी) आणि नैन हीन को राह दिखा (भक्त सूरदास) अशा गाण्यांचा त्यात समावेश होता. ही सीडी मार्केटमध्ये आल्यानंतर दीदींनी काही जाहीर कार्यक्रमांतून त्यातील गाणी गायला सुरुवात केली होती. त्यात सैगल यांच्या गीतांना मोठा प्रतिसाद मिळत असे. रसिकांची पसंती मात्र ‘ये जिंदगी उसी की है...’ या गीतालाच!

रसिकांना लतादीदींची कोणती गाणी आवडतात याचा सर्व्हेदेखील अनेक माध्यमांतून सातत्याने घेतला जातो. अलीकडे सोशल आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आल्यावर तर त्याचे प्रमाण वाढते आहे. पण दीदींच्या पन्नाशी, साठी आणि पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या वेळी मुद्रित माध्यमातून त्यांच्या आवडीच्या गीतांबाबत वाचकांकडून कौल मागविला गेला आणि आश्चर्य म्हणजे तीनही वेळा एकाच गीताला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

या गीताने पहिला क्रमांक पटकाविला. हे गीत होते राजेंद्र कृष्ण यांच्या लेखणीतून उतरलेले आणि सी. रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेले ‘ये जिंदगी उसी की है... जो किसी का हो गया प्यार ही में खो गया...’ सैगल यांचे समकालीन पंकज मलिक यांची दोन गाणी त्यात होती. एक होते, ‘पिया मिलन को जाना’ हे ‘कपाल कुंडली’ या चित्रपटातील आणि दुसरे ‘ये राते ये मौसम ये हंसना हंसाना इन्हे भूल जाना’ हे खासगी गीत होते. ‘ये राते ये मौसम’ हे गीत लतादीदींच्या स्वरात ऐकणे हा स्वर्गीय सुखाचा सुरीला आनंद आहे. मुकेश यांच्यावर दीदींचा भारी जीव. त्यांना दीदी आपला भाऊच मानायची.

अमेरिकेत डेट्राईटला मुकेश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. दीदींच्या नजरेसमोर हे घडल्याने त्यांच्या मनाचा हळवा कोपरा या घटनेने व्यापला आहे. या सीडीत मुकेश यांची पाच गाणी दीदींनी गायली आहेत.

भूली हुई यादों मुझे इतना न सताओ अब चैन से (संजोग), चल री सजनी अब क्या सोचे (बंबई का बाबू), जांऊ कहां बता ऐ दिल (छोटी बहन), आंसू भरी है ये जीवन की राहे (परवरीश), कही दूर जब दिन ढल जाये (आनंद) अशा पाचही गीतांतून मुकेश यांची खास ओळख असणाऱ्या ‘दर्दभऱ्या’ शैलीला दीदींनी आपल्या स्वरातून व्यक्त केले होते.

दीदींच्या मनाला भावलेला मुकेश यांच्या गीतातील हा ‘जॉनर’ रसिकांनाही आवडून गेला. सहगायकांत दीदींनी मोहम्मद रफींसोबत ४४० गाणी गायलीत. या ‘सीडी’त रफी यांच्या ज्या गीतांना दीदींनी स्थान दिले त्यात सुहानी रात ढल चुकी (दुलारी), दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने) आणि मन रे कांहे न धीर धरे (चित्रलेखा) अशा तीन भिन्न प्रकृतींच्या गाण्यांचा समावेश आहे.

लता-रफी यांची सर्वाधिक गाणी असली तरी साठच्या दशकात हे दोघे अनेक वर्षे एकत्र गात नव्हते हेदेखील आवर्जून सांगायला हवे. मुकेश यांच्याप्रमाणेच किशोर कुमारसोबत दीदींचे बहीण-भावाचे नाते होते. ‘हरफनमौला’ किशोर यांच्या कितीतरी आठवणी दीदींनी कार्यक्रम आणि मुलाखतींतून सांगितल्या आहेत. या ‘सीडी’मध्ये दीदींनी किशोर यांची पाच गाणी स्वत:च्या स्वरात गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन (दूर गगन की छांव में), कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा (झुमरू), ओ मेरे दिल के चैन (मेरे जीवनसाथी), ये जीवन है इस जीवन का (पिया का घर), वो शाम कुछ अजीब थी (खामोशी)... किशोर यांच्या भावस्पर्शी स्वरातील ही गाणी दीदींनी निवडून आणि गाऊन या अवलिया कलंदर कलाकाराला आदरांजली वाहिली आहे.

ज्यांच्या स्वराचे वर्णन ‘व्हाईस विथ गोल्डन टच’ असे केले जाते त्या हेमंत कुमार यांची चार गाणी लतादीदींनी इथे गायली आहेत. तुम पुकारलो (खामोशी), रुलाकर चल दिये एक दिन (बादशहा), तेरी दुनिया में जीने से (घर नं. ४४) आणि ये नयन डरे डरे (कोहरा) अशी ही गाणी.

याच सीडीमध्ये दीदींनी काही गायिकांचीही गाणी गायली आहेत. या सर्व गायिका त्यांना सिनियर होत्या. गीता दत्त यांच्या स्वरातील वक्त ने किया क्या हंसी सितम (कागज के फूल), कैसे कोई जिये (बादबान), कोई दूर से आवाज दे चले आओ (साहिब, बिवी और गुलाम) ही तीनही गाणी अभिजात अशीच आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या कानन देवी यांची दोन गाणी दीदींनी यात गायली आहेत. ती म्हणजे, ‘ऐ चांद छूप न जाना’ आणि ‘तुफान मेल दुनिया ये दुनिया तुफान मेल’ (जवाब)... चाळीसच्या दशकात या गीतांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.

जोहराबाई अंबालीवाला यांच्या ‘अखियां मिला के जिया भरमा के चले नहीं जाना’ (रतन) आणि अमीरबाई कर्नाटकी यांच्या स्वरातील ‘धीरे धीरे आरे बादल धीरे धीरे आ’ (किस्मत) अशा दोन गीतांना या सीडीत स्थान होते.

आज लता मंगेशकर आपल्यात नाहीत; पण त्यांच्या आवडीच्या गीतांचा हा निराळा पैलू वाचकांसमोर यावा म्हणून हा लेखन प्रपंच!

(लेखक चित्रपट अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)

dskul21@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT