dr anil lachke
dr anil lachke  
सप्तरंग

'प्रकाशचंद्रा'चा आशेचा किरण (डॉ. अनिल लचके)

डॉ. अनिल लचके anil.lachke@gmail.com

"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे "प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम "चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत त्यानं प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. विजेची मोठी बचत होईल, असा दावा करून चीननं हा अतिशय वेगळा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नक्की कसा असेल हा प्रकल्प, "प्रकाशचंद्रा'मुळं खरंच विजेची बचत होईल का, निसर्गाच्या चक्रावर कशा प्रकारे परिणाम होईल, आधी असा कुठला प्रयोग झाला होता का, त्यामुळं काय झालं होतं आदी गोष्टींबाबत विवेचन.

पहिला मानवनिर्मित "चंद्र' अंतराळात साठ वर्षांपूर्वी झेपावलेला होता. त्याचं नाव स्फुटनिक-1. त्यानंतर आत्तापर्यंत 4871 कृत्रिम चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. कारण हे उपग्रह "पडेल ते कार्य' ("वर' हवा नसल्यामुळे) आवाज न करता, शांतपणे करत असतात. या कृत्रिम चंद्रांना "कला' नसतात, तरीही नेमून दिलेलं कार्य कलात्मकतेनं करणं त्यांना जमतं. या कृत्रिम चंद्रांमुळे नकाशा करणं, हवामानाचा अंदाज, जंगल-कृषी-व्यवसायाची सद्यस्थिती, प्रदूषणाचं प्रमाण, दळणवळण, जीपीएस सेवा, टीव्हीचं प्रक्षेपण, इंटरनेट, संदेशवहन, सुदूर संवेदन, लष्करी सेवा..., खरं तर ही "सेवा-यादी' वाढतच चालली आहे. त्यात आता एका नवीन सेवेची भर पडलेली आहे, ती म्हणजे ः "प्रकाश सेवा!' या वसुंधरेवर जिथं प्रकाश कमी आहे, तिथं प्रकाश प्रक्षेपित करण्याचं कार्य या "चंद्रां'ना करावं लागेल. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी कधी कधी "रात्रीचा दिवस' करावा लागतो. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आता खरंच "रात्रीचा दिवस' केला जाणार आहे.

"चंद्राला दिवसा प्रकाश नसणं' हे शल्य मोरोपंत यांच्यासारख्या कवीच्या मनात सतत सलत असतं. मात्र, दिवसा तर सोडाच; पण रात्रीही चंद्राला प्रकाश नसतो! कारण चंद्र काही स्वयंप्रकाशी नाही. तरीदेखील चंद्र आपल्याला दिसतो. कारण चंद्रावर सूर्याचं ऊन पडतं आणि ते परावर्तित होऊन आपल्यापर्यंत येऊन पोचतं. रात्री ते सुखद वाटतं आणि ते तसं असतंही. पौर्णिमेला त्याची प्रचिती आपल्याला येते. कुणी शायरानं अगदी योग्यच म्हटलंय ः "धूप चाहे कितनी भी मेहेबान हो जाये, ... त्याला चंद्रप्रकाशाची सर येणार नाही!'

आकाशीचा प्रकाश...
चंद्रप्रकाश आपल्याला मोफत मिळतो. तथापि काही दूरवरची गावं, शहरं, महामार्ग अशा भागांत चंद्रप्रकाश कमी पडतो. ध्रुवीय प्रदेशात तर काही महिने सूर्यदर्शन होत नाही. काळोखाची रजनी असू शकते; पण भर दिवसासुद्धा रजनी असल्याची अनुभूती तिथल्या राहिवाशांच्या मनाचं मळभ अधिकच गडद करत असते. हर्मन ओबेथ नावाचा एक जर्मनीचा भौतिकीशास्त्रज्ञ होता. अवकाशात आरसा ठेवून सूर्यप्रकाश जमिनीवर पाडता येईल, अशी कल्पना त्यानं शंभर वर्षांपूर्वी मांडली होती. त्या सुमारास एका चित्रकारानं एक पेंटिंग काढलं होतं. त्यात एक आरशांनी घडवलेला चमकदार नेकलेस चितारला होता. त्यातल्या आरशांची चमक एवढी होती, की त्यामुळे पॅरिसचे रस्ते प्रकाशमान झाले होते! अशा उतुंग अफलातून कल्पनांमुळे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सतर्क होतात. कलाकारांमार्फत अभिनव कल्पनांचा "स्पार्क' उडतो, तो हा असा!
चीनच्या तंत्रज्ञांना मंद प्रकाशाच्या समस्येवर अशीच एखादी कल्पना मूर्त स्वरूपात आणावी असं वाटलं. त्यांच्या विशाल देशामध्ये अनेक ठिकाणी प्रकाश पोचलेला नाही. बरेच रस्ते बहुतांशी अंधारात असतात. दिवा-बत्तीची सोय करायची असेल, तर त्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. यासाठी "तायान फु न्यू एरिया सायन्स सोसायटी' या संस्थेनं रात्री चंद्राचा प्रकाश मिळावा म्हणून प्रयत्न केले. ("तायान फु' या शब्दाचा अर्थ आहे "स्वर्गीय प्रदेश, किंवा लॅंड ऑफ प्लेन्टी.) त्यांनी "प्रकाशचंद्र' म्हणजे "इल्युमिनेशन सॅटेलाईट" आकाशात सोडायची योजना आखली आहे. असा कृत्रिम चंद्र 2020पर्यंत "तळपावा' अशी त्यांची अपेक्षा आहे. चेंगदू शहरावरती त्यानं फिरत राहून प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. "रजनीनाथ हा नभी उगवला, राजपथी जणू दीपची गमला,' असं एक नाट्यगीत आहे. चीनचा "प्रकाश-चंद्र' ("खऱ्या') रजनीनाथासह फक्त राजपथीच काय; पण रयतपथीदेखील प्रकाशाची उधळण करेल! त्यामुळे अगदी "शुभ्र किरण घनतिमिरी पडली' नाहीत, तरी थोडासा प्रकाश मिळेल आणि व्यवहार चालू राहातील. कृत्रिम (प्रकाश)चंद्र अस्सल चंद्रापेक्षा आठपट जास्त "प्रखर'; पण शीत असेल. कवी राजेंद्रकृष्ण यांनी एका गीतात म्हटलंय ः "इक रात मे दो-दो चॉंद खिले.' अशी कल्पना आता सत्यात पण उतरू शकते!

दिवाबत्तीचा खर्च वाचणार
या प्रयोगानंतर दोन वर्षांनी अजून तीन "प्रकाश-चंद्र' अवकाशात सोडले जातील. यामुळे शहरातील "दिवाबत्ती'चा खर्च वाचेल. वू चुनफेंग हे "प्रकाश-चंद्र' प्रकल्पाचे मुख्य आहेत. ते "स्पेस ठेकेदार' म्हणूनही ओळखले जातात. "इनोव्हेशन कॉन्फरन्स'च्या निमित्तानं त्यांनी ही अफलातून कल्पना जगजाहीर केली आहे. विस्तारवादी चीन आता अंतरिक्षात विस्तार करत आहे. यामुळे "रिक्षा'त बसणारे जगातले सर्वसामान्य नागरिक मात्र अचंबित झाले आहेत. सिचांग सॅटेलाईट लॉंच सेंटरवरून "प्रकाशचंद्र' पाचशे किलोमीटरवरील कक्षेत सोडला जाईल. त्याचा आरसा उलगडला जाईल. तो सूर्याचा प्रकाश ग्रहण करून त्याचं परावर्तन चेंगदू शहरावर फेऱ्या मारत प्रकाशाची उधळण करेल. अशा रीतीनं सुमारे छत्तीसशे ते चौसष्टशे चौरस किलोमीटर क्षेत्र "उजळून' निघेल शकेल. तीन उपग्रह हे कार्य करतील. परिणामी चेंगदू शहराचा दिवाबत्तीचा वार्षिक बाराशे कोटी रुपयांचा खर्च वाचेल.

प्रकल्पाला विरोधही
कोणतीही योजना आखली, की लागलीच विरोधक एकत्र येतात. तसे तिथंही आले. अशा चंद्रावर आपलं नियंत्रण राहणार नाही, त्याचप्रमाणं प्राणिमात्रांची निद्राधीन व्हायची "लय' बिघडेल, अशी शंका लोकांना आली. त्याचप्रमाणं पर्यावरण-प्रेमींना "प्रकाशाचं प्रदूषण' नसावं, असं वाटत होतं. "डे-नाईट' वन डे क्रिकेट सामन्यातला प्रखर लाइट डोळ्यांवर आल्यावर खेळाडूंच्या हातून सोपे झेल सुटतात. त्याचप्रमाणं रात्री अंतराळातले ग्रह, तारे, नक्षत्रं न्याहाळताना खूप अडचणी येतील, असं खगोलसंशोधकांना वाटतं. गुणीजन म्हणतात "तमसो मा ज्योतिर्गमय.' ज्ञानप्राप्ती करायची असेल, तर अंधारापासून उजेडाकडे जायला पाहिजे, हे निश्‍चित; पण यालाही विरोध होत असतो, तो हा असा!

या अडचणी चुंगफेंग यांनी लक्षात घेतल्या. तेव्हा कृत्रिम चंद्राच्या प्रयोगांची चाचणी जिथं फारशी लोकवस्ती नाही, तिथल्या वाळवंटात घ्यायची, असं त्यांनी ठरवलंय. कृत्रिम चंद्र जेव्हा आकाशात स्थापन केला जाईल, तेव्हा तो नेहमीच्या गोल चंद्रासारखा न दिसता एखाद्या चांदणीसारखा दिसेल, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अस्सल चंद्रावर आपला अंमल चालत नाही. कृत्रिम चंद्रावर "रिमोट कंट्रोल'चा अंमल चालेल. ज्या भागातली वीज जाईल, किंवा जिथं आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवेल, तिथं आरशाचा तंतोतंत कोन साधून प्रकाश-प्रक्षेपण केलं जाईल. प्रकाशाचं प्रमाणदेखील नियंत्रणात ठेवता येईल. प्रकाश-चंद्राचा प्रकाश हा प्रखर नसून, तो प्रत्यक्षात संधीप्रकाश असेल, असं जाणकार म्हणतात.

ढग आल्यावर काय?
एखाद्या शहरी असा एकसारखा प्रकाश सतत पाडायचा असेल, तर "प्रकाशचंद्र' त्या शहरावर "स्थिर' राहायला पाहिजे. यासाठी उपग्रह "जिओ- सिंक्रस', "जिओ - स्टेशनरी' (भूस्थिर, भूसंलग्न) असायला पाहिजे. याचा अर्थ उपग्रह पृथ्वीपासून "वर' 36 हजार किलोमीटर अंतरावर असणं गरजेचं आहे; पण चीनच्या तंत्रज्ञांनी उपग्रह केवळ पाचशे किलोमीटर उंचीवरून भ्रमण करतील, असं म्हटलंय. या तांत्रिक बाबीचा उलगडा होत नाही. शिवाय ढग आल्यावर काय करणार, ही पण समस्याच आहे.

आधीही असे प्रयत्न
रशियानं असा प्रयत्न वीस वर्षांपूर्वी केला होता. ध्रुवीय प्रदेशांवरती जेव्हा अंधाराचं राज्य असतं, तेव्हा तिथं कृत्रिम चंद्रामार्फत प्रकाश पुरवायचा, असा हेतू होता. सैबेरिया, व्हॅक्‍युअर, विनिपेग, कालगरी अशा अनेक ठिकाणी दृश्‍यता वाढवण्याचा त्यांचाच हेतू होता. अनेक रशियन कंपन्यांनी एकत्र येऊन "स्पेस रिगाटा कन्सोर्टियम' स्थापन केली. उत्तर गोलार्धातील आकाशात एक मोठा आरसा तरंगवत ठेवायचा आणि सूर्याचा प्रकाश जिथं गरज आहे, तिथं पुरवायचा त्यांचा प्रयत्न होता. प्रयोगाला "नामया-2.5' आणि "बॅनर' अशी नावं होती. त्यांचा छत्रीसारखा उघडणारा चकचकीत ऍल्युमिनियमचा आरसा मीटर व्यासाचा होता. मात्र, तो पुरेसा गोलाकृती नव्हता. त्यावेळी एका अपघातामुळं एक सॅटेलाईटचं नुकसान झालं. छत्रीबद्ध आरसा जळाला. प्रकल्पाला वेध लागण्याआधीच "ग्रहण' लागलं. योजना बारगळली. नंतर "फंडिंग' मिळण्याची पंचाईत झाली. रशियाच्या दृष्टीनं तो प्रयोग म्हणजे एक "दिवास्वप्न' ठरले! त्यांचा "प्रकाशचंद्र' उगवण्याआधीच मावळला.

त्याही आधी 4 फेब्रुवारी 1993 रोजी रशियाच्या "कॉस्मोनॉट'नं एक आरसा वापरून त्याचा प्रकाश कसा पडतो, याचं निरीक्षण केलं होतं. नंतर तो आरसा पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर भस्मसात झाला. नॉर्वे देशाला सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही. त्यांनीही रुकन नावाच्या शहराला संध्याकाळी जास्त वेळ प्रकाश मिळावा म्हणून आरशांचा प्रयोग केला होता. तो फारसा यशस्वी झाला नाही. आता जग एकविसाव्या शतकात स्थिरावत चाललंय. तंत्रज्ञान सुधारलेलं आहे. संशोधकांच्या मदतीला उच्च दर्जाचे संगणक आहेत. संधीप्रकाश मिळवण्याची ही संधी तंत्रज्ञांना आव्हानात्मक आहे. मग शुभ्रकिरण घनतिमिरी पडतील की नाही? निदान आशेचा किरण तर पडलाय! कदाचित चीनचा अनुभव आपल्याला "दीपस्तंभ' ठरू शकतो. प्रकाशचंद्रांनी जर उत्तम कामगिरी करून दाखवली, तर त्यांना अंतराळातली बाजारपेठदेखील काबीज करता येईल!

काय होणार उपयोग?
- जिथल्या रस्त्यांवर प्रत्यक्ष वीज पोचवणं शक्‍य नाही, तिथं उपयोग होईल.
- नैसर्गिक किंवा इतर प्रकारच्या आपत्तींच्या वेळी अंधारामुळं अनेकदा मदतीचे प्रयत्न खंडित होतात. "प्रकाशचंद्रा'मुळे ते तसे होणार नाहीत.
- रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी केले जाणारे खर्च कमी होतील. चेंगडूमध्ये तब्बल एक अब्ज वीस कोटी युआन (सतरा कोटी डॉलर) इतक्‍या रकमेची वीज वाचेल, असा अंदाज.

आक्षेप काय?
- "प्रकाशचंद्र' ही कल्पना म्हणजे एक प्रकारे "प्रकाश-प्रदूषण'च आहे. या प्रकाश-प्रदूषणाचा विविध सजीवांना फटका बसेल.
- दिवस-रात्रीची "लय' बिघडेल. दिवस-रात्रीची ही लय पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांच्या डीएनएमध्ये घुसली आहे. तिच्यावर परिणाम होईल. ही लय मानवानं आधीच बिघडवली आहे. त्याला तिचा फटका बसलाच आहे.
- अनेक प्राणी-पक्ष्यांसाठी अंधारही तितकाच महत्त्वाचा आहे. शिकारी अंधाराचाच फायदा घेऊन त्यांचं भक्ष्य शोधतात.
- निशाचर पक्ष्यांच्या चलनवलनावर परिणाम होईल. ते चुकीच्या पद्धतीनं स्थलांतर करतील आणि त्यांची संख्या कमी होईल.
- मानवी शरीर अंधार-उजेडाच्या लयीवर आपलं जैवचक्र तयार करतं. त्यात बिघाड झाला, तर मानवाचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. झोपेवर परिणाम होईल. ताण, नैराश्‍य, अस्वस्थता, निद्रानाश आदी विकार बळावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT