hospital patients
hospital patients sakal
सप्तरंग

रुग्णस्नेही ‘केवट’

अवतरण टीम

- डॉ. अविनाश सुपे

रुग्णालये ही सर्व सोयी-सुविधांसह सज्ज असावीत, अशी अपेक्षा असतेच. याशिवाय आधुनिक रुग्णालये ही रुग्णस्नेही बनली पाहिजेत. रुग्णांना रुग्णालयांची भीती वाटता कामा नये. मदत मिळेल आणि मी बरा होईन असा मानसिक आधार रुग्णांसाठी फार मोलाचा असतो. त्या विश्वासावर तो आपल्या कठीण आजाराची नैय्या ‘केवटा’च्या मदतीने पार करू शकेल.

खरेतर टाटा, केईएम, सायनसारख्या मोठ्या रुग्णालयात कोणी नवखा रुग्ण आला, तर तेथील प्रचंड गर्दी, अनेक इमारती, मोठ्या रांगा बघून मनाने कोलमडून जातो. रांगेत उभा राहून केसपेपर काढून तो कसाबसा डॉक्टरपर्यंत पोचतो. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेले कसेबसे समजून घेत तो जर शस्त्रक्रिया करायची असेल तर एक्स-रे, रक्त तपासण्या करतो. प्रत्येक तपासणी वेगळ्या ठिकाणी, कधी कधी एक किलोमीटर अंतरावरही असते.

त्यांचे रिपोर्ट्स गोळा करणे हेदेखील तेवढेच कठीण असते. औषधे मिळविणे यासाठी त्याला खूप फिरावे लागते. याचबरोबर कधीकधी रक्तासाठी मदत लागते. काही औषधे व उपकरणे महागडी असतात. त्यासाठी आर्थिक मदत गोळा करावी लागते. यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते/अधिकारी असतात; पण ते अनेक ट्रस्ट/संस्थांकडे पाठवतात. हा सर्व व्याप मोठा असतो. बाहेर गावाहून आलेले अशिक्षितच नाही, तर सुशिक्षित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अगदी बावचळून जातात.

परदेशात विविध रंगांचे पट्टे आखलेले असतात व त्या पट्ट्यानुसार लाल म्हणजे अतिदक्षता विभाग, पिवळा म्हणजे प्रयोगशाळा अशा रीतीने रुग्ण इच्छितस्थळी पोचतो. मुंबईत काही खासगी रुग्णालयांनी हा प्रयोग केला आहे; पण केईएम, नायर, सायन या रुग्णालयांमध्ये इतकी गर्दी असते, की पट्टे काही दिवसांतच मिटून जातात. दिसत नाहीत. मी हा प्रयोग केला होता; पण रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सततच्या चालण्यामुळे ते पट्टे पुसले गेले.

सायनमध्ये ‘संडे फ्रेंड्स’ म्हणून रुग्णांना मदत करणारा समूह आहे, त्यातील काही लोक मला सायनचा अधिष्ठाता असताना येऊन भेटले. ते म्हणाले, आम्हाला रुग्णांना मदत करायची आहे, तर तुम्ही आम्हाला छोटी जागा द्या. एक टेबल, खुर्ची ठेवायची जागा त्यांना दिली. त्यांनी सायन रुग्णालयाचा पूर्ण नकाशा काढला. सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना नंबर दिले. ती माणसे तिथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत थांबत आणि रुग्णांना निःस्वार्थपणे मोलाची मदत करत. अशी निःस्वार्थ सेवा कोणीही काही ठराविक काळच करू शकतो. उपजीविकेसाठी काहीतरी साधन त्यांना शोधावेच लागते.

केईएमला आल्यावर मी त्या धर्तीवर फलक लावले. आमच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प हाती घेऊन देणग्या गोळा करून सर्वत्र रीतसर मार्गदर्शक फलक लावले; पण त्यांची म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही. पावसाळ्यात हे फलक खराब होतात. दुरुस्त्या निघाल्या की विभागांची जागा बदलावी लागते. त्यामुळे यावर काही हुकमी तोडगा शोधणे गरजेचे होते. माझे जवळचे वर्गमित्र आणि टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्यांनी ठरवले, रुग्ण मार्गदर्शक असे प्रशिक्षण देऊन माणसे तयार करायची. त्याला त्यांनी नाव दिले ‘केवट प्रोग्राम.’ (रामायणामध्ये जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले तेव्हा नदी पार करायला तिथे एक नाविक-केवट होता. त्याने त्यांना नदीपार करून दिली.) हा सहा महिने ते वर्षे असा कोर्स आहे.

होमी भाभा विद्यापीठाकडून त्यांना डिप्लोमा-पदविका मिळते. असे ३०-३५ मार्गदर्शक तयार करत त्यांनी टाटा रुग्णालयाच्या भारतभर असलेल्या सर्व शाखांना पुरविले. काही खासगी रुग्णालयातूनही त्यांना मागणी आली. माझ्या मते ही गरज सतत राहील. टाटासारख्या रुग्णालयात जेव्हा रुग्ण येतो तेव्हा कर्करोगाच्या शंकेने तो धास्तावलेला असतो. मानसिक दडपणाखाली असतो. टाटाच्या गर्दीने तो हरवून जातो. पैशाची व्यवस्थाही करायची असते. अशा वेळी ‘केवट’सारखा मार्गदर्शक सखा त्याला देवदूतासारखा वाटू शकतो. त्याला केवळ ठिकाणांचे मार्गदर्शन करून तो थांबत नाही, तर भ्रमणध्वनीच्या साह्याने तो त्याला सतत सल्ला देतो, त्याच्या अडचणी समजून घेत मार्ग दाखवतो आणि त्याची उपचाराची नैया पार करून देतो.

एका टेबलवर बसून फक्त उजवीकडे जा, डावीकडे जा सांगण्यापेक्षा असे मार्गदर्शन रुग्णाला मानसिक बळ देते. त्यामुळे डॉ. राजन बडवे यांनी त्यांची सुंदर कल्पना अस्तित्वातही आणली आणि यशस्वीरीत्या राबवली. रुग्णाला मदतीचा हात देऊन दीर्घकालीन उपचार संपेपर्यंतचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरले. आता ही सुविधा सर्व रुग्णालयात पूर्णपणे फुकट देणे कदाचित शक्य होणार नाही; पण माफक दरात ही सुविधा देता येईल. यामुळे गरीब आणि अशिक्षित रुग्णाला आणि नातेवाईकांना रुग्णालयाची जी भीती असते, रुग्णालयात यायची टाळाटाळ करतात, महत्त्वाचा काळ फुकट घालवितात ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल. मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे त्यांना सुकर होईल.

आधुनिक रुग्णालये ही रुग्णस्नेही बनली पाहिजेत. रुग्णांना या मोठ्या रुग्णालयांची भीती वाटता कामा नये. आपल्याकडे रुग्णालयात खूप गर्दी असते. या रुग्णालयात मदत मिळेल आणि मी बरा होईन, असा मानसिक आधार फार मोलाचा असतो. त्या विश्वासावर तो आपल्या कठीण आजाराची नैया केवटाच्या मदतीने पार करू शकेल. ‘केवट’ या चाकोरीबाहेरील कल्पनेबद्दल डॉक्टर बडवेंचे खूप कौतुक व अभिनंदन.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT