Girl
Girl Sakal
सप्तरंग

गौराई माझी अनमोल

अवतरण टीम

आजार स्त्री-पुरुष असा भेदाभेद करून होत नसतो. मात्र त्या आजारासाठी शस्त्रक्रिया करताना रुग्ण मुलगी असेल, तर ओरखड्याची चिंता केली जाते.

- डॉ. अविनाश सुपे

आजार स्त्री-पुरुष असा भेदाभेद करून होत नसतो. मात्र त्या आजारासाठी शस्त्रक्रिया करताना रुग्ण मुलगी असेल, तर ओरखड्याची चिंता केली जाते. मुलीचे लग्न करताना अडचण येण्याची आई-वडिलांच्या मनात भीती असते. समाजमनातली ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

साधारणपणे २००० च्या आसपास आमच्या बाह्यरुग्ण विभागात एक समाजसेविका पालघरच्या पुढे असलेल्या आदिवासी वस्तीतून १४ वर्षांची मुलगी आणि तिची आई यांना घेऊन आमच्याकडे आली. म्हणाली, ‘‘सर हिच्या पोटात खूप दुखते आहे आणि तिला वारंवार मधून मधून ताप येतो. जरा हिला बघाल का?’’ तिच्या पोटात थोडी सूज होती. आम्ही विचारले की, ‘‘काही तपासण्या कराव्या लागतील. तुम्ही या मुलीला रुग्णालयात दाखल कराल का?’’ त्यांनी तसे केले. तपासण्या झाल्या. त्यातून कळले की, मुलीच्या पोटामधील पित्तनलिका जन्मतः थोडीशी सुजली किंवा फुगली होती, ज्याला आपण कॉलोडोकेल सिस्ट म्हणतो. थोडा जंतुसंसर्ग झाला होता. आता अशा प्रकारची जी कॉलोडोकेल सिस्ट असतात, त्याच्यामध्ये रोगाची गुंतागुंत होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही नेहमी त्याची शस्त्रक्रिया करतो आणि जे कॉलोडोकेल सिस्ट असते, ते आपण काढून टाकतो. त्याचा पित्तनलिकेचा जो भाग असतो, तो आपण आतड्याला जोडून त्याप्रमाणे पुन्हा एकदा तो रस्ता मोकळा करून देतो. त्यामुळे पुढे पेशंटला काही त्रास होत नाही. हे सर्व त्यांना समजावून सांगितलं. तिला औषधं दिली. तिची आई समजूतदार आणि हुशार होती.

एक दिवस आमचा जो नेहमीचा राऊंड होता, तो संपल्यानंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘‘डॉक्टर तुम्ही म्हणताय तिचं ऑपरेशन करायचं तर मग कसं ऑपरेशन करणार तुम्ही?’ मी अत्यंत शांतपणे कागद काढून तिला सांगितले की, अशा प्रकारचा आम्ही एक चीर मुलीच्या पोटावर देणार आणि त्याप्रमाणे आम्ही जो भाग ग्रस्त आहे, तो काढून टाकणार. मला माहीत नाही त्या बाईला किती समजलं; परंतु ती बाई म्हणाली, ‘‘म्हणजे पोटावर तिला जखम दिसणार का? तिथे व्रण येणार का?’’ मी म्हणालो, ‘‘हो, व्रण येणार.’’ त्या बाईने माझ्या मते विचार केला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या राऊंडच्या वेळी ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, आम्हाला ऑपरेशन करायचं नाहीये.’’ मी विचारलं, ‘‘का बाई, का ऑपरेशन करायचं नाही?’’ ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे; पण समजा ऑपरेशन केले आणि त्याच्यावर व्रण राहिला, तर मग तिच्याशी लग्न कोण करणार? ही लग्न न झालेली मुलगी कितपत तिला बघत राहू? ती माझ्यावर एक प्रकारचे लोढणं होणार, एक जबाबदारी आहे, त्याच्यापेक्षा तिचं जे काय व्हायचं ते होऊ दे.’’ आम्हाला जरा धक्काच बसला. अशा प्रकारे एक आई विचार करू शकते आणि हा एक वेगळाच दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर होता. आम्ही तिला समजवायचा प्रयत्न केला; पण तिने काही ऐकले नाही. ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला औषधे द्या. मी पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी परत काही झालं तर येऊ.’ आम्ही ‘ठीक आहे म्हंटलं.’

पुढे सोळा वर्षांची होईपर्यंत ती अधूनमधून आमच्याकडे येत असे आणि आम्ही औषध देऊन तिच्याकडे लक्ष देत होतो. त्यानंतर आम्ही लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करायला शिकलो आणि छिद्र करून दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करू लागलो. मी तिला पुन्हा एकदा सांगितलं की, आता आम्ही दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करतोय, कमीत कमी छिद्र करून ते ऑपरेशन करू शकतो. बऱ्याच प्रयत्नानंतर ती तयार झाली आणि आम्ही ती शस्त्रक्रिया केली. नशिबाने ती शस्त्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली. ती आनंदाने घरी गेली. त्यानंतर साधारण एक ते दीड वर्षानंतर ती हातामध्ये बाळ घेऊन आली. घरातली आणि तिच्या आजूबाजूच्या शेतात असलेली कंदमुळांची एक पिशवी घेऊन आली होती. ती खूप आनंदात होती. १६-१८ वर्षांची झाली होती. आदिवासींची लग्नही त्याच वयात होत असत. तिचा नवराही सोबत आला होता. ती म्हणाली, ‘‘तुम्ही दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केली म्हणून माझं लग्न झालं.’’

या गोष्टीतून आम्हाला समाधान तर नक्कीच झालं की, आपण अशा प्रकारे आपरेशन केल्यामुळे तिचे लग्न झाले आणि ती त्यात समाधानी आहे; परंतु दोन गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. एक म्हणजे एखाद्या मुलीला असा आजार होतो आणि तिच्या शरीरावर व्रण येतो तेव्हा तिची आईसुद्धा तिला एक लोढणे मानते आणि तिला जन्मभर वाढवायचं नसते.

मला वाटते एखाद्या मुलींबाबत असा विचार करणे किंवा समाजाने अशा प्रकारचे विचार ठेवणे किती त्रासाचे आहे? दुसरी गोष्ट म्हणजे, त्या मुलीच्या पोटावर व्रण आहेत. म्हणून मुले तिच्याशी लग्न करायला तयार नाहीत. आपल्या समाजात किती मागासलेपण आहे, या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे.

समाजसेवकांनी याबाबत लोकशिक्षण व लोकजागृती करून या दोन्ही गोष्टींसाठी मुलांच्या आणि एकूण समाजाच्या विचारात बदल करायचा प्रयत्न करायला हवा. एखाद्याला जन्मतः काही आजार झाला आणि बाकी ती मुलगी चांगली असेल, तर अशा विकृत विचारांच्या आपण पुढे गेले पाहिजे. पालकांनी मुलीच्या बाजूने खंबीर उभे राहायला हवे. असा काही आजार जर मुलाला झाला असता, तर मुलींनी नक्कीच लग्न केलं असतं. असं दिसून येतं की मुलांचे कितीही आजार असले, तरी मुली समजून घेऊन लग्न करतात. हा जो आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

आपण या गोष्टीवरून मुलींचा आत्मसन्मान सांभाळणे शिकलं पाहिजे आणि मुलींकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. या आपल्या लाडाच्या गौराई अनमोल आहेत, हे पालकांनी आणि समाजाने समजून घेतले पाहिजे.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT