Dr. Bhagyashree zope writes Water is life sakal
सप्तरंग

जल हेच जीवन!

पाणी हेच जीवन हे आपण कायम वाचतो, ऐकतो. परंतु त्या पाण्याचे नेमके महत्त्व, त्याची उपयुक्तता याबाबत आपल्याला फार माहिती नसते.

सकाळ वृत्तसेवा

पाणी हेच जीवन हे आपण कायम वाचतो, ऐकतो. परंतु त्या पाण्याचे नेमके महत्त्व, त्याची उपयुक्तता याबाबत आपल्याला फार माहिती नसते. तहान भागवण्यापलीकडे या पाण्याचे आपल्या शरीरासाठी खूप उपयोग आहेत. आजच्या लेखात आपण त्याची माहिती घेणार आहोत.

साक्षात जीवनाची ज्याला उपमा दिली जाते, अन्नापेक्षाही ज्याची आवश्‍यकता जास्ती असते, अशा पाण्याचा युक्तिपूर्वक व काळजीपूर्वक वापर करण्याची सध्या मोठी आवश्‍यकता आहे. याच उद्देशाने २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आज आपण आरोग्यामधील पाण्याचे योगदान नेमके काय असते याचा माहिती करून घेऊ या. शुद्ध पाण्याचे गुणधर्म आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहेत. " जीवनं तर्पणं धारणं आश्र्वासजननं श्रम-क्लम-पिपासा-मद-मूर्च्छा-तन्द्रा-निद्रा-दाह- प्रशमनमेकान्ततः पथ्यतमं च ।...सुश्रुत सूत्रस्थान." पाणी हे जीवनशक्ती प्रदान करते, तृप्ती करवते, शरीरधारणास मदत करते, आधार देते, श्रम, थकवा, तहान, गुंगी, झोप वगैरे गोष्टी दूर करते, जळजळ कमी करते व अतिशय पथ्यकर असते. पूर्वीच्या काळी पावसाचे, नदीचे किंवा विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. सध्या मात्र पृथ्वी, जल, वायू या महाभूतांत झालेल्या प्रदुषणामुळे शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झालेले आहे. ऋतुपरत्वेसुद्धा पाण्याचे गुण व परिणाम बदलत राहतात.

शरद व हेमंत ऋतूतील पाणी सर्वांत श्रेष्ठ होय. शरद ऋतूत अगस्ती नक्षत्रामुळे पाणी शुद्ध होते असे सांगितले जाते. त्यामुळे या दोन ऋतूंमध्ये पाणी शुद्ध, स्निग्ध, शुभ व ताकद वाढवणारे असते. शिशिर ऋतूतील पाण्यात किंचित तुरट चव असते व त्यामुळे ते थोडे रुक्ष गुणाचे असते. ग्रीष्मातील पाणी कोरड्या स्वभावाचे असते तर वर्षा ऋतूतील पाणी जड, अशुद्ध व आंबट चवीचे असते. वास्तविक सर्वच ऋतूत पाणी अगोदर शुद्ध करूनच पिणे आवश्यक असते. पाण्याची शुद्धी तीन प्रकारे केली जाते.

‘अग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं तप्ताय पिण्डसिकता लोष्ट्राणां वा निर्वापणं नाम निक्षेपणं प्रसादनं च कर्तव्यं, नागचम्पकोत्पलपाटलापुष्पप्रभृतिभिः चाधिवासनमिति। .....सुश्रुत सूत्रस्थान ’

अग्निसंस्काराने उकळून, सूर्यप्रकाशात तापवून किंवा तापवलेला लोखंडाचा गोळा किंवा गरम केलेली स्वच्छ वाळू पाण्यात विझवून पाणी शुद्ध करता येते. तसेच नंतर नागचाफा, कमळ, पाटला किंवा मोगरा, गुलाब वगैरे फुलांनी किंवा चंदन, वाळा, मुस्ता वगैरे सुगंधी वनस्पतींनी सुगंधित करून पिण्यासाठी वापरले जाते. पाणी पिण्यासाठी सोन्याचे भांडे वापरणे सर्वांत चांगले, अन्यथा त्याखालोखाल चांदी, तांबे, कासे, स्फटिक किंवा मातीच्या भांड्यातून पाणी पिणे चांगले असते. पाण्यावर संस्कार केले असताही त्याचे गुणधर्म बदलतात. वाळू तापवून विझवलेले पाणी किंवा तापवलेले सोने, चांदी विझवलेले पाणी पिण्याने तहान शमते, मातीचे ढेकूळ अग्नीवर तापवून पाण्यात विझवून, गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पिण्याने उलटी थांबते. ‘उष्णोदक’ या नावाची एक खास कल्पना शारंगधर संहितेत दिलेली आहे. ‘उष्णोदक’ अग्निसंस्काराने पाणी उकळून तयार केले जाते.

`अष्टमेनांशशेषेन चतुर्थेनार्धकेन वा ।

अथवा क्वथनेनैव सिद्धं उष्णोदकं वदेत्‌ ॥

... शारंगधर संहिता.’

पाणी उकळायला ठेवल्यावर एक अष्टमांश, एक चतुर्थांश किंवा निम्मे राहीपर्यंत अग्निसंस्कार केल्याने उष्णोदक तयार होते. असे पाणी पचायला अतिशय हलके, कफ-वातदोषांना संतुलित करणारे, आमवात, स्थूलता, खोकला, दमा, ताप वगैरे रोगात उपयुक्त, अग्निवर्धन करून पचनास मदत करणारे व लघवी साफ करणारे असते; जुलाब, ताप वगैरे अपचनातून उद्भवणाऱ्या त्रासांवर खरोखरच असे उष्णोदक औषधाप्रमाणे उपयोगी पडताना दिसते. रोजच्या वापरासाठी जरी इतका वेळ पाणी उकळवले नाही तरी २० मिनिटे अवश्‍य उकळावे.यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य टिकायला मदत मिळते, पोट साफ व्हायला, गॅसेस्‌ सरायला, भूक लागायला, आमपचन व्हायला, वजन नियंत्रित रहायला मदत मिळते. उकळलेले पाणी कोमट असताना पिणे अधिक चांगले. मात्र ते सामान्य तापमानाचे झाल्यानंतर प्यायले तरी चालते.

‘अनभिष्यन्दि लघु च तोयं क्वचित्‌ शीतलम्‌ । ... अष्टांग हृदय सूत्रस्थान.’

अगोदर उकळवून निवलेले पाणी पचायला अतिशय हलके असून कफ उत्पन्न करत नाही. विशेषतः पित्त वाढलेले असताना, उष्णतेचे त्रास होत असताना, चक्कर, डोळ्यासमोर अंधारी, मद्यपानाचे विकार झाले असताना, विषबाधा झाली असता थंड पाणी प्यावे. मात्र सर्दी खोकला, ताप, बरगड्यात दुखणे, विविध वातरोग झाले असताना, शरीरशुद्धी केल्यानंतर तसेच पंचकर्मात तूप प्यायल्यानंतर थंड पाणी वर्ज्य समजावे. पाण्याचा उपयोग विविध उपचार करण्यासाठीही होतो.

  • कोठेही भाजले असता त्यावर वाहते पाणी धरल्यास आग कमी होते.

  • डोळ्यांची आग होत असल्यास बंद डोळ्यांवर गार पाण्याच्या घड्या ठेवल्यास फायदा होतो.

  • उन्हात गेल्यामुळे नाकातून रक्त येत असल्यास टाळूवर गार पाण्याचे सिंचन केले जाते.

  • तापात डोक्याचे तापमान प्रमाणाबाहेर वाढू नये यासाठी थंड पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवल्या जातात.

  • तापात पोटात उष्णता जाणवत असल्यास नाभीवर थंड पाण्याने भरलेले काशाचे किंवा चांदीचे भांडे ठेवावे. दर ५-६ मिनिटांनी पाणी बदलावे.

  • मासिक पाळीच्या वेळी किंवा एरवीही स्त्रियांना योनीमार्गे अतिरक्तस्राव होत असताना ओटीपोटावर थंड पाण्याच्या घड्या ठेवल्यास फायदा होतो.

  • लघवी अडून राहिली असता ओटीपोटावर गरम पाण्याच्या घड्या ठेवल्यास लघवी सुटायला मदत मिळते.

  • अंगाला अगोदर सिद्ध तेल लावून नंतर गरम पाण्याने टबबाथ घेतल्यास वजन कमी व्हायला मदत होते.

  • श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात पाण्यावर विचारांचे संस्कार होतात हे तर नक्कीच आहे. चिकित्सापद्धतीत त्याचा उपयोग अनन्यसाधारण आहे. मनुष्यमात्रासाठी उपयुक्त पाणी खराब होऊ नये किंवा त्याचा चुकीचा व्यय होऊ नये याकडे लक्ष ठेवून सृष्टीची जलसमृद्धी वाढवण्याकडे लक्ष देण्यातच मानवाचे हित आहे.

- डॉ. भाग्यश्री झोपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT