सप्तरंग

पुस्तक परिचय : अंतरातल्या भावनांचा उद्‍गार...

डॉ. भालचंद्र सुपेकर

साधूचे कूळ पुसू नये
नदीचे मूळ पुसू नये
काळोखाचे गूढ पुसू नये

या कवितेनं सुरू होत जाणारा हा प्रवास मनातल्या काळोख्या गर्तेपर्यंत घेऊन जातो. या प्रवासात पावलागणिक दुःख, निराशा, अपमान, एकाकीपण, नाकारलेपण अशा अनेक भावनांच्या शाब्दिकच नव्हे तर मानस-भावनिक ठोकरा बसतात. त्यातून कोणत्याही संवेदनशील माणसाचं हृदय हलल्याशिवाय राहात नाही. शहर आणि गावाचं वर्णन करताना कवी नामदेव कोळी म्हणतात,

माय माती माणसं ओढून नेतात गावात
पैसा प्रगती प्रतिष्ठा झुलवत ठेवते शहरात
घोंगावत राहतं डोक्यात अगणित प्रश्नांचं मोहोळ
उत्तरांना घट्ट चिकटलेला कभिन्न काळोख

यातून गावाचं गावपण, आपुलकी, जिवाला जीव देणारी माणसं, माणुसकीचा बुरखा पांघरून कणा कणासाठी स्पर्धा करणारी शहरं आणि गाव-शहरातलं द्वंद्व यांचं परखड चित्रण कोळी करतात. असंख्य प्रश्नांचं मोहोळ आणि उत्तरांच्या काळोखाचे ढग वाचकाच्या मेंदूत, मनात साचतात. कवितेच्या ओळींतून ठिबकणारे घामाचे थेंब वाचणाराच्या हृदयात पाझरत जातात, खोलवर झिरपतात.

शेतमजुरांच्या अनेक शतकांपासून सुरू असलेल्या शोषणाचं वास्तव मांडणारी कविता अस्वस्थ करते. शोषणाचं हे वास्तव निखाऱ्यासारखं तुमच्या मन नि शरीराला चटका दिल्यावाचून राहात नाही. कोळी यांची जीवनाकडं बघण्याची दृष्टी ही त्याच्यात मुरून राहिलेलं गावपण आणि त्याच्या अंगावर बाभळीच्या काट्यासारख्या फुलणाऱ्या शहरीपणातून निपजलेली आहे. जितक्या सहृदयतेने तो गावातल्या परकऱ्या पोरींच्या भावना चितारतो तितक्याच आपुलकीने शहरातल्या परागंदा संस्कृतीचंही रेखाटन करतो. गावाकडं बालवयात लग्न होऊन मुलींना अकाली बाईपणाच्या गर्भात ढकलण्याच्या परंपरेला तो हळूवार बोचकारतो.

कोळी यांच्या मनातल्या कल्पना तो जन्माला यायच्या आधीपासून अस्तित्वात असतात. त्या कल्पना आणि वास्तवाचे संदर्भ घेऊन कवी त्याच्या संवेदनानुभवाच्या परिप्रेक्ष्यातून शब्दांची मांडणी करत असतो, त्याची उदाहरणं या संग्रहात आहेत.  ही कविता आहे काळोखाची, दुःखाची, गाव-शहराची, माय-बापाची, गायी-गुरांची, बाया-पोरींची, शेतकरी-मजुरांची आणि काळोख - दुःखाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चिमूटभर सुखाच्या आभासी कल्पनेची... शहराच्या गजबजाटात जगणाऱ्याच्या अंतरात भरून राहिलेला काळोख कवीने मांडला आहे. जिवंत, थेट भिडणाऱ्या आणि प्रभावी प्रतिमा हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे.

अर्नेस्ट फेनोलीसाच्या मते चिनी काव्यात चित्रात्मक भावालेख कवितेच्या समग्र अर्थाचा एक भाग बनलेले असतात. त्याचप्रमाणे कोळी यांच्या कविता हे शब्द-भावालेखच आहेत. कवीने सोसलेले दुःख, चटके, अंधार वाचकाच्या थेट हृदयात उतरतो हे या कवितेचं यश आहे. स्वप्न, लोकल, गगनचुंबी इमारती, गर्दी अशा शहरी प्रतिमांच्या साहाय्यानं उंचच उंच झेपावणारा पतंग मनात रुतलेल्या गावाच्या चिंतेने कवी एका क्षणात जमिनीवर आणतो. ‘माय’ ही या काव्यसंग्रहातली एक अत्यंत भावस्पर्शी कविता. आई या उत्तुंग अस्तित्वाचं आणि त्या अस्त्तिवापलीकडल्या अथांगतेचं शब्दभावचित्र या कवितेतून रेखाटलं आहे.

‘साहित्य सिद्धांत’ या ग्रंथात डॉ. स. गं. मालशे लिहितात की, कवितेची पुस्तकाच्या कागदावरील मांडणी, तिचं पठण आणि वाचकाला त्यातून होणारी अनुभूती हे कवितेचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. यातील कागदावरील मांडणी आणि वाचकाला होणारी अनुभूती या पातळ्यांवर तर ही कविता नक्कीच सकस ठरते. प्रत्येक सर्जनशील मनाच्या काळोख्या डोहातील अनाहत शब्द उजागर करणारी ही कविता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT