women Menstrual cycle sakal
सप्तरंग

रजा नव्हे; पाळीची प्रतिष्ठा!

पाळीच्या वेळी भरपगारी रजा देणं योग्य आहे का, या प्रश्नावर अलीकडे देशात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

अवतरण टीम

- डॉ. कामाक्षी भाटे

पाळीच्या वेळी भरपगारी रजा देणं योग्य आहे का, या प्रश्नावर अलीकडे देशात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रश्‍नाचं उत्तर तितकंसं सोपं नसलं तरी पाळीच्या वेदना आणि समस्या असणाऱ्‍या महिलांची संख्या अगदी नगण्य आहे. ज्यांना समस्या आहेत, त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहून निर्णय घेतल्यास, कामावर परिणामही होणार नाही आणि महिलांना त्रासही सहन करावा लागणार नाही.

पाळीच्या वेळी भरपगारी रजा देणं योग्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर तितकंसं सोपं नाही. म्हणजे असं की, बाळंतपणात सहा महिने महिलेला रजा असावी की नको? गर्भपात झाल्यास भरपगारी रजा द्यावी की नको? या दोन्हींबाबतीत आज जरी, ‘हो, रजा द्यायलाच हवी,’ असं ठाम उत्तर येत असलं, तरी असाही एक काळ होता, जेव्हा लोक म्हणायचे, ‘मुलांना जन्म देणं हा एखाद्याचा वैयक्तिक प्रश्न, त्याला सरकार किंवा मालक कसं जबाबदार?’ किंवा असंदेखील, ‘गरोदरपण, बाळंतपण हे आजारपण नाही, अशाने सगळ्याच महिला सुट्या घेऊन घरी बसतील.

मुलांना जन्म देणं हा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो काही महिलांना कामावर ठेवणाऱ्यांचा नव्हे. पण ‘पाळीची रजा’ या प्रश्नाचा सामाजिक भान ठेवूनच विचार करावा लागेल, नाहीतर उत्तर अगदी एकांगी आणि सरधोपट येईल. जसं ‘पाळी येणं ही विकलांगता नव्हे; तो काही रोग नाही! तर मग, भरपगारी सुट्टी कशाला?’

जगात याबाबतीत कसा विचार झाला आहे? पाळीची सुट्टी ही काही अगदीच नवी संकल्पना नाही. याबद्दल सरकारी, निमसरकारी धोरण असणारे देश आहेत. हे देश म्हणजे, जपान, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया. (हे सर्व आशियाई देश आहेत) आपल्या देशातही याबद्दल थोडा अभ्यास २०१०-२०१३ मध्ये झाला आहे.

पाळीच्या आधी आणि पाळीच्या वेळेला १० टक्के ते १३ टक्के महिलांना त्रास होतो. जसा की हातपाय दुखतात, ओटीपोटात दुखतं, अंग दुखतं, अंगावर जास्त जातं, उलट्या होतात, अतिशय अशक्तपणा वाटतो. यापैकी पाच टक्के महिलांना त्रास अतिशय जास्त झाल्याने त्या आपलं काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. दोन टक्के महिलांना उठताही येत नाही.

भारतात झालेले काही अभ्यास

‘मकाम’ या संघटनेने ऊसतोड कामगारांवर केलेल्या अभ्यासाप्रमाणे, ऊसतोड कामगार, सहा ते सात महिने दिवसातून १२ ते १४ तास सलग काम करतात. त्यांचे काम ऊस तोडणं, भारा बांधणं, डोक्यावरून भारा वाहून नेणं, ट्रकवर लावलेल्या शिडीवर भाऱ्यासह चढणं, भारा ट्रकमध्ये रचणं आणि असंच सात ते आठ तास काम! जेवणाची सुट्टी, पुन्हा सहा-सात तास भारा बांधणं, वाहून नेणं, शिडी चढणं, खाली येणं... असं सतत काम!

तिथे ना धड पाण्याची सोय ना स्वच्छतागृहांची. बीड जिल्ह्यातल्या या मजूर मुलींची लग्नं अवघ्या १४ ते १७ वर्षांत होतात. लग्नासाठी काढलेलं कर्ज लवकर फेडण्यासाठी या महिला कोयत्याबरोबर (नवऱ्‍याबरोबर) ऊसतोडीसाठी जातात. ना राहायची व्यवस्था, ना आंघोळीची. त्यामुळे या पोरीबाळींची ना पाळीची स्वच्छता, ना आराम, ना आरोग्याच्या सुविधा!

आपल्यापैकी बऱ्‍याच लोकांना माहीत असेल की, आपल्या देशात ४० टक्के महिलांना रक्ताची कमतरता (ॲनिमिया) असते. ज्या महिलांना ॲनिमिया असतो, त्यांना अंगावर जास्त जाऊ शकतं. जास्त काळही जाऊ शकतं. पाळीच्या त्रासाने बेजार झालेल्या महिलेला काम होत नाही. काम न होणं म्हणजे कमी मजुरी, कमी मजुरी म्हणजे जास्त उपासमार, जास्त ॲनिमिया... असं दुष्टचक्र महिलेचा जीव घेऊ शकतं.

आपल्याला देशातल्या पाळी आलेल्या महिलांबद्दलच्या शिवाशिवीच्या, शुभ-अशुभाच्या पारंपरिक चालीरीती विसरून चालणार नाही. ऊसतोड कामगार महिलांमध्ये अगदी बावीस-पंचविसाव्या वर्षीच गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकार दिसतात. याचं कारण काय, याबद्दल अधिक अभ्यास होणं आवश्यक आहे.

मध्यमवर्गीय महिलांमध्येसुद्धा ३५ ते ४० टक्के महिलांना ॲनिमिया असतो. यापैकी ५-१० टक्के महिलांना रक्तस्राव जास्त तरी असतो किंवा कमी तरी असतो. अशा महिलेला अशक्तपणा जाणवतो. या काम करणाऱ्या महिलेला एखादा दिवस किंवा काही तास आरामाची गरज भासू शकते.

पीसीओडी आणि पीसीओएससारख्या पाळीच्या समस्या समाजामध्ये वाढताहेत. अशा महिलांना थोडा वेळ आराम करण्याची गरज वाटते. गरम पाण्याने शेकणं आवश्यक वाटतं. या महिला विकलांग नसतात. अंगतोड मेहनत करणाऱ्‍या कामगार असतात. तरीही घटकाभर विश्रांतीची त्यांनाही गरज लागू शकते!

बिहारमध्ये ‘मनरेगा’च्या महिला कामगारांबरोबर पाळीच्या समस्यांबाबतीत काही अभ्यास २०११-१२ मध्ये झाले आहेत. या महिलांचं काम अतिशय कष्टाचं असतं. दगड-माती उचलणं, वाहून नेणं, काही ठिकाणी वर चढणं-उतरणं अशा प्रकारचं काम असतं. उन्हाचा कहर असतो. पिण्याच्या पाण्याची, स्वच्छ पाण्याची कमतरता असते.

या अभ्यासातही हेच दिसून आलं होतं की, १४ ते १८ टक्के महिला कामगारांना पाळीच्या वेळी थोडा त्रास होतो आणि ४ ते ५ टक्के महिलांना जास्त त्रास होतो. या अभ्यासातून दिसून आलेल्या महिलांच्या अपेक्षा काय होत्या... कामाच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता व्हावी. पाळी कधीही सुरू होऊ शकते म्हणून कमी दरात पॅडचा पुरवठा हवा होता. वेदना, अतिरक्तस्राव असणाऱ्‍या महिलेसाठी घटकाभर विश्रांतीला सावली हवी होती!

पाळीच्या रजेचे फायदे-तोटे

पाळीच्या वेदना आणि समस्या असणाऱ्‍या महिलांची संख्या अगदी नगण्य आहे; परंतु ज्यांना त्या समस्या आहेत त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहून निर्णय घेतल्यास कामावर परिणामही होणार नाही आणि महिलांना त्रासही सहन करावा लागणार नाही.

रजा किती असावी, कधी मिळावी, कोणत्या पद्धतीची असेल, हे प्रशासनाने महिलांशी चर्चा करून ठरवावे. अशा चर्चेमुळे पुरुष सहकाऱ्‍यांनाही पाळीसारख्या विषयावर जास्त उघडपणे बोलल्याने समस्येचं गांभीर्य लक्षात येतं. पाळीत अंगावर कमी-जास्त जायचं महत्त्वाचं कारण महिलांच्या अंगात रक्ताची कमतरता असणं आहे, याची माहिती पुरुष सहकाऱ्‍यांनाही होते.

पीसीओडी आणि पीसीओएस नव्याने वाढत जाणाऱ्‍या समस्यांची माहिती होते. या समस्यांवर योगासनांचं साधं टेक्निक कसं काम करतं, हे एकत्रितपणे कळतं. महिलांचे प्रश्न ऐकल्यावर लक्षात येतं की, काही महिलांना पाळीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला दोन-तीन तासच त्रास असतो. त्या काळात तिला आराम करता यावा, अशी रेस्ट रूमची सोय कार्यस्थळी करणं शक्य आहे.

रेस्ट रूममध्ये गरम पाण्याच्या पिशवीची सोयही सहज करता येईल. काही महिलांना अंगावर प्रचंड जातं, उलट्या होतात, ओटीपोटात दुखतं. अशा महिलांना घरात राहून काम करता यावं, ही सोय करता येते. एखादा दिवस उशिरा येणं, लवकर जाणं, गरज असल्याप्रमाणे विचारात घेता येतं. प्रशासनाला महिलांचे प्रश्न संवेदनशीलतेनं सोडवूनही कंपनीचा फायदा करणं शक्य आहे.

आता दुसरी बाजू बघू. सामान्यपणे महिला खोटं बोलून पाळीची भरपगारी रजा घेतील, कंपनीचे नुकसान होईल, असं काहींच्या मनात येतं! त्यापेक्षा महिलांना कामालाच घेऊ नये! महिला आपल्या पाळीच्या समस्या सांगतील, तेव्हा पुरुष सहकारी त्यांची चेष्टा करतील, त्यांना हसतील. वैयक्तिक प्रश्न असे उघड्यावर आल्यावर कार्यस्थळी लैंगिक छळाचं नवं दालन उघडेल!

पुरुष सहकारी उघडपणे महिलांच्या पाळीच्या डेट्सची चर्चा करतील. एखादा दिवस तिने रजा घेतली, तरी ही पाळीची रजा की कसली, अशी चर्चा होईल की काय, असं वाटणं साहजिक असलं तरी त्यापलीकडे जाऊन विकसित विचार करणं शक्य आहे.

म्हणजे केवळ ५ ते ७ टक्के महिलांची पाळीची प्रतिष्ठा राखणं शक्य आहे. कोणत्याही नुकसानाशिवाय! ही नैसर्गिक बाब समजून घेणं आणि ज्यांना गरज आहे अशा महिलांना त्यांच्या कामात मदत होईल अशी आवश्यक रजा देणंही शक्य आहे. यावर व्यापक चर्चा होऊ शकते.

(लेखिका के. ई. एम. रुग्णालयात कार्यरत आहेत.)

bhatekamaxi@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT