Aga Kavino Book Sakal
सप्तरंग

काव्यजिव्हाळ्याचा आरसा

समीक्षेची विशिष्ट परिभाषा बाजूला ठेवून शिवाय, कविमूल्यमापनाचाही उद्देश बाजूला ठेवून जोगळेकरांना एकूण मिळालेला काव्यानंद हा ‘अगा कवींनो’ ह्या ग्रंथाच्या मुळाशी आहे.

डॉ. केशव देशमुख

मराठी काव्य जगतामध्ये ठसठशीत ओळख स्थापीत करणाऱ्या पंधरा समकालीन प्रतिभावंतांच्या काव्यलेखनाचे मर्म उलगडून दर्शविणारा हेमंत गोविंद जोगळेकरांचा ‘अगा कवींनो’ हा ग्रंथ काव्यांप्रति असणारा जिव्हाळा आणि निष्ठा म्हणून स्वाभाविकच महत्त्वाचा होय.

द. भा. धामणस्कर. खलील मोमीन, नरेंद्र बोडके, अनुराधा पाटील, वसंत पाटणकर, हेमंत गोविंद जोगळेकर यांसह कविता महाजन, सतीश सोळांकुरकर, वर्जेश सोलंकी, दासू वैद्य, अरुण म्हात्रे, महेश केळूसकर, नितीन कुलकर्णी ह्या काहीशा जुन्या-नव्या दोन पिढ्यांतील कवींच्या लेखनांचे मर्म या ग्रंथातून उलगडत गेले आहे.

समीक्षेची विशिष्ट परिभाषा बाजूला ठेवून शिवाय, कविमूल्यमापनाचाही उद्देश बाजूला ठेवून जोगळेकरांना एकूण मिळालेला काव्यानंद हा ‘अगा कवींनो’ ह्या ग्रंथाच्या मुळाशी आहे. त्यामुळेच त्या प्रकारचा आनंद वाचकांनाही या ग्रंथातून निश्‍चित प्राप्त होईल; अशा प्रकृतीचे हे हार्दिक आणि आत्मीय अशा स्वरूपाचे हे लेखन आहे. जोगळेकर खुद्द काव्यविश्‍वात रमणारे, काव्यानंद घेणारे महत्त्वाचे कवी.

‘‘कवितेशी घट्ट बांधीलकी आणि कवींशी निर्मोही धारणेने जपलेले ऋणानुबंध म्हणजे जोगळेकरांच्या एकंदर वर्तन तसेच लेखनाची खरी ओळख.’’ असेही या ग्रंथकर्त्याबद्दल म्हणता येईल. म्हणूनच, ‘अगा कवींनो’ या ग्रंथातील रसास्वाद, ग्रंथातील काव्य-कवी-निरूपण अधिक आस्वादक झाले आहे. काव्यानंदी ठरलेल्या या लेखनाचा विशेष म्हणजे, त्यातील स्वागतशीलता तसेच त्यातील मराठी काव्यासंबंधीची असणारी अविचल निष्ठा. या पंधराही लेखांतून अगदी चटकन जाणवतच राहते.

विफल प्रेमाची सफल कविता लिहणाऱ्या प्रियदर्शन पोतदारांनी कवितेला कायम जिवापाड जपले आहे. अशा कवीच्या काव्यलेखनाचे अंतरंग तेवढ्याच हळुवारपणे पहिल्याच लेखनातून जोगळेकर उकलून दाखवितात. तर समजूतदार, संयत सुरांनी दीर्घकाळ काव्यसाधना करणारे द. भा. धामणस्कर पांच दशकांहून अधिक काळांपासून मनःपूत, कृतार्थ भावनेने कवितेसोबत तर त्यांच्यासोबत कविता राहिलेली आहे.

समजूतदार कविता लिहिणाऱ्या या प्रतिभावंतावरचा लेख तर मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यांच्यासंबंधी, त्यांच्या काव्यांसंबंधी जी शक्तिस्थळे आहेत; या ग्रंथात येतात ती अर्थातच मौलिक म्हणता येतील. नात्यांचा, माणसांचा, मृत्यूचा वेध घेणारी महत्त्वाची कविता महाजनांनी लिहिली. तर खोल दुःखाची कविता अनुराधा पाटलांनी लिहिली; हे नोंदवताना ‘‘अनुराधा पाटील यांच्या कविता मुख्यतः दुःखाच्या आहेत,’’ असे जोगळेकरांचे एक निरीक्षण अगदीच समुचित.

आई, बाई, माता अर्थात स्त्रियांच्या काळीज घरांतल्या वेदनेला पूर्णतः भिडणारी पाटलांची कविता खेडी, माती, तेथील भवताल यांनाही फार तळाशी पोहोचत स्वतंत्र सत्त्व स्पष्ट करते. तर आपल्या पुढ्यात स्वच्छ आरसा ठेवून स्वतःच्या काव्यसाधनेसंबंधी ‘साच्यात न बसणारा कवी’ म्हणून जोगळेकरांनी वाचकांना स्वतःच्या लेखनाचीही इथे सैर घडविली आहे.

‘अगा कवींनो’ ग्रंथातील हा लेख अर्थातच निराळा आणि लक्षवेधी असा म्हणायला हवा. होड्या,मनातले घर, उघडे पुस्तक, उत्तरायण ह्या कवितासंग्रहांनी सर्वदूर ओळख निर्मिणाऱ्या जोगळेकरांच्या काव्यांचे त्यांनी ‘स्वतः केलेले’ निरूपण अर्थातच साक्षेपी आहे.

स्वत:च्या लेखनाकडे कसे पहावे, यासंबंधीचे जागते भान म्हणूनही या लेखाचा उल्लेख अनाठायी ठरु नये. ‘मी कुठल्याच गटात बसणारा कवी नाही’, असे म्हणणाऱ्या जोगळेकरांची मुक्त, स्वच्छ, शांत प्रकृती त्यांच्या या लेखातून कळते; ती अधिक आरस्पानी आणि मनवेधी अशीच आहे.

तर अरुण म्हात्रे आणि महेश केळूसकरांच्या काव्यानुरोधाने जोगळेकरांनी नमूद केलेली ‘कवितेच्या रुपांतूनच वेगवेगळी स्त्री रुपे दाखविणारे म्हात्रे, ‘आणि ‘वर्तमानाचा वेध घेतला, प्रसंगी महनीय नेत्यांनाही सुनावताना केळूसकरांची भूमिका सामान्य माणसाची राहिली आहे.

‘अशी ही दोन्ही कवींची ओळख त्यांच्या काव्य प्रवासालाही न्याय देणारीच शिवाय साध्या व रोखठोक भाषेत लिहिणाऱ्या केळुसकरी काव्यासाठी त्यांनी ‘मस्करिका’ असा शब्द योजलेला आहे. तथापि, भाष्यकाव्य म्हणून महेश केळुसकरांची कविता अधिक भेदक, अधिक समकालीन ठरते; याकडेही दुर्लक्ष करता येत नाही.

या ग्रंथात वर्जेश सोलंकी, नितीन कुलकर्णी, दासू वैद्य, सलील कुलकर्णी यांचे काव्यलेखन विषय वैविध्य, प्रतिमांचे निराळेपण आणि एकूणच निरंतर काळचा वेध घेणारे म्हणून अर्थातच महत्त्वाचे काव्यलेखन ठरते. मंगेश काळे, हेमंत दिवटे, रमेश इंगळे अशी मोठी पण सशक्त कवीफळी या पिढीमध्ये सतत, तथापि महत्त्वाचे लेखन करत आहे.

त्यातील वर निर्देश केलेल्या निवडक कवींच्या लेखनाचा मर्मवेध हेमंत जोगळेकरांनी घेत, त्यांच्या काव्यांची सामर्थ्यस्थळे समीक्षेचे म्हणून एक असणारे ओझे न बाळगता ‘अगा कवींनो’ म्हणून उकलून सहजी दाखविली आहे. निम्न मध्यमवर्गीयांच्या जीवनाला अविष्कृत करणारी सोलंकीची कविता किंवा कुटुंबजीवनाची हृद्यचित्रे मांडणारी दासूंची कविता काव्यलेखानाचा तोल आणि काव्यलेखनाचा दर्जा अर्थातच राखून आहे.

वसंत पाटणकर आणि नरेंद्र बोडके या दोन ज्येष्ठ कवींच्या काव्यलेखना संबंधाने जोगळेकरांनी या ग्रंथातून केलेली चर्चा आजच्या नव्या वाकांसाठी महत्त्वाची ठरावी, अशीच आहे. पाटणकरांनी काव्य, काव्यसमीक्षा या क्षेत्रांत फार तपस्वी अशा वृत्तीने, जणे आयुष्यभर कार्य केले. या तुलनेत त्यांची कविता नव्या वाचकापिढीसाठी काहीशी अपरिचित म्हणावी अशी राहिली.

जोगळेकरांचा हा लेख त्या त्यादृष्टीने अर्थातच मौलिक आणि स्वागतार्हच म्हणायला हवा. जोगळेकर म्हणतात त्याप्रमाणे, मितभाषी असलेले पाटकर यांनी फार कमी असे काव्यलेखन केले. ‘विजनातील कविता’ हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह, त्यातील ते आणि मी, समुद्र, करार, खंडाळ्यातले काही दिवस या आणि इतर काही कवितांसंबंधी जोगळेकरांनी केलेल काव्यनिरुपण पाटणकरांना अर्थात, व्यवस्थित समजून घेण्यासाठी यथार्थ ठरते.

तर चिंतनशील असणाऱ्या बोडके यांच्या काव्याची मर्मस्थळंही जोगळेकरांनी स्वागतशीलतेने आणि गांभीर्याने त्यांच्या विवेचनातून दाखवून दिलेली आहेत. वस्तुत: आपल्या काव्यलेखनात विचारांना प्राधान्य देणारे बोडके हे पुष्कळदा अल्पाक्षरी, विचारपुष्ट, चिंतनप्रवण कविता लिहित राहिले. नव्या मराठी वाचकांसाठी हे दोन्ही लेख ( पाटणकर, बोडके यांच्या संबंधीचे) अर्थातच संदर्भमूल्य म्हणून आणि वाचनीय म्हणूनही मोलाचे लेख ठरतील.

‘अगा कवींनो’ या ग्रंथातील पंधरापैकी पंधराही लेख एकुणातच समकालीन मराठी कविजगत आणि काव्यविश्‍व पुढ्यात ठेवतात. शिवाय संदर्भांसाठी त्या त्या लेखांत समकालीन वेगवेगळ्या प्रतिभावंतांचे आणि त्यांच्या लेखनांचे संदर्भ जोगळेकरांनी घेतलेले आहेत. त्यामुळे, त्यांच्या या काव्यमीमांसेला अनेक अर्थांनी पूर्णत्वही प्राप्त झालेले आहे.

त्यामुळे जोगळेकरांचे हे लेखन स्वागतार्हता म्हणून, शिवाय कवितेशी निरंतर सांभाळलेली हार्दिकता म्हणून अधिक महत्त्वाचे ठरते. सुनील मांडवे यांनी ‘अगा कवींनो’ ग्रंथासाठी केलेले मुखपृष्ठही शांत, संयत, सहज आणि काव्यांची प्रकृती नेमकेपणाने अधोरेखित करणारे म्हणता येईल.

अगदी, जोगळेकरांची प्रकृती आणि त्यांच्या जणू काव्यनिरुपणाचाच स्वभाव मुखपृष्ठाने तोलून धरला आहे ! सर्वच लेखांचा पोत आणि सर्व लेखांची आंतरिक लय वाचनाची गोडी उन्नत करणारीच आहे.

पुस्तकाचं नाव : अगा कवींनो

लेखक : हेमंत गोविंद जोगळेकर

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे

(०२०- २४४९७३४३, ९८२३०६८२९२)

पृष्ठं : १७६

मूल्य : २६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT