सर्वच जिवाणू प्रयोगशाळेत वाढवता येतात असं नाही. काहींची वाढ फक्त आपल्या शरीरातच होते. काहींच्या वाढीचा वेग अत्यंत कमी असतो व त्यामुळे त्यांच्याबद्दल निष्कर्ष काढणं खूप अवघड होतं.
- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com
रोग का होतो, रोग पसरवणाऱ्या अशा सूक्ष्मजीवांची वैशिष्ट्यं काय असतात, रोगांचे प्रकार कसे ठरवले गेले आहेत आदी विषयांची माहिती याआधीच्या लेखात आपण घेतली.
या सूक्ष्मजीवांचा शरीरात प्रवेश झाल्यावर, त्यांनी स्वतःला आपल्या शरीरात व्यवस्थित स्थापित केल्यानंतर ते विविध लक्षणांद्वारे स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यास प्रारंभ करतात. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू एकाच प्रकारची लक्षणं दाखवू शकतात. अशा वेळी फक्त लक्षणं बघून आजाराबद्दल निर्णय घेता येत नाही. म्हणजे, तसं ठामपणे सांगता येत नाही व औषधयोजना, उपाययोजना ठरवणंही शक्य होत नाही. विशेषकरून, जर प्रतिजैविकं/अँटिबायोटिक्स (Antibiotics) द्यायची असतील तर निश्चितपणे संसर्ग करणारे जिवाणू कळणं अत्यंत आवश्यक असतं. अशा वेळी अत्यंत महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे प्रयोगशाळेतील निदान व निष्कर्ष.
विशिष्ट जिवाणूंची ओळख पटवण्यासाठी डॉक्टर आपल्याला प्रयोगशाळेतून ‘कल्चर रिपोर्ट’, म्हणजे प्रयोगशाळेत आपल्या शरीरातल्या नमुन्यावरून (रक्त-लघवी इत्यादी तपासून दिसलेले जिवाणू, त्यांची झालेली वाढ व काढलेला निष्कर्ष) व त्या जिवाणूंचा प्रतिजैविकांसाठी असलेला प्रतिसाद यांच्या चाचण्या करून घ्यायला सांगतात. त्यानुसार, प्रयोगशाळेत विविध रासायनिक, जैवरासायनिक, तसंच सूक्ष्मदर्शकाच्या वापरानं केल्या जाणाऱ्या आणि अन्य रोगनिदान चाचण्या करून, जिवाणू कुठला आहे, याबद्दल निष्कर्ष काढला जातो. कुठलं प्रतिजैविक त्या जिवाणूंना सर्वाधिक अवरोध निर्माण करू शकेल हेही सांगितलं जातं. पुढील उपचार करण्यासाठी या निष्कर्षांची डॉक्टरांना मोलाची मदत होते. हे निष्कर्ष येण्यास काही वेळा ४८ ते ७२ तास लागू शकतात; पण तोपर्यंत डॉक्टर वाट बघत बसत नाहीत तर स्वतःच्या अनुभवावरून, दिसणाऱ्या लक्षणांवरून व रुग्णाला इतर माहिती विचारून औषधोपचार सुरू करतात. प्रयोगशाळेतील निष्कर्षांवरून या उपचारांना आणखी निश्चित दिशा मिळण्यास मदत होते. या सर्व प्रक्रियेला लॅब डायग्नोसिस (Lab Diagnosis) असं म्हणतात.
सर्वच जिवाणू प्रयोगशाळेत वाढवता येतात असं नाही. काहींची वाढ फक्त आपल्या शरीरातच होते. काहींच्या वाढीचा वेग अत्यंत कमी असतो व त्यामुळे त्यांच्याबद्दल निष्कर्ष काढणं खूप अवघड होतं. मात्र, रोगनिदानाच्या काही विशिष्ट पद्धती प्रगत विज्ञानामुळे विकसित झाल्या आहेत. काही वेगळ्या चाचण्या करून अचूक आणि जलद निदान त्यामुळे करता येतं.
साधारणपणे जिवाणूमुळे होणारे रोग हे हवा, पाणी, अन्नपदार्थ, तसंच रुग्णाशी थेट संपर्क, रुग्णालयात व्यवस्थित निर्जंतुक न केलेल्या काही साहित्यामुळे (उदाहरणार्थ : कॅथेटर), तसंच शस्त्रक्रियेच्या वेळी निर्जंतुकीकरणाची काळजी न घेतली गेल्यास होऊ शकतात.
दूषित हवा, पाणी, तसंच शिळं व उघडं अन्न, नीट न शिजवलेलं अन्न यांतून जिवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. एखाद्या वातावरणात (उदाहरणार्थ : रुग्णालयात किंवा सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळेत) जर कुठले जिवाणू असतील तर, आपण श्वास घेताना ते श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करून रोग निर्माण करू शकतात. अशा प्रकारच्या रुग्णाच्या श्वासातून, शिंकेतून किंवा खोकल्यातून हे जिवाणू बाहेर फेकले जातात व काही काळ ते जिवाणू त्या वातावरणात तसेच राहतात. यादरम्यान हे जिवाणू दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करून तिथं स्थापित होऊन रोग निर्माण करू शकतात. अर्थात्, प्रवेश केलेल्या जिवाणूंची संख्या, व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी बाबीही यात तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. दूषित पाण्यामुळे होणारे आजार (उदाहरणार्थ : विषमज्वर, कॉलरा हे आपल्या परिचयाचे आहेत).
दूषित पाणी हा संसर्गजन्य आजारांचा खूप मोठा ‘स्रोत’ असतो. रोग पसरवणारे जिवाणू हवेपेक्षा पाण्यात जास्त काळ राहू शकतात, तसंच पाण्यात अनेक प्रकारच्या दूषित वस्तू मिसळल्या जाऊन तिथं रोगांचं संक्रमण लवकर होतं. पाण्याद्वारे जिवाणूंचा प्रवेश थेट पोटात, आतड्यात होऊन जिवाणूंना तिथं स्थापित होणं तुलनेनं सोपं जातं. तिथली परिस्थिती ही जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्याचा फायदा घेत जिवाणू तिथं वाढतात, स्थिरावतात व रोग निर्माण करतात.
या बाबीकडे नीट लक्ष दिलं गेलं नाही तर बरीच गुंतागुंत निर्माण होऊन गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. स्वच्छ, निर्जंतुक केलेलं पाणी पिणं हा सर्वात योग्य व खबरदारीचा उपाय. दूषित अन्नपदार्थ हेही जिवाणूंच्या संसर्गाचं प्रमुख कारण असतं. कच्च्या, अर्धवट शिजलेल्या, शिळ्या व उघड्या ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे रोग पसरण्याची शक्यता असते. या पदार्थांमधून जिवाणू शरीरात प्रवेश करतात. अन्नात पोषणमूल्य असल्यामुळे जिवाणू त्यात वाढतात आणि अशा अन्नाचं सेवन केल्यामुळे आपण बाधित होतो. काही वेळा अन्नात असेही जिवाणू असतात, जे स्वतः फार त्रास देत नाहीत; परंतु ते विष (Toxin) तयार करतात आणि ते अन्नाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतं व त्याचे गंभीर परिणाम (Food-Poisoning) आपल्याला भोगावे लागतात. अशा वेळी प्रतिजैविकंही फार उपयोगी ठरत नाहीत व वेगळी उपाययोजना करावी लागते.
संसर्गाच्या या प्रमुख ‘स्रोतां’व्यतिरिक्त इतरही अनेक मार्गांनी संसर्ग होऊ शकतो. उघड्या, उपचार न केलेल्या जखमा, काळजी न घेता केल्या गेलेल्या शस्त्रक्रिया, रुग्णालयांत होणारे आजार हे संसर्गाचे इतर मार्ग असू शकतात.
काही संसर्गजन्य रोगांविषयी विस्तृत माहिती पुढील लेखात...
(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.