नुकतीच मंडईमध्ये भाजी खरेदी करून जेव्हा बायकोने भाजीवालीला पिशवी मागितली, तेव्हा ती म्हणाली, ‘अहो, ती काय आहे पिशवी तुमच्या खांद्यावर.’
नुकतीच मंडईमध्ये भाजी खरेदी करून जेव्हा बायकोने भाजीवालीला पिशवी मागितली, तेव्हा ती म्हणाली, ‘अहो, ती काय आहे पिशवी तुमच्या खांद्यावर.’ आणि हसून म्हणाली, ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा!’ मराठी म्हणी किती प्रकारच्या आहेत, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. गाडी चालवत घरी येताना ‘मराठी भाषा’ या विषयावर विचारमंथन सुरू झालं.
प्रत्येक पिढीत मराठीचा वापर कमी होत आहे, यात दुमत नाही. मराठीचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत असतंच. गेली आठ-दहा वर्षं ‘मराठी भाषा दिवस’ यासाठीच पाळला जातोय. तरी मराठीतील अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार काळाआड झाल्याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही. मोल्सवर्थ नामक एका इंग्रजानं १९ व्या शतकात तयार केलेला मराठी शब्दकोश पाहून तर याची खात्रीच होते.
भाषा ही संस्कृतीची वाहिनी आहे. जेव्हा इंग्रजी (किंवा हिंदी) भाषा मराठीत संमिश्र होऊ लागली, तेव्हा तिकडची संस्कृतीही इकडं आलीच. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात हे तर होणारच. नवीन पिढी मराठी लिहिण्या-वाचण्यास कचरते. शिवाय, तांत्रिक अभ्यासक्रम इंग्रजीत असतो. ज्या देशात इंग्रजांचं राज्य आलं नाही, तिथे मात्र हे शिक्षण मातृभाषेतच दिलं जातं. इस्राईलसारख्या देशानं तर पूर्णतः नाहीशी झालेली हिब्रू भाषा आपली राष्ट्रभाषा करून दाखवली.
पाचशे वर्षांपूर्वीच मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात फार्सी शब्द शिरले, त्यावर उपाय म्हणून शिवछत्रपतींनी राज्यव्यवहारकोश तयार करविला, आपल्या अष्टप्रधानांना मराठी नावं दिली, स्वतःचा शिक्काही संस्कृतमध्ये लिहिला. विसाव्या शतकात सावरकरांनी भाषाशुद्धीचा विडा उचलला. अजूनही फार्सी - तुर्की शब्द मराठीत वापरले जातात. शिवकालापासून भाषेचे अनेक मासले आपल्याकडे मूळ पत्रांतून उपलब्ध आहेत. बखरींमध्ये एकप्रकारची भाषा दिसते, तर संतवाङ्मयातील मराठी थोडं वेगळं आहे. वीरश्रीनं परिपूर्ण असे अनेक पोवाडेही मराठीत रचले गेले. अटकेपार मराठा फौजा गेल्याविषयी शाहीर प्रभाकर म्हणतो,
‘फेडून नवस माहोरास,
गेले लाहोरास, जिंकीत झेंडे!
अरे ! त्यांनी अटकेत,
पाव घटकेत, लावले झेंडे!’
आज छत्रपती शिवरायांची निवडक पत्रं उपलब्ध आहेत. मोगलांचा हल्ला येणार ही बातमी कळल्यावर, प्रजेचं रक्षण करण्याकरिता महाराज हुकूम देतात, ‘गावाच्या गावा ताकिदी करून माणसे लेकरेवाळे समत तमाम रयेति लोकास घाटाखाले जागा असेल तेथे पाठवणे, जेथे गनिमाचा आजार पहुचे ना. ये कामास है गै न करणे.’ प्रजेविषयीची चिंता या पत्रातून प्रकट होते. बाजीराव पेशव्यांनी आपलं व्यक्तिमत्त्व आपल्या पत्रांतून असं व्यक्त केलंय, ‘या उपदि रंगात रंग भरून, तेथील लोक लगामी लाऊन, हरहुन्नरे काम उलटावेच उलटावे. लोकांस निरनिराळे फोडणे ते फोडावे, रंग भरून बाजी मारावी.’ हे शब्द बाजीरावांसारख्या अजेय योद्ध्याच्या पत्रातच येऊ शकतात.
माधवरावांच्या काळात जेव्हा नाना फडणीसांकडून काही कसूर झाला असला की, ‘‘यावरून अपूर्व वाटते’’ असे, किंवा एखाद्याला जरब पोचवायची असल्यास, ‘फिरून बोभाट येऊ न देणे. जाणीजे,’ अशी ताकीद दिली जात असे. पण, नानासाहेब पेशव्यांनी आपलं भाषाकौशल्य वापरून राजकारण हाकलं, सरदार आपल्या लगामी लावले. दौलताबाद जिंकणं कठीण आहे; पण किल्लेदाराला थोडे पैसे दिले तर काम आटपेल, असं गोपाळराव पटवर्धनांनी त्यांना सुचवलं. त्यावर नानासाहेबांनी कडक उत्तर दिलं, ‘गोपाळरावजी! दौलताबाद तुम्हास दुर्घट वाटते. परंतु दो महिन्यात सख्तीने वेढा घालून एक रुपया न देता घेऊ! का, की त्याची कुमक कोणी करत नाही. मोगलाने कुमक केली तर पन्नास हजार फौज जमा करून मोगल दक्षिणेत होता की नव्हतासा करू, हे मोगल समजले आहेत. तुम्ही समजत नाही त्यास इलाज काय करावा? जो जो तुम्ही राजकारण करता, तो तो काम नासते!’ अर्थात, हे शब्द गोपाळरावांस झोंबले आणि लवकरच दौलताबाद काबीज झाले.
नानासाहेबांचं पत्रलेखन बरंच आहे. त्यात बुंदेलखंडात जाऊन तेथील प्रदेश, लोक, संस्कृती पाहून ते प्रभावित झाले आणि मित्रवर्य नाना पुरंदरे यांस त्यांनी जे पत्र लिहिलं ते लुप्त झालेल्या मराठी भाषेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. त्यातील एक उतारा असा आहे, बघा कितपत बोध होतो :
‘या प्रांती प्राचीन हिंदू राजे सर्व संस्कृतप्रवीण, वेश्यामद्यादिकांचा अतिअनादर, साता पिढ्यांचे श्रीमंत, साता नृत्यगीतवद्वव्युपत्तिप्रवीण, स्वजातीय अनेक स्त्रिया प्रवीण; त्यांसी रत; किंचित जितेंद्रियही आहे; नर्माची रीत; देवा ब्राह्मणांची विशेष मर्यादा व शोभा, जिचे अवलोकनमात्रे अधिर्मिष्टास धर्मरता उत्पन्न होणार, वर्जावर्जादिक शास्त्रप्रमाणरीतीने गाणार; वेदशास्त्र किंचित जाणतात; त्यात जे मुख्य ते निरपेक्ष, सर्वर्धीसमृद्धि, त्यांचे शिष्यवर्ग अनेक; प्रयत्ने आणून विद्यादृष्टीने पाहता अतिश्रेष्ठ स्वदेशज, स्थूल दृष्टीने पाहता मात्र अरमणीय.’
हे पत्र काहीशा मिस्कीलपणे वयाच्या २१-२२ व्या वर्षी लिहिले आहे. भाषेतून भावना कशी व किती प्रमाणात प्रकट होऊ शकते, हे भाषापंडितांनी या लुप्त होत चाललेल्या भाषालंकारावर जरूर मनन करावं.
संत ज्ञानेश्वरांपासून कवी गदिमांपर्यंत मराठी भाषेची अनेक रूपं जर आपण पाहिली, तर मराठीला अभिजात दर्जा देण्यात काय अडचण आली, माशी नक्की कुठं शिंकली, या प्रश्नांची गोम उलगडणं जरा कठीणच आहे. अर्थात, पुढील वर्षी मराठी भाषादिनी याची पुन्हा आपल्याला आठवण होईलच.
(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातल्या मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.