Joe Root Sakal
सप्तरंग

रूट सचिनचा विक्रम मोडेल?

नियती खरंच काही वेळा अविश्वसनीय असे योगायोग घडवून आणते. कूकसुद्धा सचिनचा विक्रम मोडेल असं म्हटलं जात होतं; पण त्याची डाळ शिजली नाही.

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

नियती खरंच काही वेळा अविश्वसनीय असे योगायोग घडवून आणते. कूकसुद्धा सचिनचा विक्रम मोडेल असं म्हटलं जात होतं; पण त्याची डाळ शिजली नाही.

जो रूट यानं ‘लॉर्ड्‌स’वर केलेल्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यानं एक अंदाज वर्तवला : ‘सचिन तेंडुलकरचा कसोटीतला सर्वाधिक धावांचा विक्रम जो रूट मोडू शकतो.’

त्याच कारण असं की, रूट यानं दहा हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडला आहे. तो ओलांडताना त्याचं वय होतं ३१ वर्षं १५७ दिवस.

दहा हजारांचा टप्पा ओलांडणारा तो दुसरा इंग्लिश क्रिकेटपटू. त्याआधी नेमक्या त्याच वयात, म्हणजे ३१ वर्षं १५७ दिवस असताना, कूकनं तो टप्पा पार केला होता.

नियती खरंच काही वेळा अविश्वसनीय असे योगायोग घडवून आणते. कूकसुद्धा सचिनचा विक्रम मोडेल असं म्हटलं जात होतं; पण त्याची डाळ शिजली नाही. रूटबद्दल प्रेमानं बोललं गेलं. कारण, तो अफलातून खेळी खेळला.

इंग्लंडचा विजय तसा सोपा नव्हता. अगदी शेवटच्या दिवशीसुद्धा. ६१ धावा हव्या होत्या आणि पाच बळी शिल्लक होते. आकाशात ढग होते, हवेत दमटपणा होता आणि खाली शेपूट होतं. दुसरा नवा चेंडू येईपर्यंत मॅच जिंकायची होती. कारण; नवा चेंडू असल्यानं इंग्लंडचं फलंदाजीचं शेपूट फळं कापावी तसं किवी कापेल असं वाटत होतं. अशा परिस्थितीत रूटनं संघाला विजय मिळवून दिला. चौथ्या डावातला विजय मिळवून देणारं देखणं आणि आक्रमक शतकं पाहिल्यावर अनेक जण रूटच्या प्रेमात पडले. त्यात त्यानं नेतृत्व सोडलं होतं. नेतृत्वात आलेलं अपयश मागं सारत तो बहारदार खेळला. ‘लॉर्ड्‌स’...इंग्लिश समरची सुरुवात...या वातावरण समृद्ध करणाऱ्या गोष्टीही त्या शतकाची शान वाढवून गेल्या.

एकंदरीत ते शतकं प्रेमात पडण्यासारखंच होतं.

रूट हा माझा लाडका फलंदाज आहे. सध्या जगात कसोटी क्रिकेटमध्ये चार फलंदाज महान मानले जातात.

१. विराट कोहली (रुसलेला फॉर्म परतेल या आशेवर),२. स्मिथ, ३. विल्यम्सन, ४ रूट.

बाबर आझम याचं नाव घेतलं जातं; पण मी त्याला कसोटीत पाहिलेला नाही. रूट हा क्लासिकल फलंदाज आहे. तंत्र, काव्य, सौंदर्य हे त्याच्या खेळात सामावलेलं आहे. बॅक फूटवर, फ्रंट फूट वर त्याच्याकडे उत्तम फटके आहेत. स्विंग, स्पिन, बाऊन्स वगैरे कशाचीही त्याला ॲलर्जी नाही. त्याच्या जगभर धावा आहेत. भारतीय उपखंडात तर रग्गड आहेत. परवा, ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन श्रीलंकेत जाताना म्हणाला, ‘तिथं कसं खेळावं यासाठी मी रूटच्या फलंदाजीचा अभ्यास केलाय.’

कर्णधाराच्या जबाबदारीनं रूड अवघडला नाही की नेतृत्वाच्या अपयशानं त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला नाही. त्याच्या फलंदाजीचं सौंदर्य कशानंही डागाळलं नाही.

वय, फिटनेस या त्याच्या जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे सचिनच्या विक्रमला तो भोज्जा करेल असं वाटू शकतं; पण वाटणं आणि करणं यांत स्वप्न आणि वास्तव एवढा फरक आहे.

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं माझं मत आहे. काही विक्रम मोडले जाणार नाहीत असं वाटतं; पण मोडले जातात.

सर गारफील्ड सोबर्सनं आपल्या पुस्तकात लिहिलं होतं, ‘माझा नाबाद ३६५ धावांचा विक्रम मोडला जाईल असं मला वाटत नाही.’

फ्रेडी ट्रुमन यानं ३०७ विकेट्स घेऊन विक्रम केला तेव्हा साक्षात रिची बेनौ म्हणाला होता, ‘याच्या पुढं कुणी जाईल असं मला नाही वाटत.’

दोन्ही विक्रम पुसले गेले.

सोबर्सचा विक्रम लारानं ३७५ धावा करून मोडला. मग तोही विक्रम हेडननं ३८७ करून मागं टाकला. त्यानंतर लाराही पुन्हा स्वस्थ बसला नाही. त्यानं थेट ४०० धावा करून तो ‘कोहिनूर’ परत मिळवला. मात्र, कुणी ४०१ करणारच नाही, असं वाटत नाही. कारण, हल्ली फलंदाजी खूप आक्रमक आणि वेगवान झाली आहे आणि असाच फलंदाज तो विक्रम मोडू शकतो.

गोलंदाजीत तर मुरलीनं थेट ८०० बळी घेतले. ट्रुमनचा विक्रम कुणाच्या खिजगणतीतही नाही. त्यामुळे सचिनचा विक्रम कितीही चिरंजीव राहावसा वाटला, तरी राहीलच असं नाही. मात्र,

रूटसाठी ती चढण सोपी नाही, बिकट आहे, हेही तेवढंच खरं!

त्याला जवळपास सहा हजार धावा हव्यात. अगदी अचूक सांगायचं तर ५९२१.

रूटची सरासरी आहे जवळपास ५०, सचिनची ५३ च्या आसपास.

सचिन २०० कसोटी खेळला. रूटला १५ हजार ९२१ धावा करायला किमान तेवढे कसोटी सामने खेळावे लागतील. जर त्यानं कसोटी डावामागं धावा वाढवल्या तर! रूट ११८ कसोटी खेळला आहे. म्हणजे, अजून किमान ७८ कसोटी त्याला हव्यात. वर्षाला १० कसोटी सामने धरले तरी अजून आठ वर्षं झाली. रूट फिट आहे; पण तेव्हा तो चाळिशीत असेल.

सतत फॉर्म टिकायला हवा आणि फिटनेससुद्धा! किंवा एखादा सुवर्णकाळ कारकीर्दीत यायला हवा, टेनिस एल्बोनंतर सचिनच्या कारकीर्दीत जसा आला होता तसा.

बऱ्याचदा विक्रम जवळ आला की दबाव वाढतो आणि दबावाखाली चुका होतात; पण भविष्याच्या उदरात काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. विराटही १०० आंतरराष्ट्रीय शतकं करेल असं आपल्यालाही नव्हतं का वाटलं? पण तीन वर्षांत एकही शतक झालं नाही आणि त्याच्यावर अपयशाचा दबाव वाढला.

असे अडथळे येत राहतात, म्हणून क्रिकेटमध्ये भाकीत हे स्वप्नरंजन असतं. करमणूक होते, उत्साह वाढतो एवढंच.

मुख्य म्हणजे, इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात विक्रमासाठी ‘खेळवणं’ प्रशस्त मानलं जात नाही. अँडरसन हा मुरलीपासून १५४ विकेट्सवर उभा आहे म्हणून त्याला कुणी ४५ वयापर्यंत खेळवणार नाही किंवा त्याला ७०० ला हात लावू द्यावा असा विचार कुणी करणार नाही.

तो फॉर्मात असेल, फिट असेल तरच खेळेल. आपण कपिलदेवला हेडलीच्या विक्रमाकडे, अक्षरशः गाडी टो करावी, तसं नेलं होतं.

ब्रॅडमन भारतातून खेळत असता तर त्याची कसोटीत १०० ची सरासरी अटळ होती. आपण त्याला ९९.९४ वर निवृत्त होऊ दिलं नसतं.

थोडक्यात, सचिनचं कसोटी धावांच्या, कसोटी शतकांच्या आणि आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाबरोबरचं जे दृढ नातं आहे ते लवकर संपेल असं वाटतं नाही.

सचिनव्यतिरिक्त या विक्रमांशी नातं जोडू शकणारं रूट आणि विराट यांच्या पलीकडे तसं कुणी दिसत नाही. रूट- विराट यांचा फॉर्म टिकला, फिटनेस राहिला तर हे स्वप्नरंजन, हा एकतर्फी ‘रोमान्स’ सुरूच राहील.

‘रोमान्स’चं स्वप्न कुणाला आवडतं नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT