file photo
file photo 
सप्तरंग

डिसथायमिया

-डॉ. श्‍यामल सराडकर
"ये रुखसार पिले से लगते हैं ना उदासी की हल्दी हैं हट जायेगी... तमन्ना की लाली को पकने तो दो, ये पतझड की छॉंव छट जायेगी...' गुलजारच्या या गाण्यातली उदासी की हल्दी. गुलाम अलीच्या गझलेतली "तेरी गली में सारा दिन दुख के कंकड चूनता हुं.' दुख के कंकड, अशी हलकी उदासी बरेचदा जीवनाला घेरून टाकते. ती जेव्हा सातत्यानं लाइफस्टाइल अन्‌ व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते तेव्हा मात्र "बहर'पाचोळा वाटायला लागतो. सकारात्मकतेचा जीवनवृक्ष उन्मळून पडतो. नकारात्मकतेचा पाचोळा मनाभोवती गोलाकार वावटळीसारखा सैरभैर फिरत असतो. असा "लो मूड वाला फील' जेव्हा आयुष्यभर उणेअधिक प्रमाणात राहतो तेव्हा मानसशास्त्रीय अन्‌ न्यूरोसायकियाट्रीच्या वैज्ञानिक भाषेत त्याला डिसथायमिया (Dysthymia) म्हणतात. उदासी, कामात मन न लागणे, अकारण चिडचिड, नकारात्मकता आधी शोधणे, एकटं राहायला आवडणे, समाजापासून चार हात दूर राहणे, सतत बेचैनी, चिंतित असणे एकंदरीतच आयुष्यात आनंद नसणे किंवा जीवन म्हणजे दु:ख अशी काहीशी जगण्याची फिलॉसॉफी... यालाच न्यूरोटिक डिप्रेशन किंवा डिप्रेसिव्ह न्यूरोसीस असंही म्हटलं जातं. टोकाचं नैराश्‍य सहसा या आजारात येत नाही. ही काहीशी जमेची बाजू. सिरीयस टोकाला जीवन संपवून टाकण्याइतपत परिस्थिती विकोपाला जात नाही. पण, लो वाटणं, सातत्यानं चालू असतं. बालपणाच्या उत्तरार्धात अन्‌ तरुणाईतच साधारणत: या आजाराची पाळमुळं लक्षात येतात. सोबतीला आयडेंटिटी तयार होण्याचाही काळ असतो. आयडेंटिटी क्रायसिस. व्यक्तिमत्त्वातला बदल. स्वत:ची युनिक ओळख तयार करण्यासाठी मन स्वत:शी अन्‌ अवतीभवतीच्या वातावरणाशी भांडत असते. ही लढाई कधी सकारात्मकतेच्या बाजूने असते, तर कधी नकारात्मकतेच्या दिशेने. जो जिंकेल तशी मग लाइफस्टाइल. प्रौढ लोकांमध्ये खासकरून मिडल एजेड लेडीजमध्ये हा आजार प्रामुख्यानं दिसतो. जनरल पॉपुलेशनमध्ये शंभरातल्या पाच ते सहा लोकांमध्ये याची लक्षणं दिसतात. सायकियाट्री क्‍लिनिकमध्येही दर तिसऱ्या, चौथ्या पेशंटमध्ये डिसथायमियाची लक्षणं दिसतात. कुटुंबामधे कुणाला या आजाराचं प्रमाण असलं की, मग तशी जीवनदृष्टी नकारात्मकता इतरांनाही घेरून टाकते. आपण केव्हा या उदासीच्या विळख्यात अडकतो लक्षातही येत नाही. दु:ख, वेदना हीच मग जगण्याची सेंट्रल थीम बनते. अवतीभवती घडणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट घटना मग त्याला दुजोरा देते. कारणं लहानपणापासून आयुष्यात आलेल्या धक्कादायक घटना अन्‌ त्याला दिलेला प्रतिसाद यावर बरेचदा अवलंबून असतं. फ्रॉइडने त्याच्या Mourning and melancholia ध्ये याबद्दल विस्तृत लिहलंय. रियल अन्‌ आभासी फॅंटसी अनुभवांमधलं द्वंद्वं अन्‌ हातातून निसटून गेलेली एखादी गोष्ट अन्‌ त्याला दिलेला प्रतिसाद यावर बरंच काही अवलंबून असतं. ताण मनात साचत जातो. हळूहळू जीवनशैली मग नकारात्मक होत जाते. हेल्पलेस होपलेस वाटतं. आपण एकटे आहोत या विराट अस्तित्वात. ही भावना मनाच्या तळाशी खोलवर साचत जाते. त्यातून मग बाहेर निघता येत नाही. आनंदाचं आभाळ तिथून दिसत नाही. मेंदूतल्या न्यूरोकेमिकल्समध्ये पण बदल होतो. सेरोटोनिन कमी होतं. माणूस हळवा होतो. स्त्रियांमध्ये हार्मोन्स बदलामुळे अन्‌ दैनंदिन ताणतणावामुळं डिसथायमियाची लक्षणं प्रामुख्यानं दिसतात. निदान : सायकियाट्रीच्या क्रायटेरियानुसार दोनेक वर्षे सतत निराश वाटणे लो मूड असेल, तर डिसथायमिया असल्याचं निदान होतं. सोबतीला झोप न येणे, भूक मंदावणे, छोट्या-छोट्या गोष्टीत चिडचिड होणे, रस नसणे, आत्मविश्वास कमी होणे, एनर्जी कमी होणे अशी लक्षणं दिसतात. सतत बेडवर असणाऱ्या क्रॉनिक शारीरिक व्याधींनी ग्रासित रुग्णांना नेहमीच उदास डिप्रेस्ड लो वाटतं. त्याला डिसथायमिक व्हेरियंट म्हणतात. लक्षणं साधारणपणे तशीच असतात. ट्रिटमेंट : औषधं अन्‌ सायकोथेरपी, कौन्सेलिंग सेशन्स. मुख्य उद्देश जीवनदृष्टी बदलवणे. अँटिडिप्रेसंट अन्‌ काही अँक्‍जीओलायटिक्‍स चिंता कमी करणारी औषधं असतात. त्याने काही अंशी बेचैनी अन्‌ उद्विग्नता कमी व्हायला मदत होते. सायकोथेरपी बिहेवियर थेरपी सेशंसमध्ये स्टेपवाइज जीवनाबद्दलची फिलॉसॉफी सकारात्मक व्हायला मदत होते. इनसाइट ओरिएंटेड सायकोथेरपी फार महत्त्वाची. यामध्ये डिटेल्ड हिस्टरी घेतली जाते. बालपणीचे धक्कादायक, न पेलणारे वाईट अनुभव, अन्‌ त्याची आत्ताच्या जगण्याशी असणारी लिंक यावर सविस्तर चर्चा केल्या जाते. पेशंट मनमोकळेपणाने बोलू लागतो. खुलतो. जुन्या नावडत्या वाईट नकोशा अनुभवांचं गाठोडं आपण सतत वाहत आहोत. ते ओझं झटकून टाकलं की, हलकं वाटायला लागतं. हे सहजपणे हळूहळू उमगायला लागतं. थेरपिस्टशी छान बॉंड जुळतो. सायकियाट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट टीमवर्क महत्त्वाचं. औषधांनी केमिकल लोचा ठीक होतो. उदासीचे ढग दूर होतात. आभाळ स्वच्छ, निरभ्र व्हायला सुरवात होते. डोळ्यातही एक चमक जागी होते. निराशेची जागा हळूहळू समाधान अन्‌ सकारात्मकतेनं भरली जाते. आत्ता या क्षणी जगणं माणूस शिकतो. पॉझिटिव्ह रिइनफोर्समेंट शिकतो माणूस. हवीहवीशी गोष्ट परत परत मिळत गेली की, छान वाटतं. जगण्यावर नव्यानं प्रेम वाटायला लागतं. दु:खाशी चार हात करण्याची, ताकदीनिशी सामोरं जाण्याची मनाची तयारी होते. हलकं वाटतं. आयुष्याचा ऊन-सावलीचा खेळ सुखद होतो. या क्षणात थांबता आलं की, धावपळ कमी होते. मनातल्या आभाळात पंख पसरवून छान सैरभैर उडता येतं. "जल गये जो धूप में तो साया हो गये. आसमॉं का कोई कोना ओढा सो गये. हम ठहर जाये जहॉं उसको शहर कहते हैं..!' गुलजारच्या गाण्यातलं हे असं वर्तमानात जगण्याचं कसब अंगी आलं की, डिसथायमिया जवळ येत नाही. लगट करत नाही. मनाचं शहर आपलंसं वाटायला लागतं. जगण्यातली प्रवासातली सारीच ठिकाणं सुखद वाटायला लागतात. निराशा लुप्त झालेली असते. सुखाचा, आनंदाचा समाधानाचा नव्याने जन्म झाला असतो. मन का शहर आबाद होता हैं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT