file photo
file photo 
सप्तरंग

फ्रीदा आणि कातरवेळ..

शर्वरी पेठकर
संध्याकाळ म्हणजे कातरवेळ, दिवस आणि रात्र जिथे मिसळतात ती, अशाश्वताच्या भीतीने मन हुरहुरतं ती वेळ. या वेळी अनेकदा मी तिची चित्र न्याहाळत बसते, मी माझ्यातली फ्रीदा शोधत बसते. फ्रीदा काहालो, 1920 च्या काळात मेक्‍सिकोमध्ये अभिव्यक्तीला चित्रातून वेगळी वाट करून देणारी तरुण चित्रकार.. जोडलेल्या भुवयांची, कृश शरीरयष्टीची एक मुलगी, जी जन्मतः पोलिओग्रस्त आहे. जिचा एक पाय दुसऱ्या पायाहून लहान आहे. त्यात तिला बालपणीच भीषण अपघात होतो, तिची अनेक हाडं निकामी होतात, तुटतात. आयुष्यात अनेकदा, शारीरिक टिप्पण्या, किंवा body shaming ला ती सामोरी जाते. अपघातानंतर तर तिचं आयुष्यच थांबल्यासारखं होतं... मी पाहते आरशात बघत असताना अनेक जणींना कोमेजताना, स्वतःच्या शरीरातले दोष सतत जोखत राहताना, त्यातून त्यांचा वावरण्यातला आत्मविश्वास नाहीसा होताना. फ्रीदा पोलिओग्रस्त होती, काळ बनून आलेल्या एका अपघातालाही सामोरी गेली, पण body shaming चं शिकार झाली नाही.. पायाला झालेला पोलिओ लपवण्यासाठी तिनं पायघोळ स्कर्ट घातला खरं तर, आणि तोच पायघोळ स्कर्ट तिचं स्टाईल स्टेटमेंट झालं.. आजही, ती fashion icon आहे. तिनं परिधान केलेले रंग, हिरवा, लाल, पिवळा, नारंगी, पांढरा, frida kahlo colors ÷म्हणून प्रचलित झाले. तिचं ते केसांचा पसरट आंबाडा घालून त्यावर असंख्य फुलं माळणं, गडद रंगाचे पायघोळ झगे घालणं, ती जे वापरायची ते गडद लाल रंगाचं लिप्टस्टिक, जोडलेल्या भुवया आपल्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाहीत खरंतर, पण तिच्या जोडलेल्या भुवयासुद्धा fashion industry ची प्रेरणा झाल्या. शंभर वर्षे झाली, ती अशी सरूनही उरलेली आहे. तिची चित्र म्हणजे केवळ रेषा आणि रंग नाहीत, ज्या काळात प्रगत म्हणावे अशा देशांमध्येही मुलींना फारसं बोलूही दिलं जात नव्हतं, त्या काळात एका तरुण मुलीनं कागदापाशी बोलून दाखवलेल्या व्यथा आहेत तिची चित्रं. तिची चित्रं हा तिच्या आयुष्याचाच पट आहे, तिनं स्वतःचाच घेतलेला तो ज्वलंत शोध आहे. तिच्या चित्रांमधून ती केवळ एक तरुण मुलगी म्हणून नाही, माणूस म्हणून स्वतःकडेच त्रयस्थपणे बघते, ती स्वतःला नागडं करते, जाब विचारते आणि तिला तिच्याच जगण्याविषयी उमगलेलं काहीतरी रंगाच्या भाषेत कागदाला सांगते. शब्दांना आकार असतो, गाव असतं, राज्य असतं, देश असतो.. पण आकृती, रंगांची भाषा, ती अमर्याद आणि सर्वसमावेशक आहे. तरुण हृदय, स्त्रीत्व, आणि वेदना सार्वकालिक आहे. फ्रीदाचा आजही माझ्यासारख्या अनेक तरुणींशी अतूट आणि अढळ असा संवाद सुरूच आहे. तिच्या अश्रूंचे संदर्भ नक्कीच वेगळे होते, ते जितके तिच्या शारीरिक दुःखाशी जोडलेले होते, तितकेच ती आणि तिचा नवरा दिऐगो, यांच्या संबंधातील मानसिक तणावाशीसुद्धा जोडलेले होते. पण तिचं broken column हे चित्र जेव्हा मी पाहते तेव्हा मलाही आठवतात, उमेदीचं वय असूनही पाळीत मला वजन उचलता न आल्यामुळे मला जाणवणाऱ्या माझ्या शरीराच्या मर्यादा, क्षणभरासाठी निसर्गानं माझ्यावर अन्याय केलाय असंही वाटून जातं. मलाही वाटून जातं माझ्या योनीतून leaning tower of pisa घुसून मला आरपार छेदून जातंय. गर्दीत स्वतःला शोधत असताना, माझाच माझ्याशी अनेक पातळ्यांवर झगडा सुरू असताना मला, आणि माझ्यासारख्या अनेकींना दिसतं कधीतरी स्वतःचंच प्रतिबिंब स्वतःसमोर, येतं हातात स्वतःचं उघडं, नागडं, रक्तामासाचं क्षणभंगुर हृदय, तिच्या the two fridas या चित्रासारखंच. तिने तिच्या चित्रांमध्ये तोंडातून ओकलेली आग, स्वतःच्याच गळ्याभोवती घातलेला काट्यांचा हार, तिच्याभोवती असणारे रक्तानं माखलेले मानवी अवयव आणि सांगाडे, एका जखमी हरणाला असणारा तिचा चेहरा, अस्वस्थ ऍनाचा निचरा होत असतात सतत. दिवसाच्या साऱ्या प्रहरांपेक्षा संध्याकाळ कातर करते. वयाच्या या टप्प्यात पोतडीत भरत असतात असंख्य नवे अनुभव, आणि जाणिवा. दिवसा कमावलेल्या जाणीव-नेणिवांचा सामना रात्रीच्या अंधारात करावा लागणार आहे याची जाणीव करून देणारी संध्याकाळ. दिवसाच्या रंगांपेक्षा फिक्कट, आणि रात्रीपेक्षा उजळ असे कितीतरी रंग असतात संधिप्रकाशाच्या पदरात. अशा प्रत्येक संध्याकाळी वाटून जातं, फ्रीदानंही कुंचला, आणि रंगांचं दान, या संधिप्रकाशाकडूनच घेतलं असेल आणि त्या बदल्यात संधिप्रकाशावरच तिनं केलं कर्ज, जे त्या संधिप्रकाशाला अद्याप फेडताच आलेलं नाही. अशा प्रत्येक संध्याकाळी मी आणि माझ्यासारखे अनेक मांडतात फ्रीदाच्या चित्रांचं आच्छादन, आणि ते पांघरून जातात, वास्तवापासून हातभर उंच प्रदेशात, उद्याच्या सूर्याचं आव्हान पेलण्यासाठी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT