डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचं सामाजिक समस्यांचं भान आणि एकूणच त्यांच्या उंचीचा माणूस जन्म घ्यायला शतकानुशतकं वाट पहावी लागते. इतकंच काय, त्यांना असलेल्या सामाजिक समानतेविषयीच्या पोटतिडिकेची प्रामाणिक जाणीव असलेली माणसंही अपवादानेच जन्माला येतात. असा अपवाद दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळेंच्या रूपाने जन्माला आला, असं ‘झुंड’ चित्रपट पाहून आल्यावर माझं मत झालंय. नागराजचा ‘पिस्तुल्या’ आला, आम्ही म्हटलं असेल कुणीतरी हौशी कलाकार, त्यानंतर त्याचा ‘फँड्री’ आला तरी आमची नापसंतीच होती. त्याचा ‘सैराट’ आला आणि ‘झयके त्याले वयखे’ ह्या वऱ्हाडी म्हणीप्रमाणे आता त्याची ओळख आम्हाला करून घ्यावीच लागली. ‘सैराट’च्या अजस्र बॉक्सऑफिस विक्रमाकडे दुर्लक्ष करत त्याने पुन्हा छोट्या बजेटचा ‘नाळ’ हा चित्रपट मध्यंतरी आणला. ‘नाळ’ सिनेमाचा अबोल क्लायमॅक्स अक्षरशः हृषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या तोडीचा होता. असे पराक्रम केल्यानंतर बातमी आली ती या पठ्ठ्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायला साक्षात ‘बिग बी’ने होकार दिलाय.
कोरोनासारख्या नैसर्गिक आणि पुणे विद्यापीठाच्या मैदानातील या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी लावलेल्या सेटवरून झालेल्या घोळासारख्या अडथळ्यांवर मात करत या पठ्ठ्याने ‘बिग बी’च्या सहकार्याने ‘झुंड’ पडद्यापर्यंत पोहोचविण्याची सुमारे पाच वर्षांची शर्यत जिंकलीच. ‘झुंड’ पाहिला आणि लक्षात आलं की, हा चित्रपट मुळात नागपूरच्या प्रा. विजय बारसे यांची चरित्रकथा नसून, झोपडपट्टीतील मुलांना वाईट मार्गापासून दूर नेण्यासाठी त्यांनी ‘स्लम सॉकर’चं जे अभियान उभं केलं, त्या कथाबीजाचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक विषमतेचा कॅनव्हास लख्खपणे ‘आहे रे’ वर्गापुढे आणण्यासाठी नागराज मंजुळेने केला आहे. काही प्रेक्षकांना या चित्रपटाचा उत्तरार्ध काहीसा संथ वाटला, कारण ते बारसेंच्या चरित्रात गुंतून आता शेवटाला नागराजची झुंड... नव्हे टीम आंतरराष्ट्रीय सामना खेळेल या अपेक्षेने बसले होते. पण हा विषय मुळात फुटबॉलचा नव्हताच. असमानतेच्या खेळपट्टीवर वंचितांच्या आयुष्याच्या खेळाची कसली फरफट होते, ते दाखवणारा हा आरसा होता.
विजय बारसेंच्या कर्तृत्वाचा आधार घेत चित्रपटात विजय बोराडे बनलेल्या अमिताभने हा आरसा हाती धरल्यामुळे ‘आहे रे’ वर्गाला आपल्याच चेहऱ्यावरील कटुतेचे भाव ह्यावेळी लपवता आले नाहीत.
सर्वसामान्य माणसांकडून अभिनय करवून घेण्याच्या नागराजच्या कौशल्याचा ‘झुंड’मध्ये कहर झालाय. कचरा वेचणे, नशा करणे, दिवसाढवळ्या सोनसाखळ्या चोरणे, धावत्या मालगाडीतून कोळसा चोरणे असली कामं करत असलेली नागपूरच्या झोपडपट्टीतील मुलं नागराजने थेट महानायकापुढे उभी केली. या चित्रपटाची कथा आणि हा चित्रपट बनण्याची कथा एकसारखीच आहे.
संधी मिळाल्यास वंचित समाजातील प्रतिभा लपून राहणार नाही, हा चित्रपटाच्या कथेतील संदेश नागराजने झोपडपट्टीतील मुलांकडून अभिनय करवून घेऊन तिथल्या तिथेच खरा करून दाखवला आहे. हे सगळं कल्पनेपलीकडचं आणि अद्भुत आहे. नागराजने अतिदलित, अननुभवी, अज्ञानी मुलांना इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि खुद्द महानायकास त्याचं स्टारडम बाजूला ठेवून मध्यमवर्गीय बारसे सरांप्रमाणे सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाच्या बंधनात बांधून ठेवलं.
एकाही नाट्यमय दृश्याशिवाय अमिताभ परिपूर्ण वाटतो, ही त्याच्यातल्या महानायकाची कमाल.
या चित्रपटात परिपूर्ण शिक्षण देणारी एक शाळा आणि झोपडपट्टीतील गचाळ वातावरण यामधील भिंत ही समाजाच्या दुभंगत्वाचं ठोस प्रतिबिंब म्हणून उभी राहिली आहे. झोपडपट्टीवाल्यांच्या किळसवाण्या दुनियेत त्या भिंतीच्या लहानग्या फाटकातून डोकावण्याचा किंवा तेथील लोकांच्या तसं असण्यामागील कारणांचा बोराडे सरांप्रमाणे कुणी विचारही करणार नाही. मध्यंतरापर्यंत या झोपडपट्टी- वासीय न-नायकांची नागपुरी भाषेत गमतीशीर ओळख झाल्यानंतर आणि बोराडे सरांनी या शिष्टाचारहीन धटिंगणांना फुटबॉलची गोडी लावल्यानंतर उत्तरार्धात या समाजाच्या अस्तित्वहीनतेची काटेरी बोच जाणवण्यास सुरुवात होते.
तुमसर या भंडारा जिल्ह्यातील आदिवासीबहुल इलाख्यात राहणारी रिंकू राजगुरू जेव्हा गावातील प्रतिष्ठित व्यक्तीकडे ओळखीचा दाखला मागायला जाते, तेव्हा जिथं आयुष्य गेलं त्या जागीच त्यांना कुणी प्रतिष्ठित व्यक्ती ओळखत नसल्याची जाणीव अंगावर शहारा आणते. तिची आणि तिच्या वडिलांमधील संवादाची सगळी दृश्यं आदिवासी ‘गोंडी’ भाषेतील असूनही विना सबटायटल त्यातील सगळं काही कळतं. फुकाचा भाषाभिमान धरणाऱ्यांना नागराज अशी सावकाश शिकवण देतो. खेडे विभागात ही तऱ्हा, तर झोपडपट्टीसारख्या शहरी भागात पासपोर्टरूपी ओळख मिळविण्यासाठी गुन्हेगारी नोंदी असलेल्या एका युवकास कोण अडथळे येतात त्याचा श्वास रोखायला लावणारा, डोळ्यांत अश्रू आणणारा क्लायमॅक्स साधला आहे नागराजने. विमानतळावर प्रवेश करताना ओलांडावी लागणारी सुरक्षा तपासणीची चौकट, नागराजच्या दिग्दर्शनाच्या परीसस्पर्शाने जणू शेकडो वर्षांच्या दास्यातून मुक्ती देणाऱ्या महादरवाजाचं रूप घेते.
एकाच चमूत मुलं-मुलींना खेळवून लैंगिक समानतेचा संदेशदेखील आपसूकच दिला गेला आहे. वंचितांना संधीअभावी भोगावी लागणारी अगतिकता, अस्तित्वहीनता, कस्पटासमान जिणं ह्या सर्वांची बोचक अनुभूती हा सिनेमा पदोपदी करवून देतो.
आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, किशोर कदम, भारत गणेशपुरे, सोमनाथ अवघडे आणि नव-कलाकारांपैकी अंकुश गेडाम, सायली पाटील, प्रियांशु क्षत्रिय आणि अख्ख्या ‘टीम’नेच नैसर्गिक अभिनयाची कमाल केली आहे. आता राहता राहिले अमिताभ बच्चन. आपलं स्टारडम, आपला अनुभव, आपलं मोठेपण, आपलं वय आणि कारकीर्दीचा सर्वोच्च टप्पा या सगळ्यांच्या वर उठून अमिताभने प्रा. विजय बारसेंची ही भूमिका विजय बोराडे ह्या नावाने साकारली आहे. आपण ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘अग्निपथ’मधील विजयच्या रूपातील अमिताभ पाहिला आहे. थिएटरमध्ये शिट्ट्यांच्या गर्दीत दहा जणांना बुकलून काढणारा विजय नागराजच्या ‘झुंड’मध्ये मात्र भिन्न वागतो. खरं पाहता सत्तरच्या दशकातील अमिताभच्या विजयनेसुद्धा वंचितांचाच आक्रोश आपल्या अनोख्या स्टाइलने पडद्यावर आणला होता; पण त्याच्या तेव्हाच्या खेळीत तो हे नेमकं काय करतो आहे याची व्याख्या करायची राहून गेली आणि केवळ मनोरंजनाच्या चष्म्यातून आम्ही अमिताभचा सत्तरच्या दशकातील विजय पाहिला होता. परंतु नागराज मंजुळेंचा विजय सामाजिक विषमतेविरुद्धची ही कठीण शस्त्रक्रिया ह्यावेळी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने हाताळताना दिसला आहे. अमिताभच्या साधेपणाला आणि सोबत अमिताभ असला तरी विषयवस्तूवर विपरीत परिणाम न होऊ देणाऱ्या नागराजला सलाम. माणसाने कारकीर्द गाजवावी ती अमिताभसारखी. कारकीर्दीच्या पूर्वार्धात अफाट स्टारडम आणि उत्तरार्धात अमर्याद संयम. हा विनाकारणच ‘स्टार ऑफ द मिलेनियम नाही बरं.
(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.