guide movie unforgettable music S D Burman
guide movie unforgettable music S D Burman Sakal
सप्तरंग

गाईड : अविस्मरणीय संगीत

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

दादांनी गुरुदत्तच्या ''बहारे फिर भी आएगी'' या सिनेमाची पाच गाणी तयार केली होती. दादांनी गुरुदत्तला सांगितलं उरलेली गाणी आर डी बर्मन रेकॉर्ड करेल. पण गुरुदत्तने ऐकलं नाही. त्याला थांबायला वेळ नव्हता. त्याने संगीताची जबाबदारी ओपी नय्यरकडे सोपवली.

देव आनंद मात्र बर्मनदादांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. त्याने दादांना सांगितलं, "तुम्ही आधी बरे व्हा. मग आपण संगीताचं पाहू. मी हा सिनेमा पुढे ढकलीन. पण दुसऱ्या कुणाला घेणार नाही."

‘‘द गाईड’’ चित्रपटाचं हृदय हे त्याचं संगीत आणि गाणी आहेत. इतकी वर्ष झाली ते हृदय धडधाकट आहे. ते तसंच राहणार कारण ते अमर संगीत आहे. एस डी बर्मन अर्थात दादांच्या सांगीतिक कारकीर्दीचा ‘गाईड’ हा कोहिनूर हिरा होता. दादांनी या सिनेमाचं संगीत ज्या परिस्थितीत तयार केलं, ते पहिल्यांदा वाचल्यावर मला देव आनंद खराखुरा देव माणूस वाटला.

दादांनी गाईडचे संगीत तयार करायला घेतलं, त्यांचं एक गाणं रेकॉर्ड झालं आणि बर्मनदादांना हृदयविकाराचा झटका आला. त्या काळी हृदयविकाराचा झटका आला आणि तुम्ही त्याच्यातून वाचलात तर पुढचे चारपाच महिने पूर्ण विश्रांती घ्यावी लागत असे. दादांसाठी हा अत्यंत कठीण असा काळ होता. त्यांच्याकडे अनेक सिनेमा होते. पण एक एक करत निर्माते दादांना सोडून गेले.

'' लव इन् टोकियो '' हा सिनेमा शंकर-जयकिशनकडे गेला. त्या काळात दादांची दोन लाडकी माणसं होती. एक देव आनंद आणि दुसरा गुरुदत्त.

खरं तर जयदेवना ''हम दोनो '' देताना असं ठरलं होतं, की नवकेतनचे पुढचे सिनेमे जयदेव आणि बर्मन यांनी वाटून घ्यायचे. एक जयदेवला दिला तर पुढचा बर्मनदादांना द्यायचा. '' हम दोनो नंतर'' तेरे घरके सामने '' बर्मनदांनी केला.

गाईडच्या वेळी हक्क जयदेव ह्यांचा होता. पण ''गाईड'' हा महत्त्वाकांक्षी सिनेमा होता. देव आनंदची प्रतिष्ठा आणि भरपूर पैसे त्यात लागणार होते. त्यांनी बर्मनदादांना घ्यायचं ठरवणं व्यावसायिकदृष्ट्या चुकीचं नव्हतं. बर्मनदादा आजारी पडल्यावर जयदेव यांना देव आनंद संगीतकार म्हणून घेऊ शकला असता. पण आजारी आणि हतबल दादांचा हात देव आनंदने सोडला नाही.

त्या कालखंडात, ''गाईड'' मधल्या, दादांच्या ''वहा कौन है तेरा'' गाण्यातल्या ओळी त्यांना आठवल्या असतील. त्यात शैलेंद्र याने लिहिलं होतं,

"दर्दसे तेरे कोई ना तडपा

आँख किसिकी ना रोई"

या ओळी गाताना दादांना ते आजारपणात घालवलेले पाच महिने आठवले असतील. पाच महिन्यांनी बर्मनदादा बरे झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत पुढची बहुतेक सर्व गाणी तयार झाली. त्यातली तीन गाणी शैलेंद्रने तिथल्या तिथे लिहिली.

गंमत पाहा गाईडचा गीतकार आधी हसरत जयपुरी म्हणजे शैलेंद्रचा दोस्त होता. तो ''दिन ढल जाये'' हे गाणं लिहीत होता. काही केल्या ते गाणं देव आनंद, विजय आनंद आणि बर्मनदादा यांना पसंत पडलं नव्हतं. त्यामुळे हसरत जयपुरी चिडला आणि म्हणाला, "एक रंडी के लिये और क्या लिख सकता हुं"

देव आनंदला त्यांचं हे बोलणं आवडलं नाही. त्याने तिथल्या तिथे त्यांचे पैसे चुकते केले आणि शैलेंद्रला बोलावलं. शैलेंद्र आला. त्याने आपल्या दोस्ताची पहिली ओळ तशीच ठेवली. म्हणजे ''दिन ढल जाये हाए '' त्याचं वर्णन विजय आनंद मस्त करायचा. त्याने म्हटलं होतं, "तो आला. त्याने सिगरेट पेटवली आणि सिगरेटचा डबा हातात घेतला आणि त्यावर दोन ओळी लिहिल्या.

''दिन ढल जाये, हाए रात न जाये

तू तो ना आये, तेरी याद सताये''

नुसत्या दोन ओळींनी बर्मनदादा खूश झाले."

आणि पुढचं गाणं तिथल्या तिथे लिहिलं.

"आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है" या गाण्याच्या वेळी सुद्धा नेमकं तसंच झालं. शैलेंद्रला गाण्याची भूमिका आणि प्रसंग समजावून सांगितल्यावर तिथल्या तिथे शैलेंद्रच्या तोंडातून शब्द बाहेर पडले "आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा है"

हे गाणं अपेक्षेपेक्षा खूप उशिरा तयार झालं. सेट तयार होता. देव आणि विजय आनंद उदयपूरला गाण्याची वाट पाहत होते. दादांनी देवला कळवलं, "सॉरी, उशीर झाला, पण जगाला कधीही विसर पडणार नाही, असं गाणं पाठवतो." त्या गाण्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. त्याची सुरवात कडव्यातून होते आणि मग मुखडा येतो.

''काटोंसे खिंच के ये आँचल '' हे कडवं आहे. ‘मोसे छल'' आणि ''क्या से क्या हो गया'' पाठोपाठ येतं. एक लतादीदी गात होती, एक रफी. लताचं गाणं चक्क शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. ते बर्मन दादांनी झिंझोटी रागावर बेतलंय. दादांनी दिलेल्या चालीवर शैलेंद्र याने शब्द मस्त रचले. ‘मोसे छल किये जा’ मध्ये ''किये'' वर जोर दिला गेलाय, त्यामुळे तिच्या मनातला राग चांगला व्यक्त होतो.

या गाण्याला तबला चक्क संतूरवादक शिवकुमार शर्मा यांनी वाजवला आहे. गोड मेलडी सुद्धा राग व्यक्त करू शकते हे बर्मनदादांनी दाखवून दिलं. नंतर व्हायोलिनचे सूर येतात आणि त्याच रागात पाश्चिमात्य नोट्समधून ती मेलडी रफीसाठी वाजते. पण हे दादांनी पुस्तकात लिहिलं म्हणून कळलं. तिचं ट्यून वेगळ्या गाण्याचं रूप घेऊन येते.

गाईडमधलं प्रत्येक गाणं कथानक पुढे नेतं. गाण्यासाठी गाणं टाकलेलं नाही. तरीही त्यात ''गाता रहे मेरा दिलं '' हे गाणं शेवटच्या क्षणी घेतलं. देव आनंदच्या अचानक लक्षात आलं, की १९५७ पासून या ना त्या कारणासाठी किशोरकुमार त्याच्यासाठी गायला नाही. त्याने ही व्यथा बर्मनदादांना सांगितली. दादांनी किशोरला घरी जेवायला बोलावलं. त्यांना ठाऊक होतं, की किशोरच्या होकाराचा मार्ग किशोरच्या पोटातून जातो. त्याला आवडीचं जेवण घातल्यावर दादांनी सांगितलं, "मी एक ट्यून तुझ्यासाठी तयार केली आहे. तू माझं अन्न खाल्लं आहेस चल रिहर्सल कर."

किशोरने मुकाट्याने दादांचं ऐकलं. ते गाणं होतं, "ख्वाब हो तुम या कोई हकीकत". ते ''तीन देवियाँ''मध्ये घेण्यात आलं. पण देव आनंदच्या लक्षात आलं की गाईड आधी येतोय. त्यात एक गाणं हवं. लगेच शैलेंद्र याला बोलावण्यात आलं. दादांनी त्याला ट्यून ऐकवली.

तो बर्मनदादांच्या द जेट बंगल्याच्या गच्चीवर गेला. त्याने गाणं लिहून दादांना दिलं. ते होतं, "गाता रहे मेरा दिल". दादांनी लगेच रेकॉर्ड केलं आणि विजय आनंदने ते असं चित्रित केलं आणि चित्रपटात घातलं, की ते बिलकुल ठिगळ वाटत नाही. कथेचा भाग वाटतं. ही सर्वच माणसं महान होती.

गाईडला फिल्मफेअरची सहा अॅवॉर्ड्स मिळाली. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेता देव आनंद, सर्वोत्तम अभिनेत्री वहिदा रेहमान,

सर्वोत्तम दिग्दर्शक विजय आनंद, सर्वोत्तम कथा आर के नारायण, सर्वोत्तम संवाद विजय आनंद, सर्वोत्तम छायाचित्रण. एकच मिळालं नाही. संगीताचं.

सर्वोत्तम संगीतकार आणि सर्वोत्तम गाणं "काटोंसे खिंच के ये आँचल" गाण्याला नॉमिनेशन मिळालं. जणू फिल्मफेअरचा कान बहिरा झाला होता. ते ''सूरज''ला दिलं. आणि त्यातल्या "बहारो फुल बरसावो" गाण्याला. बर्मनदादांसह सर्वांना हा धक्का होता.

गाईडच्या फिल्मफेअर अॅवॉर्डच्या विजेत्यांनी समारंभावर बहिष्कार टाकावा असे ठरत होते. फिल्मफेअरच्या बी. के. करांजियानी देव आनंदची समजूत घातली. अर्थात गाईडचं संगीत कमी दर्जाचं ठरलं नाही. फिल्मफेअरची अॅवॉर्ड विकत घेतली जातात हे बोललं गेलं.

दादांना ''आराधना''ला अॅवॉर्ड मिळालं नाही, तेव्हा "बेईमान" सिनेमाला अॅवॉर्ड मिळालं. किती गाणी बेईमानची आठवतात?

पुढे त्यांना ''अभिमान''साठी फिल्फेअर अॅवॉर्ड मिळालं. तेव्हा "शंकरने त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. दादा कुणाला फाडकन बोलत नसत. पण त्या दिवशी त्यांचा सर्व राग बाहेर आला. ते म्हणाले, "हो पण मी ते विकत घेतलं नाही."

गाईडची उंची पुन्हा देव आनंद गाठू शकला नाही. पण एक शहाणपणाची गोष्ट त्याने केली. कुणीतरी गाईड पुन्हा काढण्याविषयी विचारलं. त्याने थेट नाही सांगितलं. ताजमहाल एकदाच बांधून होतो. शाहजहानला सुद्धा तो परत बांधणं जमलं नसतं.

(लेखक क्रीडा आणि चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक आहेत, त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT