guru purnima 2024 every successful person has guru In life we learn new things Sakal
सप्तरंग

Guru Purnima 2024 : गुरू : प्रयत्‍न आणि अपयश

आज गुरुपौर्णिमा. माणूस जन्मापासूनच प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांची पाहून शिकत आलाय. जन्मानंतर पहिली गुरु आई असते आणि दुसरे गुरु शिक्षक. असं असलं तरी आयुष्यात ज्यांच्याकडून आपण नवनवीन गोष्टी शिकतो, ज्यांचे अनुकरण करतो तेही आपले गुरुच असतात.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा.विशाल गरड

आज गुरुपौर्णिमा. माणूस जन्मापासूनच प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांची पाहून शिकत आलाय. जन्मानंतर पहिली गुरु आई असते आणि दुसरे गुरु शिक्षक. असं असलं तरी आयुष्यात ज्यांच्याकडून आपण नवनवीन गोष्टी शिकतो, ज्यांचे अनुकरण करतो तेही आपले गुरुच असतात.

तो कानात मंत्र सांगणारा असो किंवा कान पकडणारा... शेवटी गुरु हा गुरुच असतो. हल्लीची युवापिढी पाहता त्यांना कानात मंत्र सांगणाऱ्या गुरुपेक्षा कान पकडणाऱ्या गुरुची जास्त गरज भासते आहे. शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रात तर गुरु या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कुठलीही पौराणिक कथा पाहा. प्रत्येक योद्ध्याच्या आयुष्यात त्यांच्या गुरुंचं स्थान अग्रभागी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्तांवर सुद्धा गुरुंचा प्रभाव होता. पौराणिक कालखंडात सांगायचं झालं तर श्रीकृष्ण आणि बलरामाचे गुरु सांदिपनी ऋषी, प्रभू श्रीरामाचे गुरु वशिष्ठ ऋषी, पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांचे गुरु भगवान परशुराम,

कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, चंद्रगुप्तचे गुरु आर्य चाणक्य होते. मध्यकाळातील गुरु सांगायचे झाले अण्णा भाऊ साठेंचे गुरु बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले.

वर ज्या सगळ्यांचे उल्लेख केले, त्या गुरु-शिष्यांच्या जोड्यांचे आजही नाव काढले जाते पण आजघडीला ठळकपणे सांगता येतील, अशा जोड्या फार कमी आहेत. मान्य आहे, की आयुष्याच्या वळणावर आपले गुरु बदलत राहतात पण यशाच्या शिखरावर विराजमान झाल्यावर किती जण त्याचं श्रेय गुरुंना देतात ?

गरज सरो वैद्य मरो अशी काहीशी अवस्था आजच्या पिढीची झालीय. ज्या गुरुकडून विद्या ग्रहण केली त्यालाच बाजूला सारून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची प्रणाली सुरू झाली आहे. गुरुप्रतिचा आदर, प्रेम आणि दातृत्व समाजात कमी होताना दिसत आहे.

इंटरनेटच्या जमान्यात गुरु करून घेण्याची परंपरा आता कमी होत चालली. सध्याची तरुणाई यु-ट्यूब गुरुच्या सांगण्यावर चालत आहे. काय चांगलं काय वाईट ? हे सगळं सोशल मीडियावर पाहून ठरवलं जात आहे. समाजातल्या विद्वान मंडळींना भेटणं, त्यांच्या सहवासात राहणं, त्यांचा सल्ला घेणं जवळपास नष्ट होत चाललंय.

मुळात प्रयत्नांचा प्रचंड कंटाळा आलेल्या आळशी पिढीला सगळं कसं एकदम फास्ट हवंय. शाळा, महाविद्यालयांमध्ये तर गुरु फक्त शालेय अभ्यासक्रम शिकवण्यापुरतेच उरलेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या लाइफस्टाइलनं जगायचं आहे, शिक्षक सांगतात ते त्यांना ओल्डस्टाइल वाटतं. त्यांच्या केशभूषेबद्दल, वेशभूषेबद्दल बोललेलं त्यांना रुचत नाही.

ग्लोबलायझेशनचा काळ आल्यानं आता इंटरनेटच्या युगात ऑफलाइन गुरुंची गरजच कमी झाली, मोबाइलच्या शाळेत आता सर्वांचे ऑनलाइन गुरु असतात. पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांचं प्रवचन सुरू असतं. अख्खी पिढी उभी करण्याचं आणि ती बरबाद करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असते.

दहशदवाद्यांचे गुरु त्यांना दहशत शिकवतात म्हणून ते सर्वमान्यांचा जीव घेतात, नक्षलवाद्यांचे गुरु त्यांना सिस्टिमच्या विरोधात लढायला शिकवतात म्हणून ते सरकार सोबत संघर्ष करतात, आध्यात्मिक गुरु समाधानी राहायला शिकवतात म्हणून सगळी मोहमाया सोडून लोक आनंदात राहतात. इथं सर्वांत मोठी जबाबदारी गुरुंची नसून गुरु निवडणाऱ्यांची असते. जर तिथे का एकदा आपण चुकलो की आयुष्याची बरबादी निश्चित असते.

लहानपणी आई गुरु असते, शाळेत आणि कॉलेजला शिक्षक गुरु असतात, तारुण्यात मग एखादा मित्र किंवा मैत्रीण गुरु म्हणून भेटते, लग्नानंतर जोडीदार गुरु होतो. राजकारणात गेलात तर राजकीय गुरु भेटतो. व्यवसायात व्यावसायिक गुरु भेटतो आणि म्हातारपणी मग एखादा आध्यात्मिक गुरु करून आपण मोक्ष प्राप्त करून घेतो.

आता या प्रक्रियेत कोणता गुरु काय शिकवतो यावर त्या शिष्याच्या आयुष्याची चढउतार ठरते. काही गुरु-शिष्याचं नातं एकलव्य आणि द्रोणाचार्यांसारखेही असते, ज्यात गुरुंनी प्रत्यक्ष जरी प्रशिक्षण दिले नाही तरी त्यांना गुरुस्थानी मानून आपण स्वयं प्रयत्नातून पारंगत होऊ शकतो फक्त त्यात गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायची वेळ येऊ नये. तृतीयपंथीयांमध्ये तर गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे. एखादा गुरु केल्याशिवाय त्या चेल्याला मान्यता मिळत नाही. त्यांच्यासाठी गुरु हेच मायबाप असतात.

बदलत्या जमान्यात गुरुजी, मास्तर, बाई ही गुरुजनांची नावे आता गळून पडली. हल्ली शाळेत सुद्धा शिक्षकांचा उल्लेख सर आणि मॅडम असाच होऊ लागला. एकेकाळी शिक्षक हे आयुष्याला वळण देणारे होते. आता ते फक्त अभ्यासक्रम शिकवण्यापुरते उरले.

एकदा का दाखला हातात पडला की पुन्हा कोणी मागं वळून पाहत नाही. मुळात गुरु कधी शिष्याला मरू देत नाही पण हल्ली गुरुंशी संपर्क तुटल्याने नैराश्य आले की आत्मघाती निर्णय घेण्यापर्यंत शिष्यांची मजल जात आहे, हे दुर्दैवी.

जगातल्या जेवढ्या केवढ्या कला आणि व्यवसाय असतील त्या फक्त गुरुंमुळेच अस्तित्वात राहिल्या आहेत. माणूस या पृथ्वीवर औट घटकेचा आहे पण त्यानं विकसित केलेले ज्ञान आणि कला तो गुरु-शिष्याच्या परंपरेतून पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करीत राहतो म्हणूनच बारा बलुत्यांसह संगीत, नृत्य, चित्र, क्रीडा, गायन अशा कला अनादीकालापासून टिकून राहिल्या.

आजवर माझ्याही आयुष्यात जन्मापासून आजतागायत अनेक गुरु भेटले. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्या प्रत्येकाचं योगदान बहुमूल्य होतं पण आज मी माझ्या आयुष्यात दोन गुरुंना खूप मानतो, ज्यातला एक आहे ‘प्रयत्न’ आणि दुसरा आहे ‘अपयश’.

आयुष्यात या दोन गुरुंनी मला खूप काही शिकवलंय. माझ्या आजवरच्या यशात या दोन गुरुंचं योगदान अतुलनीय आहे. जो प्रयत्न नावाचा गुरु करून घेतो, त्याला अपयश नावाचा गुरु प्रयत्नाच्या प्रवासात बऱ्याच वेळा भेटतो पण ते अपयशही काही वेळा शिकवूनच जातं, यश मिळवायचं असल्यास या दोघांची शिकवण गरजेची असते.

मला मिळालेलं यश हे चिरकाल टिकणारं आहे कारण ते प्रयत्न आणि अपयशाच्या पायऱ्या चढून मिळवलेलं आहे. एका क्षणात कुणाच्या तरी कृपेनं किंवा अकस्मात मिळवलेलं नाही. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या आयुष्यात हे दोन गुरु आत्मसात करून घ्या, यश तुमच्या पायाशी येऊन उभं राहील.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT