- मंजिरी धामणकर
सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा।
अहं करोमीति वृथाऽभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः।।
(अध्यात्मरामायण)
अनुवाद : कोणि न दाता सुख-दुःखाचा, ‘दुजा देइ’ हा
विचार खोटा
स्वकर्मसूत्रे बद्ध समस्तहि ‘मी करतो’ हा गर्व वृथा
अर्थ : सुख आणि दुःख देणारा दुसरा कुणी नसतो. दुसरा कुणी तरी आपल्याला सुख-दुःख देतो असं म्हणणं चुकीचं आहे. अमुक एक गोष्ट ‘मी करतो’ हा अभिमान बाळगणंही व्यर्थ आहे; (कारण), सर्व लोक आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या सूत्रानं बांधलेले असतात.
(संदर्भ : श्रीराम, लक्ष्मण, सीता हे वनवासात निघाले असताना त्यांना नावेतून नदीच्या पैलतीरी घेऊन जाताना गुहराजा हा कैकयीला आणि मंथरेला दोष देऊ लागला तेव्हा लक्ष्मणानं त्याला वरील श्लोक सांगितला).
क्वचिद्वीणावाद्यं क्वचिदपि च हा हा इति रुदितम्।
क्वचिद्रामा रम्या क्वचिदपि जराजर्जरतनुः।।
क्वचिद् विद्वद्गोष्ठी क्वचिदपि सुरामत्तकलहः।
न जाने संसारः किं अमृतमयः किं विषमयः।।
(भर्तृहरी, वैराग्यशतक)
अनुवाद : कुठे चालले वीणावादन, कुठे ‘हाय’ कुणि शोक करी
कुठे दिसे कुणि सुंदर तरुणी, कुठे जराजर्जर नारी
कुठे चालते विद्वत्चर्चा, कुठे दारुड्यांचे कलह
हे जग अमृतमय की विषमय हे कळते ना मला तरी
अर्थ : जगात कुठं वीणावादन, म्हणजे आनंदोत्सव, सुरू आहे तर कुठं कुणी ‘हाय हाय’ करून रडत आहे...कुठं एखादी सुंदर तरुणी दृष्टीस पडते तर कुठं अत्यंत वृद्ध, क्षीण झालेली...कुठं विद्वान पंडितांची गहन चर्चा सुरू असते, तर कुठं दारू पिऊन झिंगलेल्यांची भांडणं सुरू असतात. हे सर्व बघून, हे जग नक्की अमृतमय, म्हणजे सुखकर, आहे की विषमय, म्हणजे दुःखदायक, आहे हे खरोखर मला कळत नाही.
सर्वं परवशं दुःखं सर्वं आत्मवशं सुखम्।
एतद्विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः।।
अनुवाद : पराधीन जे, दुःखचि ते अन सुख ते, जे अपुल्या हाती
सुख-दुःखाचे लक्षण इतुके जाणावे हे या जगती
अर्थ : जे दुसऱ्याच्या ताब्यात असतं ते दुःख आणि जे आपल्या ताब्यात असतं ते सुख. असं सुख आणि दुःख यांचं थोडक्यात लक्षण जाणावं. याचाच एक अर्थ असाही घेता येईल की, आपल्या सुखासाठी दुसऱ्यावर, म्हणजे बाह्य गोष्टींवर, अवलंबून राहिलं तर दुःख वाट्याला येतं; पण आपल्याच अंतरातलं सुखनिधान गवसलं तर दुःखाचा प्रश्नच येत नाही.
यस्य स्नेहो भयम् तस्य, स्नेहो दुःखस्य भाजनम्।
स्नेहमूलानि दुःखानि तानि त्यक्त्वा वसेत् सुखम्।।
अनुवाद : मोह जयाला, भीती तयाला, दुःखाचे पात्रचि मोह
मोह सर्व दुःखांचे कारण, सुखि व्हावे त्यागुनि मोह
अर्थ : कोणतीही व्यक्ती, परिस्थिती किंवा वस्तू यांत माणूस प्रमाणाबाहेर गुंतला, म्हणजेच त्याला त्याबद्दल अतिस्नेह, मोह, ममत्व निर्माण झालं की, ते आपल्यापासून दूर जाईल की काय याची त्याला सतत भीती वाटत राहते, म्हणून मोह हे जणू दुःखाचं भांडं आहे. सर्व दुःखांचं मूळ या मोहातच आहे, त्यामुळे कशातच अती न गुंतता माणसानं सुखानं जगावं. हे वाचताना ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा,’ या सुरेश भट यांच्या ओळीची आठवण होते.
कस्य दोषः कुले नास्ति व्याधिना को न पीडितः?
व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम्?
अनुवाद : कुळी कुणाच्या दोष नसे?
व्याधीने पीडित कोण नसे?
कोणावर संकट ना येते?
कधि सौख्य सदा कुणी भोगितसे?
अर्थ : कुणाच्या घराण्यात दोष नसतो? कोणत्या ना कोणत्या रोगानं पीडित नाही असा कुणी तरी आहे का? संकट कुणावर येत नाही? आणि, सतत सुख भोगणारा असा तरी कोण आहे? प्रतिकूल परिस्थिती आली की माणूस म्हणतो :‘ हे माझ्याच वाट्याला का आलं?’ त्या वेळी हे सुभाषित आठवावं.
(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.