Heramb Kulkarni writes Story of tribal independence day-festival
Heramb Kulkarni writes Story of tribal independence day-festival sakal
सप्तरंग

कहाणी आदिवासींच्या स्वातंत्र्यदिन-उत्सवाची

हेरंब कुलकर्णी

आदिवासी पाड्यांवर वेठबिगारांशी संवाद साधत असताना पंडित हे देशाविषयी बोलत तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या देशाचं नाव, आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे म्हणजे नेमकं काय हे वेठबिगारांपैकी कुणालाच नीट सांगता येत नसे.

‘श्रमजीवी संघटने’चे संस्थापक विवेक पंडित यांनी ठाणे व पालघर या जिल्ह्यांत वेठबिगारमुक्तीचा लढा उभारला. लग्नासाठी कर्ज काढलेल्या आदिवासी तरुणांना ‘लग्नगडी’ म्हणून वेठबिगार केलं जाई. असे शेकडो लग्नगडी त्यांनी मुक्त केले. आदिवासींचं जगणं बदलण्यासाठी जमीनदारांशी व शासकीय यंत्रणेशी गेली ४० वर्षं त्यांनी संघर्ष केला. मोठ्या संघर्षानंतर वेठबिगार मुक्त झाले. सन १९८२ मध्ये त्यांनी ‘श्रमजीवी संघटना’ उभारली. आज संघटनेचे एक लाख ३३ हजार सदस्य आहेत.

आदिवासी पाड्यांवर वेठबिगारांशी संवाद साधत असताना पंडित हे देशाविषयी बोलत तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या देशाचं नाव, आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे म्हणजे नेमकं काय हे वेठबिगारांपैकी कुणालाच नीट सांगता येत नसे. ‘स्वातंत्र्य’ हा शब्दच त्यांनी कधी ऐकला नव्हता. तेव्हा तो धक्का होता. आदिवासींच्या जगण्यातील गुलामी आणि स्वातंत्र्य म्हणजे काय, हे कळण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्याविषयी त्यांना समजून सांगितलं पाहिजे...स्वातंत्र्यलढ्यानं आपल्याला काय दिलं हे समजण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे असं पंडित यांना वाटू लागलं. ‘स्वातंत्र्य’ आणि ‘गुलामी’ या संकल्पना त्यांच्या आयुष्यातील गुलामीशी जोडायला हव्यात असं पंडित यांच्या मनात आलं.

सर्व वेठबिगार मजुरांना घेऊन त्यांनी ध्वजवंदन करण्याचं ठरवलं. त्याविषयी सांगताना पंडित म्हणाले : ‘‘सन १९८३ मध्ये वसई तालुक्यातील देपिवली गावी तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही सर्वजण १५ ऑगस्टला शाळेच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला गेलो. मात्र, आदिवासी तिथं आले हे जमीनदारांना आवडलं नाही. त्यांनी जमलेल्या आदिवासींना हाकलून दिलं. त्यांना ध्वजवंदन करू दिलं नाही. पुढच्या वर्षी (सन १९८४) जमीनदारांना न भिता लोक ध्वजवंदनासाठी दाखल झाले. त्या दिवशी जोरदार पाऊस होता. नदी, नाले पार करून भर पावसात लोक आले होते. जमीनदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या छोट्या आदिवासी पाड्यावर जमावबंदी आदेश लागू केला. ध्वजवंदन करू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली होती. हे अविश्वसनीय वाटेल; पण हे सत्य आहे. जमीनदारांबरोबरच प्रशासनानंही ध्वजवंदनाला विरोध दर्शवला. त्या छोट्याशा पाड्यावर त्या दिवशी ५०० पोलिस होते. शाळेच्या आवारात जाताना पोलिसांनी लाठीमार केला.’’

विवेक पंडित व विद्युल्लता पंडित यांच्यासमवेत आदिवासींनी काठ्या झेलल्या आणि ध्वजाला सलामी दिली. ‘आता उठवू सारे रान ...’ हे सानेगुरुजींचं गीत सर्वांनी एकत्रितपणे म्हटलं. जमावबंदी आदेश मोडला म्हणून विवेक-विद्युल्लता यांच्यावर व प्रमुख कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पंडित दाम्पत्याची तीन वर्षांची मुलगीही न्यायालयात त्यांच्यासमवेत होती. पंडित दाम्पत्यानं जामीन घ्यावा असा आग्रह त्या लहान मुलीला पाहून सरकारी वकिलांनी केला; पण जामीन न घेता दहा दिवस ते लहान मुलीसह तुरुंगात राहिले.

या प्रकारासंदर्भात तत्कालीन शिक्षणमंत्री सदानंद वर्दे तत्कालीन गृहमंत्र्यांंना भेटले. ध्वजवंदन करू देण्यास मज्जाव झाल्याच्या घटनेची वृत्तपत्रांनी दखल घेतली. गदारोळ झाला. त्यानंतर शासनानं तो गुन्हा मागंं घेतला व दहा दिवसांनंतर सर्वांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर पुढच्या वर्षी (सन १९८५) सर्वांनी एकत्र येत थाटामाटात ध्वजवंदन साजरं केलं.

आदिवासी मजुरांच्या जीवनात खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात झाली. पुढं दरवर्षी उत्साहानं स्वातंत्र्यदिन साजरा होऊ लागला. सन १९८८ पासून स्वातंत्र्योत्सवाचं ठिकाण बदललं आणि तो गणेशपुरी इथं साजरा होऊ लागला. सुरुवातीला ५० लोकांपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात आता दरवर्षी वीस हजार आदिवासी सहभागी होतात. गरीब कुटुंबांतले लोक स्वखर्चानं येऊन या उत्सवात सहभागी होतात. काहींच्या पायात साधी चप्पलही नसते. महिलांची आणि वृद्धांची संख्या मोठी असते.

चार किलोमीटरची मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीत पारंपरिक कपडे घालून व वाद्ये वाजवत आदिवासी मंडळी नृत्य करतात...गाणी म्हणतात...घोषणा देतात ...त्यांच्या हातात हुतात्म्यांची चित्रं असतात. वज्रेश्वरीपासून गणेशपुरीपर्यंत सगळेजण पायी चालतात. गणेशपुरी उपवनात एकत्र जमून सारे ध्वजवंदन करतात. त्यानंतर शपथ घेण्याचा कार्यक्रम होतो. आदिवासींचे जे प्रश्न सुटले नाहीत त्यांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न निवडून त्या प्रश्नाविषयी स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ सर्व कार्यकर्ते घेतात आणि वर्षभर ते स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

पंडित सांगतात : ‘‘भारतीय स्वातंत्र्यलढा हे प्रेरक उदाहरण आम्ही आदिवासींसमोर ठेवलं आहे. आदिवासींना गुलाम करणाऱ्या, त्यांचं शोषण करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात त्यांनी संघर्ष करावा व स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी हा आमचा उत्सव असतो.’’

‘‘स्वातंत्र्याची फळं या गरीब लोकांपर्यंत पोहोचली नाहीत, त्यांचे प्रश्न सुटले नाहीत...पण मग, एकीकडं स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असतानाच दुसरीकडं त्यांच्या मनात काहीशी नाराजीही असेल ना?’’ यावर पंडित म्हणाले : ‘‘स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणं आणि प्रश्न न सुटणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्यानं आपल्याला अधिकार मिळाले. आपले हक्क मागण्याचा अधिकार मिळाला, बोलण्याचं-फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं हे महत्वाचे आहे. त्या अधिकारांचा वापर करून आपले हक्क आता मिळवायचे आहेत, असा स्पष्ट दृष्टिकोन आम्ही त्यांच्या समोर मांडला आहे, त्यामुळे हे लोक गरिबीबद्दल स्वातंत्र्याला जबाबदार धरत नाहीत...’’

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाच्या आधी १५ दिवसांपासून संघटनेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ‘शहीद जागर मोहीम’ राबवतात. गाण्यांतून, नाटकांतून, भाषणातून स्वातंत्र्ययोद्ध्यांचा परिचय आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेतून करून दिला जातो. त्यातून वातावरणनिर्मिती होते. गावोगावी ‘स्वातंत्र्यदिन जागर मोहीम’ही राबवली जाते. दरवर्षी हजारोंच्या संख्येनं खेड्यापाड्यांतून, गावांतून आणि शहरातून लहान बालकांपासून सारे या स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होतात.

विकासापासून वंचित असलेले हे वीस हजार आदिवासी बांधव कृतज्ञतेनं गेली ४० वर्षं राष्ट्रध्वजाचा उत्सव दिवाळीसारखा साजरा करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. ध्वजवंदनासाठी ते थेट तुरुंगात गेले, संघर्ष केला. स्वातंत्र्यावरची श्रद्धा त्यांना व्यक्तिगत जीवनात शोषणापासून मुक्तीची प्रेरणा देते आहे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT